
22/04/2025
🌳 आयपीएल 2025 मध्ये डॉट बॉल्सवर लावले जात आहेत हजारो वृक्ष : बीसीसीआयचा हरित उपक्रम
आयपीएल 2025 च्या सामन्यांदरम्यान, जेव्हा चेंडू डॉट बॉल (म्हणजे रन न मिळालेला चेंडू) असतो, तेव्हा स्कोअरकार्डवर हिरव्या रंगाचा एक खास निशाण दिसून येतो. याचा अर्थ असा आहे की त्या डॉट बॉलसाठी आता झाड लावले जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 2023 च्या आयपीएल सिझनपासून या पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरुवात केली होती. सुरुवातीला केवळ प्लेऑफ सामन्यांमध्ये डॉट बॉलवर झाडे लावली जात होती, पण आता 2025 पासून, बीसीसीआयने लीग सामन्यांपासूनच हा उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे.
🌳 प्रत्येक डॉट बॉलमागे 500 झाडं
बीसीसीआयने जाहीर केलं आहे की प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 झाडं लावली जात आहेत. मात्र सुरुवातीला या झाडांची नेमकी लागवड कुठे होते हे स्पष्ट नव्हते. आता बीसीसीआयने त्याबाबतचा सस्पेन्स दूर केला आहे.
आयपीएलच्या अधिकृत एक्स (पूर्वीचा ट्विटर) अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओद्वारे ही माहिती समोर आली आहे. त्या व्हिडिओत असं सांगण्यात आलं की, प्रत्येक डॉट बॉलच्या माध्यमातून पृथ्वीला अधिक हिरवंगार आणि आरोग्यदायी बनवण्याचं बीज पेरलं जातं आहे. हा उपक्रम बीसीसीआय आणि टाटा ग्रुप एकत्र राबवत आहेत.
🌳 चार लाखांहून अधिक झाडं लावली
या उपक्रमांतर्गत आतापर्यंत आयपीएल आणि महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) मध्ये झालेल्या डॉट बॉल्सवर चार लाखांहून अधिक झाडं लावण्यात आली आहेत. यामध्ये केवळ झाडं लावणेच नव्हे तर त्यांची योग्य निगा राखली जात आहे. अगदी जशी युवा क्रिकेटपटूंना आयपीएल आणि डब्ल्यूपीएल मध्ये संधी देऊन त्यांचा विकास केला जातो, तसंच या झाडांचाही विचारपूर्वक सांभाळ केला जात आहे.
🌳 झाडे कोणत्या ठिकाणी लावली जात आहेत ?
आयपीएलने व्हिडिओतून सांगितलं आहे की केरळ, आसाम आणि गुजरात या राज्यांमध्ये या पर्यावरणपूरक डॉट बॉल्सच्या बदल्यात झाडं लावण्यात आलेली आहेत. 2023 साली सुरू झालेला हा उपक्रम 2025 मध्ये अधिक व्यापक स्वरूपात राबवला जात आहे आणि येत्या काळात देशभरात अनेक ठिकाणी हे झाडं लावण्याचं काम सुरु राहणार आहे.
आयपीएल आता फक्त क्रिकेट पुरतं मर्यादित न राहता, पर्यावरण रक्षणाचाही एक सुंदर संदेश देत आहे. डॉट बॉल्सवरून ही हरित क्रांती घडवणं हे क्रिकेट आणि समाज यामधील एक सकारात्मक दुवा ठरू शकतं. बीसीसीआयचा हा उपक्रम निश्चितच इतर खेळ संघटनांसाठी प्रेरणादायी ठरेल.