
20/10/2024
The Lady Boss : एचआर क्वीन रेणू गुलराज
कोणत्याही कंपनीसाठी कर्मचारी हा कणा असतो. ज्या कंपनीचे कर्मचारी उत्तम ती कंपनी चांगली प्रगती करते. पण या कर्मचाऱ्यांना कामासाठी सतत प्रेरित करणे, त्यांच्याकडून दर्जात्मक काम करून घेणे आवश्यक असंते. त्यासोबतच या कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निवारण करणे देखील गरजेचे असते. ही सगळी कामे करणाऱ्या विभागास ह्युमन रिसोर्स अर्थात मनुष्यबळ विभाग म्हणतात. काही कंपन्या ही कामे करणाऱ्या कंपन्यांना याची जबाबदारी सोपवितात. अशी जबाबदारी समर्थपणे पेलवणारी कंपनी म्हणजे इझी सोर्स एचआर सोल्यूशन्स प्रा.लि. रेणू गुलराजने आपल्या पतीसह उभारलेली ही कंपनी आज काही कोटी रुपयांची उलाढाल करत आहे.
रेणू गुलराज यांचा जन्म दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिचे बाबा ड्राफ्ट्समन म्हणून शासकीय नोकरी करत होते. तर तिची आई शिक्षिका होती. रेणू तीन भावंडांमध्ये दुसरी मुलगी. तिचं कुटुंब एक निम्न मध्यवर्गीय कुटुंब होतं. तिला शाळेच्या सहलीला जाणे परवडण्यासारखे नसायचे. रेणू शाळेतील एक सरासरी दर्जाची विद्यार्थिनी होती. ती खेळामध्ये मात्र ती सक्रिय होती. ती शाळेच्या व्हॉलीबॉल संघाचा भाग असायची. मॅरेथॉनमध्ये सुद्धा ती भाग घ्यायची. बारावी नंतर, तिने दिल्ली विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ व्होकेशनल स्टडीजमध्ये प्रवेश घेतला आणि 1993 मध्ये औद्योगिक संबंध आणि कार्मिक व्यवस्थापन या विषयात बीए पूर्ण केले.
पदवी मिळवल्यानंतर तिने जेनिथ कॉम्प्युटर्समध्ये इंटर्नशिप केली, जिथे तिला 1993 मध्ये 3200 रुपये पगारावर एचआर ट्रेनी म्हणून नोकरी मिळाली. झेनिथमध्ये काम करत असताना, तिने संध्याकाळच्या महाविद्यालयात शिक्षण घेतले आणि भारतीय विद्या भवन, दिल्ली येथून व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका पूर्ण केली. रेणूने नोव्हेंबर 1994 मध्ये जेनिथ सोडले आणि दिल्लीतील शेअर ब्रोकिंग फर्म राहुल मलिक अँड कंपनीमध्ये ग्राहक सेवा नोकरी स्वीकारली.
तिच्या वडिलांप्रमाणेच तिलाही शेअर मार्केटमध्ये रस होता आणि म्हणून ती या शेअर ब्रोकिंग कंपनीत सामील झाली. इथेच तिला तिचा भावी पती नरेश गुलराज भेटला. बीटेक पदवीधर असलेल्या नरेशची त्या वेळी आर्थिक सेवा देणारी फर्म होती. तो या शेअर ब्रोकिंग कंपनीच्या कार्यालयात जायचा. पहिल्यांदा ओळख झाली व पुढे ओळखीचे प्रेमात रूपांतर होऊन 1996 मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर रेणूने तिची नोकरी सोडली आणि 1997 मध्ये दिल्लीतील एका छोट्या कार्यालयात तीन कर्मचाऱ्यांसह ‘इझी सर्च’ ही रिक्रूटमेंट फर्म सुरू केली. व्हर्लपूल आणि पेप्सीला तिचे प्रारंभिक ग्राहक म्हणून सेवा दिली.
