23/09/2025
कोणत्याही मुसळधार पावसाला ढगफुटी शब्द वापरण्याचा एवढा अतिरेक झालाय कि खऱ्या ढगफुटीसाठी पर्यायी शब्द शोधण्याची वेळ आली आहे. प्रत्येक मुसळधार पाऊस ढगफुटी नसते, नदीला पूर आला म्हणजे ढगफुटी नसते, शहर पाण्याखाली गेले म्हणजे ढगफुटी नसते. मुसळधार, अति मुसळधार, अतिवृष्टी असे काही पावसाचे प्रकार असतात. आणि यापुढे ढगफुटी असते.
ढगफुटीचे काही निकष असतात. सामान्यपणे एका तासात १०० मिमी जास्त पाऊस म्हणजे ढगफुटी समजले जाते. (दिवसभरात १०० नाही, तासाभरात १००) ढगफुटीवेळी ढगांची उंची १५ किलोमीटरपर्यंत असते. सामान्यपणे ढगफुटी १०-१५ किमी परिसरात होत असते, त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणी सामान्य किंवा मुसळधार पाऊस असू शकतो. हा पाऊस ५ मिनिट ते २-३ तास पडू शकतो. काही वेळा एखाद दिवस सुद्धा होतो. (उदा. मुंबई २६ जुलै). ढगांतून पाण्याचा खाली येणारा लोंढा इतका प्रचंड असतो कि काही वेळा त्याच्या वेगामुळे जमिनीवर जोराचे वारे वाहायला लागते.
जगात १ मिनिटात ३६ मिमी, ५ मिनिटात ६६ मिमी, १५ मिनिटात २०० मिमी, १ तासात ४०० मिमी, १ दिवसात ११०० मिमी आणि दोन दिवसात १८०० मिमी पावसाचे रेकॉर्ड आहेत. मुंबईचा २६ जुलैचा दिवसभरात पडलेला १००० मिमी पाऊस सुद्धा ढगफुटीचा प्रकार होता.
पण आता या शब्दाचा अति भडीमार सुरु आहे. मुसळधार पाऊस या शब्दाचे गांभीर्य कमी वाटते म्हणून ढगफुटी, ढगफुटीसदृश्य पाऊस असे शब्द सर्रास वापरणे सुरू आहे. ढगफुटीसदृश्य असे काहीच नसते, त्याला मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस म्हणतात. नदी नाल्यांना पूर आला तरी त्याला ढगफुटी म्हणण्याची पद्धत रूढ झाली आहे. पण मुसळधार पावसाच्या परिस्थितीत ५०-६० मिमी पाऊस पडला तरी नदीला मोठा पूर येऊ शकतो. (दिवसभरात ६० मिमी पाऊस पडला तरी त्याला अतिवृष्टी म्हटले जाते)
_
काल पुण्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला, सगळीकडे पाणी साचले तर लगेच सगळे ढगफुटीचा निकष लावून मोकळे झाले. पण पावसाचे आकडे पहिले तर तीन तासात २०-३० मिमी पाऊसच झालेला दिसत आहे, काही ठिकाणी तीन तसात ७० मिमी पाऊस झालेला आहे. याला ढगफुटी म्हणायचे म्हटल्यावर तासाला १० मिमी पावासाला मुसळधार म्हणावे लागेल. मग रिमझिम पाऊस कशाला म्हणायचं?
त्या पुण्यात नाले बंद केलेत, ओढे बुजवून टाकलेत, पाणी जिरण्याचे मार्ग बंद केलेत, ड्रेनेज लाईन ४० वर्षांपूर्वीच्या आहेत, सगळं शहर काँक्रीटने झाकलं आहे, तिथे तासाभरात १०-२० मिमी पाऊस सुद्धा पुरेसा आहे कमरेइतके पाणी साचण्यासाठी. मुंबईचं जे आधीच झालेलं आहे तेच आता पुण्याचं होत आहे... ते शहर लहानश्या पावसाने सुद्धा बुडणारच आहे.
_
शहराच्या बाहेर येऊन ग्रामीण भागाचा विचार केला तरी पूर येण्यासाठी ढगफुटीची गरज नसते. मुसळधार पाऊस सुद्धा पुरेसा असतो. तलाव बंधारे भरलेले असतील तर दिवसभरात ५०-६० मिमी पाऊस पडला तरी पूर येऊ शकतो. एका तासात ५०-६० मिमी पाऊस पडत असेल तर तोसुद्धा खूप पाऊस असतो. पण त्याला ढगफुटी म्हणत नाहीत. त्याला अतिमुसळधार पाऊस म्हणतात. आणि एवढ्या पावसाने सुद्धा चांगला पूर येऊ शकतो. जलसंधारणाची पाणी साठवण्याची आणि जमिनीची पाणी पिण्याची क्षमता संपली कि पूर यायला सुरुवात होतेच.
