07/07/2025
आरोग्य संस्थांच्या बांधकामास स्थगिती देणाऱ्या अध्यादेशाची लातूरात होळी
माझं लातूर परिवाराच्या वतीने सरकारचा निषेध
लातूर दि. राज्यातील आरोग्य संस्थांच्या बांधकामास स्थगिती देणारा अध्यादेश शासनाने काढला आहे. यामुळे लातूर जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्न पुन्हा प्रलंबित पडला आहे. याचा निषेध करत आज सायंकाळी महात्मा गांधी चौकात माझं लातूर परिवाराच्या वतीने शासनाच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली. शासनाचा निषेध करण्यात आला.
राज्य शासनाच्या वतीने 29 मे 2025 रोजी एक अध्यादेश काढण्यात आला आहे. यामध्ये दि.२९ मे २०२५ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने एक शासन निर्णय काढण्यात आला. आरोग्य संस्थांच्या मंजूर बांधकामामध्ये शिस्त आणण्याबाबत अशा गोंडस नावाने काढलेला हा शासन आदेश लातूरकरांच्या मुळावर उठला आहे. या निर्णयात नमूद केले आहे की, अनेक ठिकाणी नवीन आरोग्य संस्था, श्रेणी वर्धन ची कामे मंजूर करण्यात आली आहेत. अनेक कामे रखडत आहेत. त्याचा विपरीत परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. त्यामुळे जी बांधकामे आधीच हाती घेण्यात आलेली आहेत ती बांधकामे तातडीने पूर्ण करणे व तेथे लवकरात लवकर आरोग्य सेवा उपलब्ध करणे आवश्यक आहे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, इतर रुग्णालये, श्रेणीवर्धित रुग्णालयाचे बांधकाम शासन निर्णय निर्गमीत होण्याच्या दिनांकास सुरू करण्यात आलेले आहे किंवा ज्या संस्थांच्या बांधकामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत अशी सर्व बांधकामे पूर्ण करून कार्यान्वित करणे आवश्यक आहे. ही कामे पूर्ण झाल्याशिवाय इतर कोणत्याही नवीन आरोग्य संस्थांची बांधकामे मंजूर किंवा सुरू करता येणार नाहीत. ज्या आरोग्य संस्थांची बांधकामे मंजूर आहेत मात्र ज्यांचे बांधकाम सुरू झाले नाही किंवा ज्यांच्या बांधकामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले नाहीत त्यांच्या निविदा काढण्यात आल्या असल्या तरीही अशा सर्व आरोग्य संस्थांच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याचा निषेध करत माझं लातूर परिवाराच्या वतीने गांधी चौकात या अध्यादेशाची होळी करण्यात आली. शासनाचा निषेध करत बोंब ठोकण्यात आली. यावेळी दिपरत्न निलंगेकर, अभय मिरजकर, मासूम खान, सोमनाथ मेदगे, शशिकांत पाटील, उमेश कांबळे, सुनिल गवळी, उमाकांत ढवारे, ञिंबक स्वामी, नितीन बनसोडे, मच्छिंद्र कांबळे, संजय बुच्चे, लिंबराज पन्हाळकर, इरफान शेख, सचिन साळुंके, ञिशरण मोहगावकर, विवेक जगताप, मनोज शिंदे, प्रकाश कंकाळ, हणमंत पडवळ , असिफ पटेल, यांच्या सह इतरांची उपस्थिती होती.