मराठा क्रांती न्यूज नेटवर्क

  • Home
  • India
  • Kolhapur
  • मराठा क्रांती न्यूज नेटवर्क

मराठा क्रांती न्यूज नेटवर्क The Maratha Kranti News Network is first global blog for Maratha Community. We work for development Pran Maratha... Jiv Maratha... Shan Maratha!

गडकरींच्या छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या खोट्या लिखाणाची कसून झाडाझडती घेणारा आणि गडकरीचा पूर्वग्रहदूषित हेतू उघ...
29/03/2025

गडकरींच्या छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या खोट्या लिखाणाची कसून झाडाझडती घेणारा आणि गडकरीचा पूर्वग्रहदूषित हेतू उघडे पाडणारा, या प्रकरणावरील माझ्या वाचनात आलेला इंद्रजित सावंत सरांचा सर्वोत्तम लेख...

प्रत्येक शिवशंभुप्रेमी, सत्यइतिहासासाठी आग्रही असलेल्या प्रत्येकाने खालील लेख आवर्जून वाचावा हि कळकळीची विनंती...

इतिहासाची अक्षम्य विकृती

शुक्रवार, ६ जानेवारी , २०१७

इंद्रजित सावंत

शेवटी इतिहास महत्त्वाचा की भाषेचा फुलोरा असलेली राजसंन्याससारखी नाट्यकृती याचा निर्णय महाराष्ट्रालाच घ्यावा लागेल. राजसंन्याससारखी अनेक नाटके ओवाळून टाकावीत असा शिवछत्रपती आणि संभाजीराजांचा इतिहास आहे.
पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात बसवलेल्या नाटककार राम गणेश गडकरी यांचा अर्धाकृती पुतळा काढल्यानंतर या कृत्याच्या निषेधार्थ तथाकथित महाराष्ट्र् सारस्वत, कलाकार, नाटककार तसेच मुख्यमंत्र्यांपासून सर्वपक्षिय राजकारण्यांनी आपले भाषावैभव प्रकट केले. महाराष्ट्रातील पत्रपंडितांनी विविध माध्यमांतून या घटनेचा पंचनामा (एकांगी) केला. एकूणच नोटबंदी, कॅशलेसच्या बोजड चर्चेतून मोकळं होत या विषयानं मर्‍हाटी राज्याला ताजा विषय दिला. चर्चेची एकप्रकारे झोडच उठली मात्र हे सगळं होत् असताना एका निरूपद्रवी साहित्यिकाचा पुतळा या युवकांनी का काढला असावा याचा विचार, अभ्यास या मंडळींनी केलेला दिसत नाही.

राम गणेश गडकरी म्हणजे शब्दप्रभू, महान साहित्यिक, कवी आणि विसाव्या शतकातील सुरवातीची किमान पाच दशके ज्यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमी गाजवली असे नाटककार. गडकरी म्हणजे मराठी अस्मितेची तलवार आणि त्यांचे राजसंन्यास हे नाटक म्हणजे तर दिनानाथ मंगेशकर, कोल्हटकर, प्र.के. अत्रेंपासून पु.ल.देशपांडेंपर्यंत अनेक दिग्गजांच्या प्रेमाचा विषय.

आज काहीजणांच्यामते या राजसंन्यास नाटकाचे प्रयोग झालेच नाहीत असं असलं तरिही गडकरींनी त्यांच्या निधनापूर्वी बारसे केलेल्या बळवंत संगीत नाटक मंडळी म्हणजेच दिनानाथ मंगेशकर यांच्या नाटक कंपनीने या नाटकाचे संबंध महाराष्ट्रभर प्रयोग केले होते. याचे पुरावेही उपलब्ध आहेत.

गडकर्‍यांचे हे नाटक म्हणजे शिवपूत्र शंभूराजांवर लिहिलेली अपूर्ण कलाकृती. गडकर्‍यांच्याच शब्दांत सांगायचे तर "तत्वगर्भ नाटक" (principle play) आहे. संभाजीराजांवर वासुदेवशास्त्री खरेंपासून(गुणोत्कर्ष,इ.स.१८८५) या नाटाकापासून आजतागायत किमान ६०-७० नाटके लिहिली गेली आहेत. त्या अर्थानं एखाद्या व्यक्तिच्या चरित्रावर इतक्या मोठ्या संख्येनं नाट्यनिर्मिती होणं हाही एक विक्रमच म्हणला पाहिजे. मात्र यापैकी एखाद दोन अपवाद वगळता इतर नाटकांत बहुतांशी संभाजीराजांचे चित्रण, "प्रणयीयुवराज" (वा.न.शहा), बेबंदशाही (वि.ह.औंधकर), दुर्दैवी छत्रपती (श.गो.घैसास), चिडलेला छावा (श्री.कृ.ओक), थोरातांची कमळा (ना.के.सोनसुखार) इत्यादी नाटकांत संभाजीरांजांचे परस्त्री आकर्षण, रगेल व रंगेलवृत्ती चितारणारी आहेत. द.ग. गोंडसेंसारख्या साक्षेपी संशोधकांनाही "राजयाचा पूत्र अपराधी देखा" सारखं नाटक लिहिण्याचा मोह आवरता आला नाही.

