25/12/2021
संपादन क्षेत्रातील आपल्या गुरू विषयी मौजेच्या संपादिका मोनिका गजेंद्रगडकर यांचा २३ डिसेंबर २०२१ च्या महाराष्ट्र टाईम्समधील वाचनीय लेख. जरूर वाचा.
विचक्षण आणि साक्षेपी..!
--------------
मराठी साहित्य क्षेत्रात श्री.पु. भागवत हे नाव उच्चारले जाते ते अतीव आदरभावाने. या नावामागे ‘साक्षेपी’ आणि ‘विचक्षण संपादक’ ही गौरवाची विशेषणं अगत्याने लावली जातात. जणू ही विशेषणं फक्त श्री.पु. भागवत या एकमेव संपादकासाठीच राखीव आहेत असा अलिखित नियम असावा तशी. ‘सत्यकथा’ आणि मौज या दोन नावांची स्वतंत्र सुवर्ण पाने मराठी वाङमयाच्या इतिहासात कोरली गेली आहेत. एका अर्थाने मराठी साहित्यात या दोन नावांची अमीट नाममुद्रा मोहोर उमटावी तशी उमटून आहे. खरंतर सत्यकथेचा इतिहास सुरू झाला तो १९३३ पासून. फक्त खऱ्या घडलेल्या गोष्टी प्रसिद्ध करण्याच्या हेतूने हे ‘सत्यकथा’ नियतकालिक रत्नाकर, यशवंत, ज्योत्स्ना स्त्री, मनोहर आदी नियतकालिकांच्या गर्दीत सुरू झाले. देवरुखच्या भागवत बंधूंपैकी दत्तात्रय पु. भागवत हे या सत्यकथेचे पहिले संपादक 1936 मध्ये झाले. दोन वर्षांनी 1938 मध्ये अनंत अंतरकरांनी संपादकपदाची सूत्रे घेतली. अंतरकरांनी सत्यकथेचे स्वरुप वाङमयीन केले. 1942 मध्ये अंतरकर निघून गेल्यावर विष्णुपंत भागवतांकडे संपादकपद आले आणि 1945 मध्ये विष्णुपंतांनी संपादकपद सोपवले ते धाकटे बंधू श्रीकृष्ण भागवतांकडे.... अर्थात श्री.पुं.कडे.
आज शंभर वर्ष पांडुरंग भागवत, दत्तात्रय पु. भागवत, विष्णुपंत भागवत, श्री.पु. भागवत, माधव माधव भागवत, मुकुंद भागवत, संजय आणि श्रीकांत भागवत अशा भागवत बंधूंच्या दोन ते तीन पिढ्या अविरतपणे मौज प्रकाशन गृहातर्फे वाङमयीन निर्मितीच्या विविध पुस्तक ग्रंथ निर्मितीत सक्रीय आहेत. श्री.पुं. भागवत यांच्या संपादनाखाली सत्यकथेला एक चेहरा मिळत गेला तो वाङमयीन रूपाचा. नव्या विषयांना स्पर्श करणारं, नव्या तंत्रशैलीचं नवं लेखन सत्यकथेत प्रकाशित होऊ लागलं. संपादक व्हायचं कुठलंही ध्येय, महत्वाकांक्षा नसणाऱया श्री.पुं.चा जन्म देवरूखचा. गावातल्या अड्ड्यावर मोटार ड्रायव्हरांच्या संगतीत रमलेल्या श्री.पुंचं स्वप्न होतं ते ऐटबाज ड्रायव्हर व्हायचं. पण शिक्षणासाठी मुंबईत येणं झालं. पांडुरंग भागवत या त्यांच्या काकांची ‘मौज’, ‘प्रभात’, ‘सत्यकथा’ या नियतकालिकांची मालिका होती. त्यांच्या कचेरीत श्री.पुंचं जाणं-येणं वाढलं. तिथेच दत्तोपंत पु. भागवत या त्यांच्या बंधूंनी त्यांच्यासमोर एकदा हस्तलिखितांचा गठ्ठा टाकत म्हटलं की, ‘रिकामाच आहेस तर वाचून काढ आणि तुला आवडलेली गोष्ट निवडून दे.’ श्री.पुंच्या संपादनाच्या कारकिर्दीची ही सुरूवात !