2005 मध्ये, नरेश यांनीही आपला व्यवसाय बंद केला आणि ‘इझी सोर्स’ नावाची नवीन कंत्राटी कर्मचारी नियुक्त करणारी कंपनी सुरू केली. त्यांनी राजेंद्र प्लेस, दिल्ली येथे कार्यालय सुरू केले. बचत केलेले 20 लाख रुपये हे त्यांचे भांडवल होते. हीच फर्म इझी सोर्स एचआर सोल्युशन्स प्रा. लि. म्हणून कंपनी नोंदणीकृत झाली.
तेव्हापासून या जोडप्याने मागे वळून पाहिलेच नाही. रेणू आणि नरेश यांनी कपल-प्रेन्युअरशिप एका वेगळ्या पातळीवर नेली आहे. ते व्यवसाय भागीदार किंवा खऱ्या आयुष्यातले भागीदार असले तरीही ते एकमेकांसाठी बनलेले आहेत असे म्हणणे योग्य ठरेल.
इझी सोर्स आपल्या क्लायंट कंपन्यांना मनुष्यबळ (एचआर) सेवा प्रदान करते. वेतन, पीएफ, नियुक्ती यांसारखी कार्ये व्यवस्थापित करते. त्यांचा आता प्रोफेशनल एम्प्लॉयर ऑर्गनाइज़ेशन मध्ये विस्तार झाला आहे. इझी सोर्स परदेशी ग्राहकांसाठी कार्यालये व्यवस्थापित करते. 99% दूरस्थ ठिकाणांवरून काम करणाऱ्या आणि 1% इझी सोर्सद्वारे देखरेख केलेल्या ऑफिस स्पेसमधून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करतात. कंपनीकडे काही फॉर्च्युन 500 कंपन्यांसह सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील ग्राहक आहेत. या जोडप्याने कंपनीतील भूमिका स्पष्टपणे निर्धारित केल्या आहेत. रेणू टीम हाताळते आणि नरेश आर्थिक व्यवस्थापन पाहतात. सध्या कंपनीचे 70 पूर्णवेळ कर्मचारी आणि 12,000 आउटसोर्स कर्मचारी आहेत. गुरुग्राम, दिल्ली आणि नोएडासह संपूर्ण भारतात 200 ठिकाणी कंपनीची उपस्थिती आहे. एका वेबपोर्टलनुसार 2022 मध्ये इझी सोर्सची उलाढाल 202 कोटी रुपये इतकी होती.
कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची चांगली काळजी घेते. जेव्हा कंपनीने 2 कोटी रुपयांची उलाढाल केली तेव्हा प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या आवडीचे घरगुती उपकरण खरेदी करण्यासाठी 20,000 रुपयांचे कूपन देण्यात आले. "तुमच्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्या आणि ते तुमच्या व्यवसायाची काळजी घेतील'’ या मंत्रावर रेणू व नरेश दाम्पत्यांचा विश्वास आहे.
वैयक्तिक आयुष्यात नरेश देखील एक क्रीडापटूच आहे. तो शालेय जीवनापासून बॅडमिंटन खेळत आहे. त्याने अलीकडेच बॅडमिंटनमधील दुहेरीसाठी ‘गुरुग्राम जिल्हा मास्टर्स चॅम्पियनशिप’ जिंकली. या दाम्पत्यास राहुल गुलराज हा 23 वर्षांचा मुलगा आहे. राहुल मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक असून सध्या तो दिल्लीतील अपोलो टायर्सच्या पुरवठा साखळी विभागात कार्यरत आहे.
“तुमच्या व्यवसायात प्रामाणिक रहा. तुमच्या लोकांमध्ये गुंतवणूक करा आणि त्यांची काळजी घ्या. कल्पना आणि संवादासाठी नेहमी दरवाजे खुले ठेवण्याचे धोरण ठेवा.” असा सल्ला भावी उद्योजकांसाठी रेणू आणि नरेश देतात.
एका खासगी कंपनी मध्ये 3200 रुपयांच्या पगारापासून झालेली रेणू गुलराज यांची सुरुवात 200 कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या एचआर कंपनी पर्यंत पोहोचली आहे. एचआर क्षेत्रातील या लेडी बॉसची ही गोष्ट प्रत्येक मध्यमवर्गीय तरुण तरुणींसाठी प्रेरणादायी आहे.
प्रहार मंथन
दी लेडी बॉस
अर्चना सोंडे
मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
PrahaarNews Live