गडकर्‍यां चे राजसंन्यास हे अपूर्ण नाटक अनेकांना नाट्य समीक्षकांना,लेखकांना भूल पाडणारं ठरलं. पु.ल. देशपांडे आणि ग.दि. माडगूळकर यांनी या नाटकातले संवाद म्हणत म्हणत कसा लढाखचा प्रवास पूर्ण केला याचे रसभरीत वर्णन "गुण गाईन आवडी" मधे केलेले आहे. तर नाट्य समीक्षक, लेखक डॉ. भीमराव कुलकर्णी लिहितात,"राजसंन्यासची सारी बैठकच मराठ्यांच्या इतिहासातील नेमक्या वैशिष्टयांला हात घालणारी आहे. महाराष्ट्र धर्माचे तत्त्व तिच्यामधून अविष्कृत झालेले आहे. तिच्यामधे शोकनाट्याने भरलेल्या मराठ्यांच्या इतिहासातील एका दुर्दैवी कालखंडाचे आणि पौरूष व पराक्रम यांचा संगम झालेल्या संभाजीसारख्या व्यक्तिमत्वातील आत्मविस्मृतेची जाणीव किती दारूण असते याचे प्रत्यंतर आढळते. राजसंन्यास नाटकात मधले काही अंक आणि प्रवेश लिहायचे राहिले आहेत. त्यामुळे उजाड माळावरच्या भव्य परंतू अपूर्ण अशा शिल्पासारखे ते भासते. तिच्यातील भव्यता ही अभिजाततेची (classical) व महाकाव्याच्या जातीची (epic grandure) आहे. तिच्यात परके वाटावे असे वातावरण किंवा कल्पना यांचा अंशही नाही, असे खास मर्‍हाटी आहे. अशा या राजसंन्यासाच्या जादूने हे मराठी विश्र्व भारावलेले होते व आहे.'

गडकरींना या नाटकाची प्रेरणा सिंधूदुर्ग किल्ला दूरून पहाताना सुचली. त्यानी कधीही रायगड पाहिला नाही. गडकरींनी ज्या कालावधीत म्हणजे, इ.स. १९१० ते १९१८ च्या दरम्यान ज्यावेळेस ते पुण्यात वास्तव्यास होते त्या कालखंडात हे नाटक लिहिले. इथे याचा उल्लेख यासाठी केला कारण कथा, कादंबर्‍या, नाटके लिहिताना त्या त्या काळाचा प्रभाव त्या त्या काळातील वैचारिक मतप्रवाहांचा परिणाम संबंधित लेखकाच्या लिखाणावर पडत असतो. आणि यावेळी म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरवातीला दोन तीन दशके पुण्यातील वातावरण फ़ुले, राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने भारावलेले होते. तर दुसरीकडे लोकमान्य टिळक, न.चि. केळकर अशी मंडळी सनातनी वृत्तीचे समर्थन करत होती. थोडक्यात यावेळेस पुण्यात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे जोरदार वादळ घोंगावत होते. या वादळाचा केंद्रबिंदू मराठ्यांच्या म्हणजेच शिवछत्रपतींच्या भोसलेकुळाचा इतिहास हाच होता.

