15/11/2025
आज दै. एकमत साखरपेरणी विशेषांकमध्ये माझा लेख प्रसिध्द झाला आहे, धन्यवाद संपादक – दै. एकमत
लातूरचा मांजरा पॅटर्न: सहकार आणि साखर उद्योगातून ग्रामविकासाचा महामार्ग
एक काळ होता, जेव्हा लातूरच्या ग्रामीण जीवनात सकाळ-संध्याकाळ प्रत्येक घरात शेतकऱ्याची कहाणी घुमत असे. ती कहाणी फक्त शेतीची नव्हती, तर ती होती सर्वांनी पाहिलेल्या एका स्वप्नाची. ज्यामध्ये शेतकरी केवळ कष्टकरीच नव्हे, तर आपल्याच मालकीच्या कारखान्याचा 'मालक' बनला होता. एका उसाच्या कांडीपासून सुरू झालेला सहकाराचा प्रवास आज लातूरच्या विकासाचा दीपस्तंभ झाला आहे. लातूर जिल्ह्याच्या मातीत रुजलेली सहकाराची नीती आणि मांजरा साखर कारखाना परिवाराचा उदय हा केवळ एक औद्योगिक चमत्कार नसून, कोरडवाहू मराठवाड्याच्या ग्रामविकासाचा एक प्रेरणादायी प्रवास आहे.
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टी आणि माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी पेरलेल्या बीजातून सहकारातून समृद्धीचा एक भव्य वटवृक्ष उभा राहिला, ज्यामुळे लातूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा आणि समाजकारणाचा कायापालट झाला. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील म्हणत की, "सहकार ही केवळ एक चळवळ नाही, तर ती दुर्बलांना बलवान बनवून समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा एक मार्ग आहे." जणू ही उक्ती मांजरा परिवाराच्या रूपाने सार्थकच झाली आहे.
स्वातंत्र्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीसाठी महात्मा गांधींच्या 'ग्रामस्वराज्य' आणि 'आत्मनिर्भर ग्राम' या विचारांतून सहकाराची संकल्पना पुढे आली. महाराष्ट्रात, विशेषतः लातूर जिल्ह्यात या चळवळीची बीजे पेरली गेली, जेव्हा शेतकऱ्यांच्या एकीकरणातून एक मोठी सहकारी संघटना उभी राहिली.
महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनात 'सहकार' ही केवळ एक संकल्पना नसून, ती शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांचा आणि सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचा पाया आहे. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांची एक मोठी चळवळ उभी राहिली.
मागासलेल्या मराठवाड्यात मांजरा साखर कारखान्याच्या स्थापनेचा इतिहास हा याच दूरदृष्टीचा अविभाज्य भाग आहे. सन १९९० च्या दशकात, मराठवाड्यासारख्या अवर्षणप्रवण भागात साखर कारखाना उभा करणे हे धाडसाचे काम होते. ‘विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्या’चे उद्घाटन आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या हस्ते झाले, ही घटना सहकाराच्या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे प्रतीक आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी कारखान्याला त्यांचे ‘जीव की प्राण’ मानले, तर सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी नियोजनबद्ध आणि पारदर्शक नेतृत्वाने या संस्थेचे संगोपन केले, ज्यामुळे हा कारखाना यशाच्या शिखरावर पोहोचला.
सहकारातून समृद्धी हा मांजरा परिवाराचा मूलमंत्र ठरला. मांजरा साखर कारखान्याचा आदर्श घेऊन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विलास कारखाना उभारला. कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख आहेत आज हा कारखाना आधुनिक साखर उद्योगासाठी पथदर्शी ठरला आहे. यानंतर लातूर जिल्ह्यासह परिसरातील जिल्ह्यांची गरज ओळखून ट्वेन्टिवन शुगर्स लिमिटेडची उभारणी करण्यात आली आहे.
या साखर उद्योगाने ग्रामीण भागातील आर्थिक प्रवाह पूर्णपणे बदलला आहे. शेतकरी उद्योगाचा मालक झाला, सहकार मॉडेलमुळे शेतकरी केवळ ऊस उत्पादक न राहता, कारखान्याचा ‘भागीदार’ (मालक) बनला. यामुळे त्यांच्यात मालकी हक्काची भावना वाढली आणि कारखान्याच्या नफ्यात वाटा मिळू लागला. मांजरा परिवाराने सातत्याने एफआरपी (FRP) पेक्षा अधिक उच्चांकी भाव देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण केले.
