21/11/2022
आधी सगळं चांगलं होतं...
आधी सगळं चांगलं होतं. निर्मळ होतं.
आमचे आदर्श, आम्हा सर्वांचे आदर्श होते. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना उर भरून येत होता. तो कुणा एका जातीचा इतिहास नव्हता. बाजीप्रभू देशपांडे ब्राह्मण नव्हते, कृष्णाजी कुलकर्णी ब्राह्मण होता म्हणून त्याला मारले नव्हते, अफजलचा कोथळा काढला हा प्रसंग कुणाच्याही भावना दुखवत नव्हता.
आधी सगळं चांगलं होतं. सागरा प्राण तळमळला आम्हाला सावरकरांची देशभक्ती आणि साहित्यश्रेष्ठता शिकवत होते. हे हिंदुनृसिंहा.. गाताना हिंदू शब्द कुणी अधोरेखित करत नव्हते, कुणी टाळतही नव्हते, कुणी हिंदू म्हणण्याची लाज वाटते का? असा आवही आणत नव्हते. दादोजी कोंडदेव, समर्थ रामदास स्वामी हे महाराजांचे गुरु होते की नव्हते याचा आम्हाला कधी त्रास झाला नाही. शिवाजी महाराजांचे स्वराज्य हिंदवी होते. ते हिंदवी आहे म्हणुन ते एका धर्माचे नव्हते, आणि ते धर्मनिरपेक्ष आहे असा आवही नव्हता. त्यात मुस्लिमांना विशेष आरक्षण सुद्धा नव्हते. असे प्रश्नच कधी आमच्या मनात नव्हते. किंबहुना स्वराज्य, आपले राज्य हेच आमच्या मनावर ठसले होते.
आधी सगळं चांगलं होतं. टिळकांचं माझ्या शालेय आयुष्यात महत्त्वाचं स्थान. कारण त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेने माझ्यातला लेखक, वक्ता घडवला. ते टिळक ब्राह्मण होते, याचा कधीही मनात विचारही आला नाही. टिळकांनी फोडलेली सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ही सिंहगर्जना मनात घर करून राहिली. प्लेगची साथ आणि त्यात इंग्रजांचा अत्याचार याचा राग, चाफेकर बंधूंनी याचा उगवलेला सूड एवढेच आठवते. गांधीजींचे सत्याग्रह, सावरकरांचे काळे पाणी आणि त्यांच्यावरील अत्याचार, संसदेत केलेले बॉम्बस्फोट, भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचे बलिदान, काकोरी ट्रेन लूट, रामप्रसाद बिस्मिल, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद, चले जाव सगळं आमच्यासाठी एकच होतं... स्वराज्याचा लढा...!
मग क्रांतिकारी श्रेष्ठ की सत्याग्रही, स्वातंत्र्य कुणी मिळवून दिले, गांधी की सावरकर, गांधी की आंबेडकर, सावरकर की आंबेडकर असे कुठलेच की प्रश्र्न आमच्यासमोर नव्हतेच! बिना खड्ग बिना ढाल गायल्यामुळे आमच्या मनातलं क्रांतिकारकांचे स्थान तसुभर कमी झालं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यापुढे आले संविधानाचे शिल्पकार म्हणून. त्यांच्या चवदार तळ्याला दलितांच्या उद्धाराची, अन्याय्य वागण्याला दिलेल्या प्रत्युत्तराची किनार होती. अन्याय ब्राह्मणांनी केला, शिक्षणाचा अधिकार नाकारला असेही वाचले. पण म्हणून आमच्या वर्गातल्या ब्राह्मण मुलांबद्दल कुणाला राग नव्हता. किंबहुना, त्यांच्या ब्राह्मण असण्याची दखल सुद्धा घेतली नाही. कारण जात आमच्या असण्यात महत्वाची नव्हतीच.
आम्हीं प्रार्थना म्हणायचो. गुरुवारी दत्ताची प्रार्थना व्हायची. आठवीला संस्कृत आल्यावर तर वर्गातल्या स्वप्नील देवधरने वर्गाला अथर्वशीर्ष शिकवले. आम्ही सगळे ते म्हणायचो. मनाच्या श्र्लोकांच्या स्पर्धा व्हायच्या, भगवद्गीतेचा श्लोक म्हणायचो. यामुळें कधीही शाळेच्या धर्मनिरपेक्षतेला धोका आला नाही, की आम्ही इस्लामद्वेष्टे हिंदू बनलो नाही. आम्ही हिंदू होतो, हिंदू राहिलो.
आधी सगळं खरंच चांगलं होतं... समाज शांत होता. 1993 ची दंगल समोर घडली. पण त्याने मन कडवट केले नाही. कारण, घडून गेली घटना. आज घटना घडत नाही, पण कडवटपणा सातत्याने भरवला जातो, हवेत जाणवतो. त्याचे कडवट ढेकर समाजात येत राहतात. या सगळ्यातून काहीही निष्पन्न होणार नाही...
पुन्हा एकदा त्याच साध्या सोप्या जगात जायचं आहे. ते जग पुन्हा आणायचं आहे. जिथे बामणी कावा ह्या नावाखाली, हिंदू ह्या नावाखाली, धर्मनिरपेक्षता ह्या नावाखाली गोष्टींची विभाजने होणार. जे आहे ते आहे. ते नाकारले जाणार नाही, त्याचा आवाही आणला जाणार नाही. तेवढे आणि तसेच स्वीकारले जाईल.
हे शक्य आहे का? सहज. सध्या गदारोळ गाजवणारी माणसे हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहेत. दोन्हीं ठिकाणची. प्रॉब्लेम एवढाच की मोठ्या प्रमाणात असलेली सुज्ञ सामान्य माणसे गप्प बसतात. त्यांनी पुढें यावे आणि तुटपुंज्या माणसांची बोलती बंद करावी... त्यांच्या सुज्ञ आवाजापुढे धर्मांध जात्यांध आवाज बंद व्हावा...
हर्षद माने