सत्यशोधक आणि टिळकपंथीय दोन्ही गट लेख, भाषणे, पुस्तिका, ग्रंथ, नाटके, मेळे यांच्या माधमातून आपापल्या विचारांचा प्रचार - प्रसार करत होते तर काही कजाख विद्वान मराठ्यांचा इतिहास विकृत स्वरूपात मांडत होते. यातूनच मराठ्यांची अस्मिता, भोसले कुळाला बदनाम करण्यसाठीच्या कंड्या पिकविल्या जात होत्या. "तुझी बुक्की तर माझी लाथ" या न्यायाने जोरदार लढाई सुरू होती. या सार्‍याचा परिणाम गडकरींसारख्या नाटककाराच्या लेखणीवर पडला नसता तरच नवल होते. शिवाय गडकरी हे टिळकपंथीयांचे सेनापती न. चिं. केळकर यांच्या सतत संपर्कात होते. "राजसंन्यास"नाटक लिहिण्याची तयारी व लिहिल्यानंतरची पहिली वाचने केळकरांच्या माडीवरच केलेली होती, अशी भा. वा. धडफ़ळे यांची या संदर्भातली आठवण पुरावा म्हणून आहे. शिवाय या आठवणीतून राजसंन्यासचे मूळ केळकरांपर्यंत कसे पोहोचते याचिही माहिती आपणांस देतो. या आठवणीत धडफ़ळे लिहितात, "१९१७ साली एका दुपारी आम्ही गायआळीतून जात असताना राम गणेश गडकरी मास्तरांना केळकरांकडे जायची लहर आली. दारात शिरताच त्यांनी मोठ्या आवाजात तात्यांची चौकशी सुरू केली. गडकरी आत गेले व दोघेही (केळकर-गडकरी) तब्बल दोन तास गप्पा मारत बसले होते. तात्यांचे तोतयाचे बंड हाच गप्पांचा मुख्य विषय होता. गडकरींनीही आपल्या राजसंन्यास ची त्रोटक हकिकत सांगताना नाटकाच्या भाषेचा प्रश्न निघाला. तात्यासाहेबांनी पुष्कळ मार्मिक सूचना करून मराठी बखरीची दोन तीन जाडी पुस्तके आपल्या ग्रंथालयातून काढून गडकर्‍यांच्या हवाली केली व त्यांचा अभ्यास करून नाटकाची भाषा ठरवा असे सुचविले. त्या बखरी बरोबर घेऊन व दुपारचा चहा तेथेच घेऊन आम्ही चारच्या सुमारास जेवणासाठी तातडीने निघालो कै. गडकरींनी त्या बखरीतूनच आपल्या राजसंन्यासची भाषा बरोबर उचलली व पुढे कित्येक महिन्यांनी ते ग्रंथ तात्यासाहेबांकडे साभार परत पाठवले"

अशाच एका आठवणीत द.वि. परांजपे लिहितात,"मी माझे लिखाण उठल्या सुटल्या तात्यासाहेबांना (न. चिं. केळकर) वाचून दाखवित असे. मीच काय गडकरींसारखे काही अभिजात लेखकही आपल्या लिखाणाच्या गुंडाळ्या हातात घेऊन तात्यासाहेबांना त्यातील भाग वाचून दाखवावा म्हणून त्यांच्याकडे हेलपाटे घालताना मी नित्य बघत असे"

उपरोक्त उल्लेख मुद्दाम इथे उद्धृत केले आहेत. गडकरींचे हे नाटक असले तरिही त्यांना या नाटकाच्या संदर्भासाठी कुणाची मदत, मार्गदर्शन मिळत होते हे समजावा हा हेतू आहे. केळकरांनी पुरविलेल्या साधनांच्या, बखरीच्या दंतकथेच्या आधारावर आणि आपल्या लेखणीच्या सामर्थ्याच्या जोरावर गडकरींनी या नाटकातील पात्रांची रचना, संवाद फ़ुलवले व भाषेच्या संवादाच्या दृष्टीने मराठ्यांच्या इतिहासाची पूर्णत: प्रतारणा करणारे हे राजसंन्यास नावाचे नाटक निर्माण झाले.

या राजसंन्यास नाटकाच्या संवादातून, त्याच्या पात्रांच्या निवडीतून इतिहासाचा मोठा अपलाप झाला आहे. "गडकरी" सारख्या नाटककारांकडून असा प्रमाद घडला तर तो एकवेळ अक्षम्य ठरतो पण गडकरींनी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नाटक रचले ते न. चि.केळकर हे मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक होते, त्यांना या नाटकातील पात्रांचे नातेसंबंध व खर्‍या इतिहासातील व्यक्तिंचे नातेसंबंध माहित नव्हते असे कसे समजावे?

संभाजी राजाला "इष्कांच्या कैफ़ात" अडकविताना तो हिरोजी फ़र्जंद जे की खर्‍या इतिहासात शिवाजीराजांचे भाऊ लागतात त्याच्या मुलीशी "तुळशी"शी व्यभिचाराचे नाते ठेवतात. अशी पात्र रचना ठेऊन गडकर्‍यांना काय साधायचे होते? गडकरी फ़र्ग्युसन महाविद्यालयातील एका ललनेच्या प्रेमात व ती ललनाही यांच्या प्रेमात अखंड बुडलेली होती. पुढे गडकर्‍यांच्या या प्रेयसीचा विवाह एका संस्थानिकाशी झाला. यातून गडकर्‍यांनी केलेल्या उत्कट प्रेमाच्या खुणाही या नाटकात जाणवतात.

