31/08/2026
लातूर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; महाराणा प्रताप नगरमधील तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा, १३ जणांवर गुन्हे दाखल
लातूर नेता डिजिटल न्युज | प्रतिनिधी:
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने आक्रमक मोहीम सुरू ठेवताना लातूर शहरातील महाराणा प्रताप नगर परिसरातील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली आहे. या कारवाईत १३ जणांना जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ४४ हजार ८० रुपयांची रोकड, जुगाराचे साहित्य आणि १० दुचाकी वाहनांसह एकूण ८ लाख ६४ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाराणा प्रताप नगर येथील एका शेतात तिर्रट नावाचा जुगार खेळवला जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यादरम्यान पत्र्याच्या शेडमध्ये दोन वर्तुळांमध्ये काही इसम गोलाकार बसून पत्त्यांच्या सहाय्याने जुगार खेळताना व खेळवताना रंगेहात सापडले.
घटनास्थळाची अंगझडती घेतली असता जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. तसेच, जुगार खेळण्यासाठी आलेल्या इसमांच्या १० दुचाकी वाहनांची किंमत अंदाजे ८ लाख २० हजार रुपये इतकी असून ती देखील पोलिसांनी जप्त केली आहे. एकूण ४४ हजार ८० रुपयांची रोकड आणि वाहने मिळून ८ लाख ६४ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमातील कलम १२ (अ) अन्वये पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर येथे कायदेशीर कारवाई नोंदविण्यात आली आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने व पथकातील पोलीस अंमलदारांनी पार पाडली. जिल्ह्यात अवैध जुगार व इतर अवैध धंद्यांविरुद्ध अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
LTN News Amit V. Deshmukh DIO,latur, ज़िल्हा माहिती कार्यालय, लातूर Collector & District Magistrate, Latur Latur Police Department Latur City Municipal Corporation LCMCOfficial Ajeet Patil Kavhekar Abhay Salunke Abhimanyu Pawar Sanjay Bansode LTN News Latur News Latur Latur Netaji Jadhav लातूर वृत्त प्रवाह Latur Vrutt Pravah