16/09/2026
मोठी बातमी
कालिन्यात शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; शाखेतच फ्री स्टाईल हाणामारी
(प्रतिनिधी: गुणवंत दांगट)
मुंबई (दिनांक १६ सप्टेंबर) कालिना विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चांगलीच चव्हाट्यावर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी अंदाजे ८:३० वाजता च्या सुमारास कालिना परिसरातील शिवसेना शिंदे गटाच्या शाखा क्रमांक ९१ मध्ये वाढदिवस साजरा करण्यावरून झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवस साजरा करण्याच्या मुद्द्यावरून संबंधित पदाधिकाऱ्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वाद वाढत जाऊन हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेत शाखाप्रमुख संजय तेलोरे, महिला विभागप्रमुख आश्विनी भोसले आणि त्यांचे पती संदीप भोसले यांच्यात मारामारी झाल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे काही काळ शाखेतील वातावरण तणावपूर्ण झाले होते. स्थानिक राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, गेल्या काही महिन्यांपासून कालिना विभागात पक्षांतर्गत मतभेद असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने झालेला हा वाद केवळ स्थानिक कारणापुरता मर्यादित नसून, त्यामागे पक्षांतर्गत नाराजीची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, पोलिसांकडून अधिकृतपणे नेमकी कोणती कारवाई करण्यात आली आहे, याबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, संबंंधित घटनेवरून शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून दखल घेतली जाते का? संबंधितांवर पक्षांतर्गत कारवाई होते का? आणि कालिना विभागातील वाढता अंतर्गत संघर्ष थांबवण्यासाठी वरिष्ठ नेतृत्व काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे...
सविस्तर बातमी लवकरच...