गडकर्‍यांची भाषा कितीही शेक्सपिअरशी नाते सांगणारी असली तरिही शेक्सपिअरच्या नाट्यकृतीत गडकर्‍यांनी केलेल्या नाट्यकृतीसारखा इतिहासाशी द्रोह दिसत नाही. गडकर्‍यांनी या नाटकात संभाजीराजांना स्वत:लाच रंडीबाज, छटका म्हणायला लावले. तसा शेक्सपीअरने त्याच्या नाटकातील मुख्यपात्राला रंडीबाजीत लोळवल्याचे उदाहरण नाही. गडकरींच्या नाटकातील संभाजीच्या तोंडी दिलेले संवाद नमुना म्हणून पाहायला हरकत नाही. गडकरींचा संभाजीराजा तुळापुरच्या औरंगजेबाच्या छावणीत त्याला सोडवायला आलेल्या साबाजीस म्हणतो, 'गोब्राह्मण प्रतिपालक हिंदुपदपादशहा श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज! नाही, साबाजी. ही माझी किताबत नाही! संभाजी म्हणजे केवळ रंडीबाज छाकटा!....'

हा संवाद संभाजीराजांच्या प्रस्थापित रूढ इतिहासातू गडक-यांनी लिहिला असावा. त्यावेळी म्हणजे ते नाटक लिहिले तेव्हा संभाजीराजांची प्रतिमाच तशी होती, असे गडकरी समर्थकांचे म्हणणे आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वीच्या या नाटकात त्यांची व्यक्तिरेखा त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधनांद्वारे रेखाटली गेली, असे समर्थन आज काही जण करत आहेत. मात्र वरील संवाद संपूर्णपणे वाचला, तर गडकरींना इतिहासाचे चांगलेच ज्ञान होते असे सिद्ध होते. या संवादात पुढे रायगडावरील गंगासागर या तलावाचाही उल्लेख आहे. त्यावरून त्यांना केवळ इतिहासाचेच नव्हे, तर ऐतिहासिक स्थळांचेही चांगले ज्ञान होते, असे सिद्ध होते. या संवादात चिटणीसाला हत्तीच्या पायी देण्याचा उल्लेख आला आहे, शिर्क्यांनी संभाजीराजांविरोधात केलेल्या बंडाचा उल्लेख आहे. हे उल्लेख संभाजीराजांच्या काळात झालेल्या घटनांचे चांगलेच ज्ञान गडकरींना होते याचेच निदर्शक आहेत.

गडकरींना संभाजीराजांचा इतिहासच अशुद्ध समजला म्हणून त्यांनी त्याचे नाट्यरूपांतर चुकीच्या पद्धतीने केले, हे मान्य केले, तरी याच नाटकात शिवाजी महाराजांबद्दल जिवाजीपंतांच्या तोंडी संवाद घालण्यात आले आहेत त्याचे समर्थन तर शक्यच नाही. 'शिवाजी नुसताच नावाला पुढे झाला. खरी करणी रामदासाचीच आहे' असे गडकरींचे जिवाजीपंत म्हणतात. हे स्पष्ट करणारा एक भलामोठा संवाद त्यांच्या तोंडी आहे. या संवादाची पेरणी कशाकडे निर्देश करते? बुद्धी शाबूत असलेला कोणता माणूस याचा केवळ नाटकातील संवाद म्हणून तरी स्वीकार करेल? शिवाजी महाराजांच्या गुरूपदाचा वाद त्यावेळी महाराष्ट्रात जोरदार घुमत होता. या नाटकाच्या निर्मितीच्या काळातच रामदासस्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होते की नव्हते यावर मंथन सुरू होते आणि याच दरम्यान पुण्यातील अनेक वर्तमानपत्रांतून आणि कृष्णाजी केळुस्कर गुरुजींच्या शिवचरित्रातून, दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास हे शिवरायांचे गुरू नव्हते हे वारंवार पुराव्यांसह मांडले जात होते. असे असूनही शिवरायांनी रामदासांच्या सांगण्यावरूनच स्वराज्य स्थापन केले अशा आशयाला बळकटी देणारे संवाद गडकरी आपल्या नाटकात देतात, हे बघता या नाटकाचे लेखन आणि निर्मिती विशिष्ट हेतू ठेवून झालेले नव्हते असे ठामपणे कसे म्हणायचे?गडकरींच्या 'राजसन्यास'नाटकाची ऐतिहासिक आणि मानसशास्त्रीय अंगाने समीक्षा करणे हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यामुळे इथे वानगीदाखल संवादांतील काही भागाचीच चिकित्सा केली आहे. आता शंभर वर्षांनंतर हा विषय अचानक ऐरणीवर कसा आला, अशी चर्चा सुरू झाली आहे. खरे तर हा विषय प्रस्तुत लेखकाने २००७ मध्ये'शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध आणि बोध' हे पुस्तक लिहिले तेव्हाच शिवप्रेमींच्या लक्षात आला होता. त्याआगोदर तीन चार वर्षं महाराष्ट्रात जेम्स लेन या विदेशी लेखकाच्या माध्यमातून जिजाऊंच्या चारित्र्यावर विकृत माहिती संशोधन म्हणून रूढ करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रयत्नामागे पुण्यातील एका विशिष्ट गटातील विद्वान कंपूचा हात होता असा संशय घेऊन ज्या भांडारकर संस्थेत राहून जेम्स लेनने असे विकृत लिखाण केले त्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून तिथल्या फ़र्निचरची मोडतोड केली होती. त्यानंतर ज्या पध्दतीने ज्ञानभंडारावर हल्ला, तालिबानी कृती अशा अत्यंत शेलक्या शब्दात याचा निषेध करण्यात आला. या घटनेनंतर महाराष्ट्रात एक अभ्यासाची, इतिहासाकडे खास करून शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे अत्यंत चिकित्सक दृष्टीने पाहण्याची, खोलात जाऊन अभ्यास करण्याची प्रस्थापितांनी तयार केलेल्या चित्र शिल्पांचा डोळसपणे वेध घेण्याची दृष्टी निर्माण झाली.

