08/07/2016
अर्धवट अहवालावर 'निरी'ची बोळवण
- युवराज पाटील - सकाळ वृत्तसेवा
पंचगंगा प्रदूषण - अहवाल नाकारण्याचा निर्णय; नाले अडविण्याचे काम रखडणार
कोल्हापूर - ‘एक ना धड भाराभर चिंध्या‘ अशी अवस्था पंचगंगा प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनांची झाली आहे. 12 नाल्यांतील सांडपाणी रोखण्यासाठी "निरी‘ने दिलेला सविस्तर प्रकल्प अहवाल अर्धवट असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंदाजपत्रके आणि आराखड्याचा या अहवालात समावेश नाही. त्यामुळे नाल्यावरील नियोजित कामासाठी निविदा काढता येणार नाही. एकंदरीत अर्धवट अहवाल नाकारण्याचा निर्णय महापालिका पाणीपुरवठा व ड्रेनेज पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे.
प्रकल्प अहवालासाठी 11 लाखांचे काम निरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण परिसर, अभियांत्रिकी संशोधन संस्थेला देण्यात आले. कामापोटी निम्मी रक्कम निरीला दिली आहे. चार ते पाच महिन्यांच्या अभ्यासानंतर "निरी‘ने 12 नाल्यांचा अहवाल नुकताच सादर केला. हा अहवाल सविस्तर देणे अपेक्षित होते. मात्र त्यात त्रुटी ठेवण्यात आल्या. सांडपाणी रोखण्यासाठीच्या बेडचे साईज दिले आहेत. मात्र त्यांच्या दराचा समावेश नाही. प्रत्येक नाल्याचे अंदाजपत्रक आणि आराखडा स्वतंत्रपणे अपेक्षित होता; पण ते दिलेले नाहीत. अंदाजपत्रक आणि आराखड्याशिवाय एखाद्या कामाच्या निविदा काढता येत नाहीत. त्यामुळे नाल्यांच्या कामाची निविदा कशाच्या आधारे काढायची, असा प्रश्न ड्रेनेज, पाणीपुरवठा विभागाला पडला आहे. वरवरचा हा अहवाल असल्याने तो नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी आणखी काही मार्ग निघू शकेल का, यासंबंधी "निरी‘बरोबर पत्रव्यवहार झाला आहे.
पंचगंगा नदी प्रदूषणात दुधाळी, बापट कॅम्प या दोन मोठ्या नाल्यांसह अन्य 12 नाल्यांचा मोठा वाटा आहे. नागरी वस्तीतील काळेकुट्ट पाणी थेट नदीत मिसळते. नाले अडविण्यासाठी तात्पुरच्या उपाययोजना झाल्या; मात्र नेमका उपाय झाला नाही. प्रदूषण प्रश्नी कामासाठी उच्च न्यायालयाने "निरी‘ची नियुक्ती केली. तज्ज्ञ संस्थेकडून अभ्यासपूर्ण आणि सविस्तर अहवाल अपेक्षित असताना नेमका तोच तोकडा असल्याने नाल्यांवरील नियोजित कामासाठी निविदा मागवायच्या कशा, असा प्रश्न पडला आहे. लक्षतीर्थ वसाहत, जामदार क्लब, बुधवार पेठ, सीपीआर, राजहंस, रमणमळा, लाईन बाजार, कसबा बावडा आदी नाल्यांचे काम होते.
सुरवातीच्या टप्प्यातच निराशा
पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न उच्च न्यायालय तसेच राज्य शासनाने गांभीर्याने घेतला आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षततेखाली तीन महिन्यांतून आढावा बैठक होते. महापालिकेच्या एकूण अंदाजपत्रकाच्या 25 टक्के रक्कम पर्यावरणीय कामावर खर्च करणे बंधनकारक आहे. अशा स्थितीत "निरी‘कडून चांगला अहवाल मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र सुरवातीच्या टप्प्यातच "निरी‘ने निराशा केली.