25/03/2023
‘मी महाकवी दु:खाचा प्राचीन नदी परी खोल’ असे म्हणणाऱ्या
कवी ग्रेस यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम *‘कवी जातो तेंव्हा..’**
‘ पोएट्री इस नॉट माय अचीवमेंट सर, इट्स अ कंपल्सिव्ह गिफ्ट ऑफ माय मदर अँड माय मास्टर सर !’ असं म्हणणारे कवी ग्रेस, यांच्या वरचा हा "सांगीतिक नाट्य अभिवाचनाचा" कार्यक्रम आहे.
‘कठीण भाषेत सांगितले तर ते दुर्बोध आणि सोप्या भाषेत सांगितले तर हे काय सांगता असा प्रश्न लोक करतात, पण माझी जगण्याची एक तऱ्हा आहे आणि मी आपल्याच तऱ्हेने जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे’, असे सांगणारे माणिक सीताराम गोडघाटे अर्थात कवी ग्रेस!
कवी ग्रेस यांच्या अकराव्या स्मृतीदिनानिमित्त ‘कवी जातो तेंव्हा..’ हा त्यांच्या ललित बंधावर आधारित सांगीतिक नाट्य अभिवाचनाचा अनोखा असा कार्यक्रम रविवार दिनांक 26 मार्च 2023 रोजी नागपूरात विष्णू मनोहर यांनी आयोजित केला आहे. "जागर" तर्फे या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात
आल्याची माहिती दिग्दर्शक अमित वझे यांनी दिली.
"स्वगतामध्ये भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगतामध्ये श्रोता नसतो तर कवी स्वत: निर्माता असतो. त्यामुळे कुणाची पर्वा करायची नसते, पण हे स्पष्ट करतो की, मी ज्ञानाचे सोंग करत नाही आणि अज्ञान मिरवत नाही, ज्ञानर्षीचा अवमान करत नाही. मी शब्दकोषांना नवे शब्द देणारा कवी आहे", असे सांगणाऱ्या कवी ग्रेस यांच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम रसिकांना या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.
कवी ग्रेस यांच्यावर "सांगीतिक नाट्य अभिवाचनाचा" फॉर्म असलेला हा कार्यक्रम कवितांचे वाचन, गायन अन् चर्चा अशा त्रिसूत्रीत बांधलेला आहे.
कविता समजून घ्यायची प्रक्रिया नेमकी काय असते? आपल्या आयुष्यात कवींचं नेमकं काय स्थान असतं? कवी कायमचा जातो... तेव्हा भाषेला काय इजा होते? या सगळ्याविषयी आणि संबंधित इतर विषयां बाबतित भाष्य करणारा हा कार्यक्रम आहे.
हा कार्यक्रम सर्व रसिकांना आणि विशेषतः ग्रेसप्रेमींना एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाईल याची खात्री आहे.
ग्रेस यांच्या ‘वाऱ्याने हलते रान’ या ललित लेखसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे.
दि. 26 मार्च 2012ला कवी ग्रेस यांचे निधन झाल्यानंतर अनुभव मासिकात डॉ. समीर वसंत कुलकर्णी यांचा ‘कवी जातो तेंव्हा...’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखाचीच डॉ. कुलकर्णी यांनी रंगावृत्ती त्याच नावाने साकारली आहे. या कार्यक्रमात गजानन परांजपे, अमित वझे, जयदीप वैद्य, अपर्णा केळकर आणि कौस्तुभ देशपांडे यांचा सहभाग आहे. अपर्णा केळकर, जयदीप वैद्य आणि निनाद सोलापूरकर यांचे संगीत आहे.
शनिवार, दि. 26 मार्च रोजी "सायंटिफिक सभागृह" नागपूर येथे सायंकाळी 6.30 PM वाजता रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे.
-=-=