त्यातून शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असणार्‍या श्र्वानाच्या शिल्पाकडे प्रस्तुत अभ्यासकाने लक्ष वेधले आणि या श्र्वानाचा संदर्भ शोधताना हा वाघ्या कुत्रा ज्या चौथर्‍यावर बसवला आहे त्या चौथर्‍यावरील शिलाफ़लकावर गडकर्‍यांच्या राजसंन्यास या नाटकाची अर्पण पत्रिकाच कोरल्याचे लक्षात आले. एकतर या तथाकथित वाघ्या कुत्र्याचा शिवकालिन अस्सल साधनांत उल्लेख नाहीच शिवाय भाकडकथांनी भरलेल्या बखरीतही त्याचा उल्लेख नाही हे लक्षात आले. शिवाय हा पुतळा न. चिं. केळकरांच्या प्रेरणेने व प्रयत्नांमुळे इथे बसला आहे.शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक जिथे झाला ती स्वराज्याची राजधानी आणि आज शिवचरित्राचे प्रमुख ठिकाण असणार्‍या जागी बसवला गेला आहे. म्हणजे ज्याचा उल्लेख संदर्भ साधनात नाही अशी एक अनऐतिहासिक प्रतिमा शिवरायांच्या मुख्य गडावर त्यांच्या समाधी शेजारी प्रस्थापित करायची त्यावर शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची बदनामी केलेल्या नाटकाची अर्पण पत्रिका त्या नाटकाच्या लेखकाच्या नावासह कोरून ठेवायची, परत गोपाळ चांदोरकरांसारख्या वास्तुविशारदाने "शोध शिव समाधीचा"नावाची पुस्तिका लिहून प्रचलित अष्टकोनी शिवसमाधी ही समाधी खरी नसून शिवरायांची खरी समाधी ज्या ठिकाणी कुत्रा बसवला आहे ती आहे असे लिखाण करायचे. या सर्व गोष्टीमागे हेतू नाही असे कसे म्हणायचे?

या सर्व विषयावर आक्षेप घेतला गेला नसता तर कालांतराने कुत्र्याचे स्मारक जे की गडकर्‍यांनी नाटक लिहिल्यानंतर १७-१८ वर्षांनी इ.स. १९३६ ला स्थापित झाले ते ऐतिहासिक सत्य आहे (दहा वर्षांपूर्वीपर्यंत असेच मानले जायचे) मग त्यावरील गडकर्‍यांच्या नाटकाची अर्पण पत्रिका कोरली आहे म्हणजे त्या नाटकातील आशयही सत्याचा अंश आहे हे ही सिध्द करायला कितीसा वेळ लागेल?

कारण या रायगडावरील कुत्र्याचा जन्म गडकर्‍यांच्या राजसंन्यास नाटकातून झाला आहे. हे काल्पनिक कुत्रे जर रायगडावरील शिवरायांच्या समाधीशेजारी ऐटित बसत असेल तर गडकर्‍यांनी नाटकात लिहिलेल्या संभाजी महाराजांबद्दलचा मजकूरही सत्याचा शालू का नेसणार नाही? असा इतिहास अशुध्द होऊ नये या भावनेतून जसा हा काल्पनिक कुत्रा रायगडावरून काढावा अशी मागणी पुढे झाली तशीच छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने असणार्‍या उद्यानात असणारा राम गणेश गडकरींचा पुतळा हालवावा अशी मागणी पुढे आली. या मागणीबरोबर पुण्यातील लालमहालातील दादोजी कुलकर्णीचा पुतळाही हलवावा अशी मागणीही पुढे आली होती. बहुजन मराठ्यांच्या रेट्यामुळे व दादोजी कुलकर्णीचे इतिहासातील स्थान पुराव्याने सिध्द होत नसल्यामुळे हा पुतळा येथून
हलवला गेला. (लाल महाल बांधलाच गेला इ.स. १६५६-५७ सालात आणि दादाजीचा मृत्यू झाला १६४७ मध्ये)

नाटक, कादंबरी, चित्रपट या माध्यमातून मांडला जाणारा इतिहास म्हणून माणण्याचा कल, मानसिकता भारतीय समाजाची आहे. या माध्यमाचा प्रभावच खूप खोल आणि परिणामकारक असतो. याच नाटकांच्या. चित्रपटांच्या माध्यमातून संभाजीमहाराजांचे चारित्र्य बदनाम झाले.