शिक्षणाच्या संस्कारांमुळे समीक्षक वा.ल. कुलकर्णी आणि लेखक रा.भि जोशी यांच्या जाणत्या मार्गदर्शनातून श्री.पुंनी स्वतःला संपादक म्हणून घडवत न्यायचे मनावर घेतले आणि त्यांच्यातल्या संपादकाला वाङमयाची सूक्ष्म आणि व्यापक जाण असणारे- श्री.पुंच्या शब्दात अभिन्नजीव सहकारी राम पटवर्धन लाभले.
सत्यकथा, मौज दिवाळी अंक आणि १९५० मध्ये अनंत काणेकरांचं ‘आमची माती आमचे आकाश’ हे पहिले पुस्तक प्रकाशनार्थ निवडून मौज प्रकाशन गृहाद्वारे श्री.पु.भागवतांची संपादनाची क्षेत्रं विस्तारीत गेली. नियतकालिकाचा संपादक म्हणजे चार लेखकांचं चांगलं लेखन मागवून ते एकत्रित करणे नव्हे, तर संपादनही एक दृष्टी असते. हे सत्यकथेच्या संपादनातून वाचकांच्या लक्षात येऊ लागलं. कथा-कवितेतील नवनव्या प्रतिभावंतांच्या प्रयोगशील रूपांच्या निर्मिताला आग्रहाने स्थान देणारी आणि त्याचा पुरस्कार करणारी समीक्षाही प्रकाशीत करणं- त्याचबरोबर जुन्या लेखकांच्या अर्थपूर्ण लेखनालाही स्थान देत, सत्वशील परंपरेचं भान जागं ठेवणारं असं सत्यकथेचं संपादकीय धोरण राहिलं. श्री.पुंमधल्या संपादकाची दृष्टी अधिकाधिक लवचिक, सर्वसमावेशक आणि साहित्यातील नवप्रवाहांना सामोरी जाणारी अशी स्वागतशील राहिली. वाङमय केलेलाच नाही तर कुठल्याच कलेला विशिष्ट विचारसरणीची चौकट, बंधन म्हणून घालता येत नाही. या श्री.पुंच्या भूमिकेमुळे अनेक उत्तमोत्तम लेखकांचा शोध घेत नवकथा, नवकविता, समीक्षा, सौंदर्यशास्त्र याशिवाय चित्रकला, संगीत, नाटक, चित्रपट, शिल्पकला असं अभिजात कलांविषयक लेखन, विविध वाङमय प्रकारातलं लेखन सत्यकथा प्रकाशित करत गेलं आणि पुस्तकरुपाने त्या त्या लेखकांची पुस्तकंही मौज प्रकाशन प्रकाशात आणत गेलं. वाङमय, कला विकसित होत जाण्याचा, दुसऱ्या महायुद्धानंतरचा सामाजिक स्थित्यंतराचा, एका अर्थी जीवनदृष्टी बदलांचा तो बहरता काळ होता. फडके- खांडेकरांचे प्रणयरम्य, भाबडे साहित्य मागे लोटत नव्या जाणिवा व्यक्त करणारं, अस्सल नव जीवन मांडणारं सर्वश्री नवं आणि प्रयोगशील साहित्य- नवकथा- (गाडगीळ भावे गोखले माडगूळकर आदी) नवकविता (मर्ढेकर, मुक्तिबोध, सदानंद रेगे) निर्माण या साहित्याचं मर्म श्री.पुं. भागवतांमधल्या संपादकाला भिडत गेलं. आत्म प्रत्ययाचे, मोकळ्या आत्माविष्काराचे नवे उन्मेष सत्यकथेत, मौजेत प्रकाशित होऊ लागले. असे असूनही कोणत्याही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कलाविषयक, वाङमयविषयक मानवी जीवनविषयक वैचारिक भूमिका न घेता श्री.पुंनी नवतेचे स्वागत करत सत्यकथेला आधुनिक ठेवलं. गंगाधर गाडगीळ यांच्या भाषेत सांगायचे तर, सत्यकथेला एक चेहरा न उरण्याची भीती होती, पण श्री.