स्थानिक रोजगाराच्या संधी: साखर कारखान्यासोबत अनेक उप-उद्योग उभे राहिले, ज्यामुळे लातूर जिल्ह्याचा कायापालट झाला. इथेनॉल, कोजनरेशन आणि अन्य कृषी-आधारित उद्योगांमुळे हजारो युवकांना गावातच रोजगार मिळाला.
या सहकारातून महात्मा गांधींचे ग्रामविकासाचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले. कारखान्यांनी केवळ आर्थिक व्यवहार केले नाहीत, तर सामाजिक एकात्मतेचा धागा विणला. आर्थिक उलाढाल वाढली, पायाभूत सुविधांचा विकास झाला, साखर कारखान्याभोवती शिक्षणसंस्था, आरोग्य केंद्रे, रस्ते आणि पाणीपुरवठा योजना विकसित झाल्या.
सहकारातून सर्वसमावेशक विकासाची वाटचाल झाली, यामध्ये स्त्री-पुरुष, शेतकरी-कामगार यांचा समतोल विकास साधला गेला. महिला बचतगटांना कारखान्याच्या उपक्रमांशी जोडून महिला सक्षमीकरण साधले. या महिला सक्षमीकरण योजनेतून महिला बचत गटांना गृहउद्योग आणि दुग्ध व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळाले.
नेतृत्व करण्याची संधी तळागाळातील लोकांना मिळाली, ग्रामीण भागातील नेतृत्वाला सहकारातून मिळालेली ही सुवर्णसंधी ठरली. माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (LDCC) शेतकऱ्यांना ₹ १७०० कोटींचे पीक कर्ज दिले, तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून ४ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना घडवले, जे नेतृत्वाच्या विकासाचे उत्तम उदाहरण आहे.
काळाची पाऊले ओळखून साखर उद्योगात ऊसशेतीचे यांत्रिकीकरण हा मांजरा परिवाराचा सर्वात यशस्वी आणि दूरदृष्टीचा प्रयोग ठरला आहे. १००% यांत्रिकीकरण करून मांजरा साखर कारखान्याने ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरणाचा धाडसी प्रयोग यशस्वी केला. विलास सहकारी साखर कारखान्यानेही ६० ते ७० टक्के यांत्रिकीकरण केले. ट्रेंचर (लागवड यंत्र), हार्वेस्टर (तोडणी यंत्र) आणि ड्रिप सिंचन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला. या यांत्रिकीकरणातून स्थानिक शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांसाठी उद्योगातून रोजगार निर्मिती झाली. हार्वेस्टर ऑपरेटरला ₹ ५० हजार आणि ट्रॅक्टर ड्रायव्हरला ₹ २५ हजार पर्यंत पगार मिळतो, ज्यामुळे ग्रामीण युवकांना प्रतिष्ठा आणि स्थैर्य मिळाले आहे.
मांजरा परिवाराचा विकास पर्यावरणपूरक आणि शाश्वत आहे. यामुळे या भागात ऊस कल्पवृक्ष ठरला असून, विविधीकरण करून आणि हरित ऊर्जा माध्यमातून साखर उत्पादनासोबतच इथेनॉल, सहवीज (कोजनरेशन), बायोगॅससह बायो-प्लॅस्टिक यांसारख्या उप-उत्पादनांवर भर देण्यात येत आहे. भविष्यात ज्वारी, मका आणि इतर धान्यांपासून इथेनॉल निर्मिती करण्याचे नियोजन आहे. यामुळे कोरडवाहू पिकांनाही चांगला दर मिळेल आणि कारखाने बारमाही चालून रोजगार वाढेल.
मांजरा साखर परिवाराने लातूर जिल्ह्याच्या मातीत विकासाची आणि सामाजिक सलोख्याची संस्कृती रुजवली. पारदर्शक व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक बांधिलकी यांचा त्रिवेणी संगम साधत मांजरा परिवाराने लातूर जिल्ह्याच्या समृद्धीचा आणि ग्रामीण आत्मनिर्भरतेचा 'मांजरा पॅटर्न' देशासमोर ठेवला आहे. गाव, शेतकरी आणि उद्योग — हे तीनही हात एकत्र येऊन गोड साखरच नाही, तर गोड जीवनही तयार करतात, आणि हाच आहे लातूरच्या सहकाराचा खरा गोडवा.