राजसंन्यास नाटक जरी शंभर वर्षांपूर्वीचे असले तरी त्याचे प्रयोग कधीही होऊ शकतात आणि नाटक, चित्रपटाला इतिहास मानण्याच्या प्रवृत्ती वा.सी.बेंन्द्रे, डॉ.कमल गोखले अशा संशोधकांनी अथक प्रयत्नांनी पुढे आणलेल्या संभाजी राजांचा खरा इतिहास या नाटकांच्या आवरणाखाली झाकला जाऊ शकतो.

राम गणेश गडकर्‍यांच्या पुणे शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील पुतळा त्यांनी लिहिलेल्या राजसंन्यास नाटकाच्या पोटात दडलेला संभाजी महाराजांचा इतिहास सत्यच आहे अशी मांडणी करण्यासाठी एकप्रकारे ऐतिहासिक साधन म्हणून वापरला जाऊ शकतो. या पुतळ्याच्या खाली असलेल्या शिलाफलकावर गडकरींचा गौरव आहे. त्यांनी राजसन्यास, एकच प्याला अशा नाटकांची निर्मिती केली. म्हणून या ठिकाणी त्यांचा पुतळा बसवण्यात आला, असा उल्लेख आहे.

राम गणेश गडकरी यांच्या भाषावैभवासाठी,कवित्वासाठी त्यांचा सन्मान जरूर करावा पण 'राजसंन्यास'सारखी हजारो नाटके ओवाळून टाकावीत अशा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी त्याची सांगड घालू नये.

शेवटी महाराष्ट्राचा इतिहास महत्त्वाचा की भाषेचा फुलोरा असलेली राजसंन्याससारखी नाट्यकृती याचा निर्णय महाराष्ट्रालाच घ्यावा लागेल. यासाठी इतिहास संशोधक शेजवलकरांनी संभाजी महाराजांवरच्या नाटकांचे केलेले परीक्षण आणि निरीक्षण उपयोगी ठरावे.

शेजवलकर म्हणतात, 'नाटकातील खोटे काल्पनिक प्रवेश निर्माण करून त्यात तितक्याच काल्पनिक संवादांचा मालमसाला भरून ऐतिहासिक व्यक्ती समाजापुढे मांडणे गैर आहे, असे आम्हाला वाटते. यात ब-याच व्यक्तींना अलौकिक गुण चिकटवण्यात येतात आणि वाईट माणसांना प्रमाणाबाहेर बदनाम करण्यात येते. नाटकापासून प्रेक्षक काय अपेक्षितात तो त्यांचा प्रश्न पण इतिहासाची ही अक्षम्य विकृती व हानी आहे, असे आम्हांस वाटते.'

(लेखक इतिहास संशोधक आहे)

#सत्यालामरणनाहीच

11/03/2025

डोक्याचा भुगा करणारी पोस्ट

मिसिंग लिंक

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराणी येसूबाई आणि छत्रपती संभाजीपुत्र शाहूराजे कैद झाले. पुढची अनेक वर्षे ते औरंगजेबाच्या कैदेत होते.

कैदेत होते म्हणजे अगदीच कैदेत होते असे नाही.

शाहूंना औरंगजेबाने प्रतिष्ठित आणि मोठी म्हणजे 7 हजाराची मनसबदारी दिली होती, त्यांना आणि येसूबाईंना दक्षिण गुजरात, सुपा, नेवासा, खरगोन, खानदेश, अक्कलकोट आणि बारामतीची सुभेदारी किंवा देशमुखी दिली. (या सगळ्या त्याकाळात मोठ्या सोन्याच्या पेठा होत्या म्हणजेच भक्कम महसूल देणाऱ्या जागीरी होत्या)

त्यांचा स्वतःचा छोटेखानी दरबार होता, अनेक पंत सरदार मंडळी त्यांच्यासोबत त्या दरबारात होती, स्वतःचा खजिना होता.