पुंच्या दृष्टीने सत्यकथेचा तोही एक बिन चेहऱयाचा चेहरा असेल म्हणत ते आपल्या सर्व समावेशक, खुल्या भूमिकेवर ठाम राहिले. ही भूमिका इतकी ठाम होती, की वाङमय क्षेत्रातल्या वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तींचा, साचलेपणाचा, साहित्यातील गुणवत्तेच्या चढ उतारांचा उल्लेख सत्यकथेच्या संपादकीयात स्पष्टपणे होत असे. इतकंच नव्हे तर सत्यकथेच्या चर्नीरोडच्या कचेरीत पटवर्धनांच्या खोलीत लेखक मंडळींचा राबता असे. तिथे वाङमयीन चर्चांना उधाण येई. विविध वाङमयीन घटनांवर वाद-चर्चा घडत. मतमतांतरे, विचारांचे आदानप्रदान होई. एका अर्थाने सत्यकथा हे त्यावेळच्या लेखकांचे व्यासपीठ झालं होतं. तिथे कलेच्या अविष्कार स्वातंत्र्याचा, स्वायत्ततेचा उच्चार, निषेध व्यक्त होई. लिटल मॅगझिनसारख्या चळवळीत प्रस्थापितांचंच साहित्य छापणार्या सत्यकथेची होळी सत्यकथेच्याच कचेरीसमोर करण्याचं आणि सत्यकथेचा अंक जाळण्यासाठी राम पटवर्धनांनीच तो कचेरीतून आणून देण्याचं मुक्तपण त्यात होतं. थोडक्यात मौज- सत्यकथेने वाङमयीन अभिरुची घडवण्याचंच नव्हे तर ती अभिरुची अधिक व्यापक, संपन्न आणि सूक्ष्म करण्याचे मोठे कार्य केले. अरविंद गोखल्यांपासून वामन चोरघडे, र.वा दिघे, मोकाशी, पानवलकर, बाळकृष्ण प्रभुदेसाई खानोलकर, तेंडुलकर, विलास सारंग, श्याम मनोहर जातेगावकर, सानिया, शांता गोखले, विजया राजाध्यक्ष, कमल देसाई, गौरी देशपांडे, आशा बगे ते श्रीनिवास कुलकर्णी, अनिल अवचट, डहाके किती लेखकांची नावे घ्यावीत ! यातील व्यंकटेश माडगूळकर हा लेखक तर मौजनेच प्रकाशात आणलेला. एका अर्थी श्री.पुंच्या संपादन दृष्टीचं क्षितीज कितीतरी बाजूंनी असं विस्तारत गेलेलं दिसतं. विविधता आणि वांडंमयीन गुणवत्ता यांचा समतोल साधणारी निवडक पण कसदार वांडमयाची परंपरा अधोरेखित करणारी ही श्री.पुं.ची संपादनाची दृष्टी म्हणूनच मौलिक ठरत गेली.
कसदार लेखनाचा आग्रह सातत्याने बाळगणाऱ्या श्री.पुंच्या संपादन दृष्टीवर काही आक्षेपही नोंदवले जात होते, आजही ते घेतले जातात. मौजचे संपादक लेखकांच्या लेखनात हस्तक्षेप करतात, पुनर्लेखनाचा आग्रह धरला जातो. याशिवाय कथेला टोक आलेले नाही, कथा तपशिलात हरवून गेली आहे, अशा सत्यकथेच्या संपादकीय अभिप्रायांचीही मस्करी केली गेली. परंतु श्री.पुं.ची संपादक म्हणून एक शुद्ध प्रामाणिक भूमिका होती. त्यांच्यामते, संपादक हा लेखकाच्या प्रतिभा प्रवासातला एक सोबती असतो. लेखकाची सर्जकता ही जितकी महत्वाची, तितकेच प्रतिभाशाली संपादन हेही महत्वाचे आहे. प्रतिभाशाली संपादन लेखकाच्या दृष्टीने उपकारक ठरते. संपादकाने मनःपूर्वक स्नेहभावाने शंका, सूचना केल्या आणि त्या लेखकाला स्विकारण्या, न स्विकारल्याबद्दलच स्वातंत्र्य दिलं तर लेखनाच्या कलात्मकतेत भरच पडते. विद्याधर पुंडलिकांनी श्री.पुं.मधल्या संपादकाचा गौरव फार यथार्थ शब्दात केला आहे. ‘लेखकाचं लेखकपण दत्तक घेणारा संपादक’. श्री.पुं.नी हे दत्तकपण वेळोवेळी निभावलं. लेखकाच्या निर्मितीत ते स्नेही बनवून गुंतत. त्याची सर्जनशक्ती जाणून घेत त्या लेखकाला त्याची जाणीव करून देत. असे करताना लेखकाची अस्मिता जराही दुखावीत नसत. ‘मला प्रतिभावंतांचा अहंकारही अतिशय सुंदर गोष्ट वाटते आणि तिला एकाही शब्दाने जरी ढळ पोहोचला तर मला अपराधी वाटतं’, असं आग्रहपूर्वक आणि आदराने म्हणणारे श्री.