मागील काही वर्षात कमी वेळात जास्त पाऊस पाडण्याचे प्रमाण वाढले आहे हा एक वातावरणाचा मोठा बदल झालेला आहे. नगरसारख्या सारख्या ठिकाणी जिथे दिवसभर रिमझिम पाऊस चालून १०-२० मिमी पाऊस व्हायचा तिथे आता एकदोन तासात २०-३० मिमी पाऊस पाडण्याचे प्रमाण वाढले आहे, आणि हा पाऊस सुद्धा मुसळधार वाटतो, हेच प्रकार ग्रामीण भागात सुद्धा वाढले आहेत.
आठवडाभरापूर्वी पाथर्डी, शेवगाव मधे झालेला पाऊस हाही याच प्रकारचा दुर्मिळ पाऊस. आमच्या भागात असा मुसळधार पाऊस फार कमी होतो, दुर्मिळच. पण फक्त तो खूप झाला म्हणून ढगफुटी झाली असे नाही, तो अतिमुसळधार पाऊस आहे जो तीनचार तासाच्या कालावधीमध्ये ७०-१०० मिमी झालेला आहे. आणि अशा सपाट प्रदेशमधे महापूर येण्यासाठी हा पाऊस पुरेसा आहे, त्यासाठी ढगफुटीची गरज नाही. पावसाच्या बाबतीमधे आकर्षक आणि भीतीदायक शब्दप्रयोग मांडून विनाकारण निसर्गावर सगळं ढकलून देण्याची गरज नाही. (वर काही ढगफुटीचे आकडे सांगितले आहेत ते ४०-५० वर्षांपूर्वीचे आहेत. म्हणजे तेव्हासुद्धा असा भयंकर वाटावा असा पाऊस पडत होताच, हि काही आजकालची बाब नाही.)
अतिवृष्टीमुळे जगात सगळीकडे पूर येतो. यातून अमेरिका, जपान, चीन, युरोप सारखे प्रगत देश सुद्धा सुटलेले नाहीत. पाणी जिरण्याची आणि साठण्याची क्षमता संपली कि पूर येतोच. त्यासाठी ढगफुटीची गरज नाही. पुणे मुंबईसारख्या शहरांमधे लहानश्या पावसाने पूर येणे याला पावसाचा दोष म्हणता येत नाही. याला प्रशासनाचे चुकलेले नियोजन आणि, अतिक्रमणाचा अतिरेकच कारणीभूत आहे.
पुणे किंवा पुण्यासारख्य घाटाच्या वरील राज्यातील कोणत्याही शहरात जर तासादोन तासात ५०-६० मिमी पाऊस पडला, किंवा दिवसभरात १०० मिमी पाऊस पडला तर ते शहर बुडू शकते यात दुमत नाही, कारण तिथली तेवढी पाणी धारण क्षमता नाही, त्यापेक्षा कमी असेल तर प्रशासकीय अपयश आहे. मुंबईसारख्या शहरात जिथे दिवसभरात २०० मिमी पाऊस सुद्धा सामान्य बाब आहे तिथे शे-दीडशे मिमी पावसाने शहर बुडते ते प्रशासनाचेच अपयश असते. तिथे ३००-५०० मिमी पावसाने पूर येणे आपण सामान्य समजायला हवे. पण हि शहरे तिथल्या सामान्य पावसाच्या ३०% पावसानेच बुडत आहेत. आणि ती बुडाली म्हणून तिथे ढगफुटी झाली असे म्हणून जमत नाही...
__
प्रत्येक गोष्टीला भयंकर करून सांगणे बंद व्हायला हवे, काही गोष्टी सामान्य असतात पण त्या कधीतरी अनुभवायला मिळतात म्हणून त्या जास्त भयानक वाटत हे लक्षात घ्यायला हवे. प्रत्येक मुसळधार पाऊस ढगफुटी नसते, पूर आला म्हणजे ढगफुटीच झाली असे नसते, ढगफुटी हि कधीतरी होणारी घटना आहे. मुसळधार, अतिमुसळधार, अतिवृष्टी याच गोष्टी कधीतरी अनुभवायला मिळतात, ढगफुटी हा त्यापुढचा टप्पा आहे.
____
© श्रीकांत आव्हाड
=================