शाहू महाराजांना राजा हा खिताब दिला गेला, शाही खानदानाचा दर्जा दिला जो आमेरच्या राजपुतांशिवाय इतर कुण्याही बाहेरच्याला दिला गेला नव्हता.
(आमेरचे राजपुत मुगल खानदानाचे ननिहाल होते, रक्ताचे नातेवाईक. जहांगीर, शाहजहाँ आणि औरंगजेब यांच्चा रक्त राजपूत जास्त होता, मुगल, तुर्क, फारसी कमी)

येसूबाई संपूर्ण काळ इज्जतीने राहिल्या, औरंजेबाच्या मुलीच्या सानिध्यात राहिल्या, शाही परिवारात राहिल्या. त्यांच्यावर शाही कायदे लागू होत आम कायदे नाही. आग्रा दिल्लीत त्यांच्या शाही हवेल्या होत्या.

औरंगजेबाची मुलगी झिनतुलनीसा औरंगजेबाची सिनेमात दाखवल्याप्रमाणे चमची नव्हती, मुघल सल्तनीत दोन नंबरचा पद म्हणजे 'पादशाह बेगम' या पदावर विराजमान होती. 12 हजाराची म्हणजे सर्वात मोठी मनसबदार होती.
(औरंगरंजेबाच्या सुरुवातीच्या काळाची 'पादशाह बेगम' त्याची मोठी बहीण जहाँआरा बेगम होती, औरंगरंजेबने जंजिया आणि जकात हे कर कम्पल्सरी केल्यावर नाराज होऊन तिने हे कर आपल्या खजिन्यातून सब्सिडाइज्ड करून टाकले होते)

मूळ नाव शिवाजी असलेल्या शाहूंना औरंगजेब शाह म्हणतो, इतका म्हणतो शिवाजीचं नावच शाहू पडून जातो. (साहू वगैरे वाद कुणी घालू नये, तत्कालीन सर्व फारसी, इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज साधनात सीवा, संभा, साहू अशेच उल्लेख आहेत, शिवा, शाहू असे नाहीत)

तो शाहू महाराजांची दोन लग्नें धुमधडाक्यात लावून देतो, साध्यासुध्या घराण्यात नाही तर राजेशिर्के सारख्या जुन्या प्रतिष्ठित घराण्यात.

औरंगजेब शाहूंना जब्त केलेली शिवाजी महाराजांची भवानी तलवार परत देतोच पण शिवाजी महाराजांच्या शौर्याची निशाणी म्हणून अदिलशाहीतून जब्त केलेली अफजल खानाची सोन्याने मढलेली तलवार सुद्धा शाहूंना भेट करतो.

तोच औरंगजेब संभाजीराजांचा छळ करतो निर्घृण खून करतो, आणि संभाजीराजांच्या पत्नीला मुलाला इतके औदार्य कसे काय दाखवतो?

पुढे छत्रपती झाल्यानंतर 1714 साली संभाजीराजांचे एकुलतेएक सुपुत्र शाहू महाराज श्रद्धांजली वाहायला औरंगजेबाच्या कबरीवर जातात, तेही नंगेपाव.

1707 साली औरंगजेबाच्या मृत्युंनतर, 1714 पर्यंत काळ खूप बदलला होता, मराठे शाहूंच्या नेतृत्वात संघटित तर मुगल अंतर्गत खानाजंगीमुळे कमकुवत व्हायला लागले होते.
मराठ्यांच्या या स्वयंभू छत्रपतीला आपल्या पित्याला 40 दिवस तडपवून तडपवून मारणाऱ्या माणसाच्या कबरीवर नंगेपाव जाऊन फुले वाहण्याची, अन्नछत्र लावण्याची कसलीच मजबुरी नव्हती.
मग छत्रपती शाहू महाराजांनी असं का बरं केलं असेल?

हे कोडे बुद्धीला न पटणारे आहे. याला इंग्रजीत पॅराडॉक्स म्हणतात म्हणजे झालेल्या (किंवा सांगितलेल्या) घटनात भयंकर विरोधाभास. फक्त औरंगजेबाकडूनच नाही तर दस्तुरखुद्द संभाजीपुत्र शाहू महाराजांकडून सुद्धा.

काहीतरी मिसिंग लिंक जरूर आहे.

बरं बहादूरगडाच्या ज्या नेमक्या ठिकाणी संभाजीराजांना कैद ठेवलं होतं, डोळे फोडले गेले तो ठिकाण एक जिवंत मंदिर होता, आत्ताही आहे.
ज्या नेमक्या ठिकाणी खून केला गेला तो ठिकाण तुळापूर एक संगम तीर्थक्षेत्र. औरंगजेबाच्या तळापासून 100 किलोमीटर लांब, हत्या करायला इतक्या लांब कुणी घेऊन जातं का?
तोही तीर्थक्षेत्री?

बहादूरगडावर कैद ते हत्या यात जवळपास एक महिन्याचा फरक कसा?

मुगल सरकार असली तरी ही तीर्थक्षेत्र नेमकी त्याकाळात कुणाच्या ताब्यात होती?
हत्येसाठी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीची अमावस्याच का निवडली? अमावस्या पूर्णिमा कोण मानतो?