पुं.च्या संपादनातील साक्षेपता म्हणजे नक्की काय, त्याचा अर्थ त्यांच्या या भूमिकेतूनच प्रतित होतो. पाश्चात्य प्रकाशन व्यवसायात संपादक आणि लेखक अशा आत्मैक्याला अतिशय महत्व आहे. त्या दोघांमधलं निर्मितीशील सौहार्द लेखकाच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. मराठी प्रकाशन व्यवसायात ग्रंथनिर्मितीत संपादक किती आवश्यक असतो हे जाणवून दिलं ते श्री.पुं.च्या विचक्षण आणि साक्षेपी संपादन दृष्टीमुळे. ज्या काळात संपर्काची साधने म्हणजे पत्र आणि फोन इतकीच मर्यादित होती, त्या काळात श्री.पुं.नी लेखकांना लेखनाची ऊर्मी पुरवली. त्यांना लिहिते करण्यासाठी पत्राद्वारे प्रेरित केलं. ‘नवं काय लिहतायं ?’, ‘तुम्हाला सुचलेली कथा कुठंवर आली ?’ ‘तुम्ही चांगलं खूप लिहिलं, पण खूप चांगलं कधी लिहणार ?’ श्री.पुं.च्या या प्रेरक शब्दातून कितीतरी लेखक लिहिते राहिले. गौरी देशपांडेंसारखी लेखिका तर म्हणायची, की ‘मी का लिहते, तर श्री.पुं.साठी. श्री.पुं.ची नजर त्यावर फिरते म्हणून.’ लेखकांचं लेखकत्व जागवणारा श्री.पुं. मधला असा संपादक लेखकाच्या कौटुंबिक, आर्थिक विवंचनेतही त्यांच्या सोबत राहिला. गुणवत्तेच्या निकषावर निवडलं गेलेलं सकस वांडःमयच केवळ मौज प्रकाशन प्रकाशित करतं ही मौजची प्रतिमा मराठी साहित्यात ठरून गेली आहे. सत्यकथेत, मौजेत कथा, कविता छापून येणे आणि पुस्तकावर मौजची ऐतिहासिक मोहोर उमटणं म्हणजे खऱ्य़ा अर्थी तो लेखक मान्यता पावणं असतं, हे समीकरणही साहित्यक्षेत्रात पक्क झालं आहे. तरीही लेखकाच्या प्रतिभेचा धर्म वा कलात्मकता पुरेशी ध्यानात न आल्यामुळे मौजकडून काही लेखक गमावलेही गेले. संपादन प्रक्रियेमुळे कधी प्रकाशनास उशीर होत असल्यामुळे मौजेवर काही लेखकांनी पक्षपात केल्याचा आरोप केला. ब्राह्मणी अभिरुचीच्या मर्यादाही अधोऱेखीत करण्याचा प्रयत्न केला. तरीही श्री.पुं.चे वाडःमयीने कर्तुत्व अबाधित राहिले आहे. कारण वांडःमयावर निरतीशय प्रेम करणारा, लेखकांच्या घडणीत स्वतःला झोकून देणारा, नवसाहित्य घडवणारा आणि साहित्यिक बांधीलकीचे व्रत घेऊन चालणारा हा संपादक होता – संपादक हा लेखक घडवतो, हे मान्य न करता प्रतिभावान लेखकच संपादकाला नकळत घडवत असतो, असा म्हणणारा विचक्षण साक्षेपी संपादक श्री.पुं. भागवत.
- मोनिका गजेंद्रगडकर
मौज प्रकाशनाच्या सर्व पुस्तकांसाठी,
संपर्क -
मौज प्रकाशन गृह
022-23872426/022-23871050
+919769526577 (whatsapp)
[email protected]
https://moujprakashan.com
Readers from India and abroad, please DM us to grab your copy or send us a WhatsApp message.
#मराठीपुस्तके #मराठीसाहित्य #मौजप्रकाशन #श्रीपुभागवत #मराठीकवी #साहित्य_समीक्षा #वाचन #मराठीवाचक #सत्यकथा #मौज #मोनिकागजेंद्रगडकर #मराठीकथा #कथासंग्रह #मराठीकथा #संपादक #महाराष्ट्र_टाईम्स #महाराष्ट्रटाईम्स #मटा #ललित Mouj Prakashan Grihaashan Griha