19/09/2025
"भारतीयांनी मनुला कधीच मागे सोडले आहे, तुम्हीही त्याच्या भुलभुलैयातून बाहेर पडा. वैचारिक अस्पृश्यता सोडा!"
विश्वास पाटलांच्या अध्यक्षपदावरून वाद निर्माण करणाऱ्यांना आवाहन!
दि. १८ सप्टेंबरच्या महाराष्ट्र टाईम्स दैनिकात आलेल्या बातमीमध्ये 'विद्रोही साहित्य चळवळी'च्या पदाधिकाऱ्यांचे वक्तव्य दिलेले आहे. त्या बातमीचे शीर्षक देखील ‘साताऱ्याच्या संमेलनावर मनुवाद्यांचा प्रभाव’ असे आहे.
मुख्य बातमीच्या सुरुवातीलाच ‘विश्वास पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराशी संबंधित समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले असल्याने या संमेलनावर मनुवाद्यांचा प्रभाव असेल’ अशी भविष्यवाणीही करण्यात आलेली आहे!
विश्वास पाटील यांच्या निवडीचे स्वागत आहे. त्यांनी २००३ मध्ये सातारलाच संपन्न झालेल्या ‘युवा साहित्य व समरसता’ विषयावरील समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. केवळ एवढ्याचसाठी हे स्वागत नसून श्री.पाटील हे एक नामवंत साहित्यिक आहेत. विविध साहित्यप्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले आहेत, यासाठी.
विश्वास पाटील यांनी साहित्यबाह्य मंचांवरून प्रदर्शित केलेल्या व्यक्तिगत मतांसाठी अर्थातच ते जबाबदार आहेत. त्यांतील काही वक्तव्यांवर अनेकांनी टीकाही केलेली आहे. आम्ही त्यांच्या चुकीच्या वक्तव्यांचे समर्थन करतच नाही. प्रसंगी अशा वक्तव्यांचा निषेधही केलेला आहे. मात्र, २२ वर्षांपूर्वी ते समरसता साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आले यासाठी त्यांना विरोध करणे व मनुवादी वगैरे शेलक्या विशेषणांचा वापर करणे हे संकुचितपणाचे लक्षण आहे. एरव्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धोशा लावणारी मंडळी अशा नविन 'वैचारिक अस्पृश्यतेकडे' वळतात हे समाजासाठी काही चांगले लक्षण नाही!
'समरसता साहित्य परिषदेने' महाराष्ट्रात आजवर २० विषयनिष्ठ साहित्य संमेलनांच्या आयोजनातून सामाजिक अभिसरणाला गती दिली आहे. या संमेलनांत हजारो साहित्यिक,साहित्य रसिक सहभागी झालेले आहेत. ‘सरस ते साहित्य व समरस तो साहित्यिक’ यावर विश्वास असणाऱ्या मान्यवरांनी या संमेलनांत येऊन सामाजिक बंधुतेप्रती आपली साहित्यिक बांधिलकी व्यक्त केली आहे. या सर्वांना ‘मनुवादी’ म्हणून निकालात काढण्याचा- “आम्हीच फिर्यादी व आम्हीच न्यायाधीश” अशी भूमिका घेण्याचा अधिकार या मंडळींना कोणी दिला? ‘मनु’ ला समाजाने कधीच मागे सोडून दिले आहे. आज देश मनुस्मृतीनुसार नाही- संविधानाने चालतो. यावेळी ‘मनुवादाला’ सतत आठवत राहण्याची तुम्हाला तरी गरज कशाला भासते?
'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे' व्यासपीठ साहित्यबाह्य गोष्टींसाठी सातत्याने वापरले जात आहे. संमेलनाच्या निमित्ताने अनेक विवाद निर्माण केले जातात. अलिकडे काही अध्यक्षांनी सवंग राजकीय भाषणे करत या व्यासपीठाची पत घालवली आहे.
साहित्यिकांनी राजकारणात भाग घेऊ नये, असे नाही. परंतु अ.भा.मराठी साहित्य संमेलनातून मराठी भाषा व साहित्यविश्व यांच्या विकासासाठी ठोस काही काम झाले पाहीजे. विश्वास पाटील यांच्याकडूनही हीच अपेक्षा आहे. ते करण्यासाठी त्यांना सर्व साहित्यप्रवाहांनी सहकार्य केले पाहीजे. लोकांवर शिक्के मारून, लेबले चिटकवून व द्वेष करून संविधानाला अपेक्षित समाजनिर्मितीचे ध्येय साध्य होणार आहे का? याचा विचार सर्व साहित्यप्रवाहांनी करायला हवा.
बाय द वे, अलिकडे (बहुधा उदगीरला) एका विद्रोही साहित्य संमेलनातच नागराज मंजुळे यांनी ‘विद्रोहाऐवजी प्रेम करा. आता प्रेम करणे हाच विद्रोह आहे’ असे सांगितले होते!
@प्रसन्न पाटील