तीर्थक्षेत्राबाबत मुगलांची नेमकी नीती काय होती?
हिंदू आणि वैदिक धर्मांतर्गत बाबीत मुगलांची नेमकी नीती काय होती?

जवळच म्हणजे वेरुळजवळचा ज्योतिर्लिंग घृष्णेश्ववरची, त्र्यंबकेशवरची, ओंकारेश्वर, महाकाल, परळी आदींची स्थिती काय होती?

ताबा कुणाचा होता, धर्मांतर्गत बाबीत कायदा कुणाचा चालायचा? धर्मांतर्गत बाबीत न्यायव्यवस्था कशी होती?

अकबरच्या काळापासून मुघलांचे सर्व राजपुत्र आणि राजपुत्री दीन प्रमाणेच कला साहित्यात पारंगत केले जात, करिक्युलममध्ये रामायण महाभारत होते, अगदी तिबेटच्या बौद्ध धर्मगुरूंना बोलावून बौद्ध धम्माचं शिक्षण सुद्धा महत्वपूर्ण भाग होता.

पण वेद नाही, का?

औरंगजेबचा मोठा भाऊ आणि युवराज दारा शिकोह, याने काशीत जाऊन काही वर्षे वेदाभ्यास केला होता, गैर ब्राह्मणाने वेदाभ्यास केला म्हणून, काशीच्या काही धर्ममार्तंडांनी त्याच्या विरुद्धच फतवे काढले होते.
पुढे औरंगजेबाने दारा शिकोहचा काटा काढताना या फतव्यांचा सुद्धा उपयोग केला.

औरंगजेबच्या कारकिर्दीत नौकरशाहीत ब्राह्मण आणि कायस्थांची संख्या संपूर्ण मुघल इतिहासात कधी नव्हे इतकी वाढली.

संभाजीराजे तत्कालीन रिवाजाप्रमाणे ब्रह्महत्या, संस्कृत, वेदपठण याचे दोषी होते.

चिंचवड, पैठण, त्र्यम्बक आणि कशी या सनातन्यांच्या धर्मन्यायालयांची याबाबत भूमिका काय होती. नेमक्या त्यावेळची त्यांची कागदपत्रे काय म्हणतात? कुठे आहेत?

वयाच्या सोळाव्या वर्षी औरंगजेबाने अहमदनगरच्या निजामशाहीवर निर्णायक विजय मिळवला, आणि तो दख्खनचा सुभेदार नेमला गेला. बादशहाच्या पदासाठी झालेल्या भावाभावांच्या खानाजंगीत औरंगजेबाची ताकद होती त्याची दख्खनी फौज, यात त्याकाळापासूनच मराठा सरदार महत्वपूर्ण होते. शिवाजी महाराजांचे आजोळ म्हणजे सिंदखेडचे जाधव हे सुद्धा याच दख्खनी फौजेत होते.

त्याकाळी शहाजीराजे भोसले आपल्या फौजेत यावेत म्हणून औरंगजेबाने फार प्रयत्न केले, ते काही काळ मुघल फौजेत राहिले सुद्धा पण नंतर अदिलशाही फौजेत रुजू झाले.

शिवाजी महारांनी किमान चार वेळा तुमच्यात शामिल होतो असे औरंगजेबाला सांगितले आणि औरंगजेब प्रत्येकवेळी तयार सुद्धा झाला.

संभाजीरांचा प्रकरण एकंदरीत 'मिसिंग लिंक' मुळे संशयास्पद आहे.

शाहुराजांना मात्र तो राजा खिताब देऊन 7 हवजारांची मोठी मनसबदारी देतो.

एकंदरीत औरंगजेब वय वर्षे 16 ते 89 या 70-75 वर्षात भोसल्यांच्या चार पिढ्यांशी डील करतो, यात भोसल्यांनी वेगळी चूल मांडू नये, राजपुतांप्रमाणे स्वायत्त पण मुगलांच्या साम्राज्यात राहावं अशी त्याची तीव्र इच्छा दिसते.

शेवटी डोक्याचा भुगा करायला अनेकानेक प्रश्न आणि परस्पर विरोधाभासी घटना, व्यावहार आहेत.

आम्ही इतिहासाचे विद्यार्थी, इतिहास जाणून घ्यायला वाचतो (सिनेमे बघून इतिहास जाणून घेत नाही) संशोधन आमचा काम नाही, व्यवसाय सुद्धा नाही.
..पण संशोधकांनी मिसिंग जरूर लिंक शोधावी...

- पंकज कुमार

09/01/2025







04/01/2025

Address

Jagdale Estate, Post Bastavade, Ta Kagal
Kolhapur
416235

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 6pm - 11pm

Telephone

+954547567

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठा क्रांती न्यूज नेटवर्क posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मराठा क्रांती न्यूज नेटवर्क:

Share