Muktashabd Masik

Muktashabd Masik नवे उन्मेष…नवे गांभीर्य…।

*सर्वांना सस्नेह निमंत्रण!**११वे मेरी पाटील स्मृती व्याख्यान*विषय : *सामाजिक न्याय व न्यायालयीन प्रक्रिया*वक्ते : *राजीव...
24/11/2025

*सर्वांना सस्नेह निमंत्रण!*

*११वे मेरी पाटील स्मृती व्याख्यान*

विषय : *सामाजिक न्याय व न्यायालयीन प्रक्रिया*
वक्ते : *राजीव पाटील*
(ज्येष्ठ अधिवक्ता)
अध्यक्ष : *मृदुला भाटकर*
(निवृत्त न्यायमूर्ती)

दिनांक : *गुरुवार २७ नोव्हेंबर २०२५, सायंकाळी ७.१५ वाजता.*
स्थळ : *पीटीव्हीएचे केशवराव घैसास सभागृह* ,
*डहाणूकर कॉलेज, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-५७.*
या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती.
निमंत्रक:
*शब्द पब्लिकेशन, मुक्त शब्द - येशू पाटील*

मुक्त शब्द ऑक्टोबर २०२० संपादकीय लिहिणे आणि वाचणे- हरिश्चंद्र थोरातलिहिणे आणि वाचणे या दोन्ही गोष्टी मानवी संस्कृतीमधील ...
29/10/2020

