23/02/2026
फुकट मिळणारा कडीपत्ता झाला ४०० रुपये किलो; खराब हवामानाचा फटका
नवी मुंबई : कोथिंबीरीसोबत अनेकदा फुकट मिळणाऱ्या कडीपत्त्याच्या दरांनी यंदा विक्रमी उसळी घेतली आहे. दक्षिणेकडील राज्यांत खराब हवामानामुळे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील दरांवर झाला असून, पूर्वी ८० ते ९० रुपये किलो दराने विकला जाणारा कडीपत्ता आता तब्बल २०० ते ४०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.
दरवाढीमुळे किरकोळ विक्रेत्यांनीही खरेदीवर मर्यादा आणल्या आहेत. परिणामी मुंबई आणि नवी मुंबईतील अनेकांच्या जेवणातून कडीपत्ता गायब झाल्याचे चित्र आहे. सामान्यतः भाजीपाल्याच्या किमतींमध्ये चढ-उतार होत असतात; मात्र कडीपत्त्याच्या दरात एवढी वाढ क्वचितच पाहायला मिळते.
दक्षिण भारतात कडीपत्त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. यंदा अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे उत्पादन घटले, तसेच वाहतुकीदरम्यान मालाचे नुकसानही वाढले. त्यामुळे बाजारातील उपलब्धता कमी झाली आणि दर झपाट्याने वाढले.
बाजार समितीत दररोज ८ ते १० टन कडीपत्त्याची आवक होत असते. मात्र सध्या ती लक्षणीयरीत्या घटली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, पुढील काही दिवसांत आवक सुरळीत होण्यासाठी किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत कडीपत्त्याचे दर उच्चांकी पातळीवरच राहण्याची शक्यता आहे.
#कडीपत्ता #कडीपत्तादरवाढ #भाजीपालामहागाई #बाजारभाव #मुंबईबातम्या #नवीमुंबई #कृषीबातम्या #अवकाळीपाऊस #महागाई