22/09/2025
|| श्रीमाता ||
अश्विन शु. प्रतिपदा, सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५
पूजा क्रमांक १ / महाविद्या क्र.१०
|| महाविद्या श्रीकमलालक्ष्मी माता ||
ध्यानम –
कांत्या कांचनसंन्निभां हिमगिरि प्रख्यैश्र्चतुभिर्गजैः |
हस्तोत्क्षिप्त हिरण्यामृत घटैरासिच्यमानां श्रियम् ||
बिभ्राणां वरमब्जयुग्ममभयं हस्तैः किरीटोज्ज्वलां |
क्षौमाबद्धनितंब बिंब ललितां वंदेऽरविंदस्थिताम् ||
स्वरूप –
सुवर्णाप्रमाणे तेजस्वी कांती-वर्ण असून, ही देवी दिव्य अलंकाराने तेजस्वी व अनुपम सुंदर दिसत आहे, हिने वरील दोन्ही हातात कमळ धारण केली असून, खालील दोन्ही हात वरदायक व अभयकर आहेत, ही कमळात बसली असून, हत्तींनी वेष्टिलेली आहे. ही दशमहाविद्यातील दहावी देवता आहे, हिचा सदाशिव नारायण महाविष्णू असून, ही श्रीकुलातील देवी, दक्षिणाम्नायपीठस्था आहे.
इतिहास –
देव व असुरांनी जेव्हा समुद्र मंथन करण्याचे नियोजन केले, तेव्हा मंदार पर्वताची घुसळण (रवी) व वासुकी नागाची दोरी करून, त्यांनी समुद्र घुसळण्यास आरंभ केला. तेव्हा श्रीकमलालक्ष्मी ही पहिली देवतारत्न मार्गशीर्ष अमावस्येस प्रगट झाली. यानंतर अन्य तेरा रत्ने पुढे प्रगट झाली.
ही कमला जेव्हा प्रगटली तेव्हा तिच्या तेजाने चराचर दीप्तमान झाले, सर्व दिशा, देवता अत्यंत आनंदित झाले, त्यावेळी दिग्गजांनी (चार दिव्य गजांनी) तिला अमृत भरलेल्या सुवर्ण घटांनी स्नान घातले.
उपासना भेद –
हिला कमला, लक्ष्मी, दशमी, गजलक्ष्मी, गजेंद्रलक्ष्मी इ. नावाने ओळखले जाते.
फल –
हिच्या उपासनेने दारिद्र्य, दुःख, शोक, दुर्भाग्य नष्ट होऊन, सुख- सौभाग्य, गजांतलक्ष्मी व सर्वत्र अनुकूलता यश व उन्नतीचा लाभ होतो.