मुक्त शब्द ऑक्टोबर २०२०

संपादकीय

लिहिणे आणि वाचणे

- हरिश्चंद्र थोरात

लिहिणे आणि वाचणे या दोन्ही गोष्टी मानवी संस्कृतीमधील विशेष महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मानवी समाजात वाढलेली व शरीरात काही वैगुण्ये नसणारी माणसे स्वाभाविकपणे बोलू व ऐकू शकतात. बोलणे आणि ऐकणे या कृतींच्या नैसर्गिक आधारावर, त्यांत अर्थपूर्ण भर घालीत, त्यांच्यात रूपांतरण घडवून आणीत माणसाने लिहिणे आणि वाचणे या कृती विकसित केल्या. या कृतींमध्ये बोलण्याऐकण्याची स्वाभाविकता नाही. त्या जाणीवपूर्वक शिकून घ्याव्या लागतात. बहुतेक माणसे जाणीवपूर्वक विशेष श्रम न करता बोलू व ऐकू शकतात. मात्र सर्वांनाच लिहिता व वाचता येत नाही. लिहिण्यावाचण्याला इतके अनेकविध स्तर असू शकतात की आपल्याला लिहिता व वाचता येते असा समज असलेल्या लोकांना सर्व प्रकारचे लिहिता व वाचता येत नाही. प्राथमिक स्वरूपाच्या संज्ञापनापलीकडे पोहोचण्याची आस असल्यामुळे लिहिण्यावाचण्याच्या संकल्पना सतत बदलत राहतात. त्यामुळे या कृती करताना स्वतःला सतत प्रशिक्षित करत राहणे, स्वतःला अद्ययावत करत राहणे गरजेचे असते. बोलणे व ऐकणे नैसर्गिक म्हटले तर लिहिणे व वाचणे सांस्कृतिक म्हणता येईल. त्यामुळेच लिहिण्यावाचण्याच्या कृतींमध्ये चिन्हीकरणाची प्रक्रिया सूक्ष्मतर आणि जटिल झाली आहे. लिहिण्यावाचण्याच्या कृती करता आल्यामुळे मानवी संस्कृती अधिक व्यामिश्र व विशेष अर्थपूर्ण झाली आहे. तिच्यामुळे माणसासाठी ज्ञानाचे दरवाजे खुले होतात. बोलण्यासाठी श्रोता समोर असावा लागतो. ध्वनिमुद्रणाचा शोध लागेपर्यंत बोलणे व ऐकणे यांना अपरिहार्यपणे वर्तमानकाळाच्या व विशिष्ट अवकाशाच्या मर्यादा असत. वक्त्याला भविष्यातील श्रोत्याशी बोलता येत नसे आणि श्रोत्याला वक्त्याचे बोल ऐकण्यासाठी अपरिहार्यपणे त्याच्या काळात व अवकाशात राहावे लागत असे. संस्कृतीचा काळात आणि अवकाशात विस्तार करण्यासाठी माणसाने पाठांतराची युक्ती काढली. भूतकाळात होऊन गेलेले बोलण्याऐकण्याचे प्रसंग पोपटासारखे पाठ म्हणणारे लोक निर्माण झाले. भूतकाळातील बोलणे त्यांच्या पवित्र मुखातून ऐकण्याची सोय झाली तरीही मुळातले बोलणे काही प्रमाणात स्थलांतरित होत गेले असणार. आज जे ऐकता आहात, तेच मुळातले बोलणे आहे याची शाश्वती देणारे, भूत आणि वर्तमान यांवर सत्ता गाजवणारे अधिकारी या प्रक्रियेतून निर्माण होत असणार. लिहिण्याच्या आणि वाचण्याच्या कृतींमुळे पाठांतराच्या संस्कृतीला छेद दिला गेला आणि जास्तीत जास्त लोकांना जोडणारे संज्ञापनाचे पूल निर्माण झाले. साक्षात्कारी बोलण्याचे व ऐकण्याचे रूपांतर लिहिण्यावाचण्याच्या ऐहिक आणि उपयुक्त साधनांमध्ये झाले आणि ही साधने खूप मोठा लोकसमूह आपल्या कक्षेत घेऊ लागली. बोलण्याऐकण्याला वेढून असणारे गूढ वलय लिहिण्यावाचण्याच्या कृतींमुळे वितळून गेले. वर्तमानाच्या सुईएवढय़ा अग्रावर तोल टिकवून राहणाऱ्या बोलण्याऐकण्याच्या निसटत्या अनुभवाचे रूपांतर माणसाने लिहिण्यावाचण्यामधून टिकाऊ, अस्सल, पुन्हा परीक्षणासाठी उपलब्ध होऊ शकेल अशा, स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडणाऱ्या सांस्कृतिक ऐवजामध्ये केले.
याचा अर्थ लिहिण्यावाचण्याच्या कृती संस्कृतीच्या राजकारणातून अलगदपणे सुटल्या असे नाही. त्यांच्या भोवतालीही सत्तेची जाळी विणली गेली. लिहिण्यावाचण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत असल्यामुळे मानवी समाजामध्ये संस्थात्मक पातळीवरच्या संरचना अस्तित्वात येणे गरजेचे ठरले. शिक्षणव्यवस्थेमध्ये लिहिण्यावाचण्याचा समावेश झाला असला तरी लिहिण्यावाचण्याचे समाजातील वितरण समतेचे राहिले नाही. सर्वांनाच लिहिणेवाचणे शिकता येत नाही. तुलना करता सर्वांनाच बोलता व ऐकता येते. सर्वांना लिहिता वाचता येत नाही याचा अर्थ लिहिण्यावाचण्याचे फायदे सर्वांनाच मिळत नाहीत. बोलण्याऐकण्याच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जाण्याचा लिहिण्यावाचण्याचा प्रवास पुन्हा विषमतेच्याच प्रदेशात होतो. जे लिहितात व वाचतात ते सर्वच सारख्या दर्जाचे असतात असेही म्हणता येत नाही. कोण काय लिहितो आणि वाचतो, त्याचा उत्पादनाशी काय संबंध असतो, त्याला बाजारात काय भाव असतो यांसारख्या सर्व गोष्टींमुळे लिहिण्यावाचण्याच्या मुळातील लोकाभिमुख साधनसामग्रीला अनिष्ट वळणे लागू शकतात, हे आपण पाहतो आहोत. ज्यांच्याजवळ सामर्थ्य आहे ते लोक नफ्याचे लिहिणेवाचणे करतात व जे नागवले गेले आहेत त्यांना शाळेत प्रवेशही मिळत नाहीत, हेही आपण अनुभवतो आहोत. लिहिण्यावाचण्याच्या प्रकारानुसार कोणी काय करायचे हे ठरत असल्यामुळे विषमतेच्या व्यवस्थेला खतपाणी घातले जाण्याचे श्रेयही लिहिण्यावाचण्याच्याच पदरी पडते.
माणसाच्या सांस्कृतिक वाटचालीत लिहिण्यावाचण्याच्या कृतींमध्ये काही आंतरिक अंतर्विरोधही निर्माण झाले आहेत आणि त्यांनी लिहिण्यावाचण्याच्या संस्कृतीला विशिष्ट रूप प्राप्त करून दिले आहे. हे आंतरिक अंतर्विरोध संस्कृतीला अभिप्रेत असलेल्या लिहिणे आणि वाचणे या दोहोंतील संबंधांनी जन्माला घातले आहेत. उदाहरणादाखल बोलायचे झाल्यास लिहिणे अधिक मूलभूत की वाचणे अधिक मूलभूत हा प्रश्न पाहा. कोणी एके काळी लिहिणारा विशेष महत्त्वाचा नसे. तो कोण होता याचे चिन्हही त्याने मागे सोडलेले नसे. त्याने लिहिलेल्या शब्दांची पालखी वाहून नेणारे लोक अधिक महत्त्वाचे असत. खरे पाहिले तर लिहिलेले शब्द ही सार्वजनिक मालमत्ताच असे. तिचा उपभोग घेण्याचे, तिच्यात बदल करण्याचे, तिच्यात भर घालण्याचे, तिच्यातला काही भाग वगळण्याचे अधिकार वाचणाऱ्या लोकांना असत. ही परिस्थिती हळूहळू बदलली. वाचणाऱ्यापेक्षा लिहिणारा जास्त महत्त्वाचा मानला जाऊ लागला. तो ईश्वराचा विशेष लाडका, प्रतिभावंत, शहाणा, ज्ञानी समजला जाऊ लागला. आपल्या संहितेवर आपल्या नाममुद्रा तो नीट ठोकून बसवू लागला. राजेशाहीच्या काळात तो दरबारातील नररत्नांपैकी एक मानला जाऊ लागला. राजेशाहीचा प्रभाव ओसरल्यावर त्याने लिहिलेले बोल खुल्या बाजारात विकले जाऊ लागले आणि या विक्रीतून त्याच्या स्वामित्वधनाची सोय होऊ लागली. कसे लिहावे, कोणत्या शैलीत लिहावे, कोणते संकेत पाळावेत, कोणती तंत्रे वापरावीत, कुठले रूपबंध वापरावेत, कोणत्या कल्पना उपयोगात आणाव्यात, कोणत्या गोष्टी लिहाव्यात, त्या लिहिताना कोणते नियम पाळावेत, कोणत्या लिहिण्याला उत्तम म्हणावे, कोणत्या लिहिण्याला अधम म्हणावे याचे शास्त्र विकसित होऊ लागले. ते एका भाषेतून दुसऱ्या भाषेत, एका काळातून पुढच्या काळात पाठवले जाऊ लागले. त्याच्या परंपरा निर्माण झाल्या. लिहावे कसे याचे औपचारिक पातळीवरचे शिक्षणही काही विदयापीठांमधून दिले जाऊ लागले.
हे सर्व चालू असताना वाचण्याविषयी काय घडत होते. लिहिणारा सिंहासनावर विराजमान झालेला असताना वाचणारा बिचारा दुर्लक्षित राहिला होता. तो त्याची कृती नेमकी कशी करतो किंवा त्याने त्याची कृती नेमकेपणाने कशी करावी याची विशेष चर्चा होत नव्हती. त्याने लिहिणाऱ्याला अनुसरावे, लिहिणाऱ्याचा अनुभव आपलासा करावा, लिहिणाऱ्याला जे वाटते ते नम्रपणे समजून घ्यावे, ते आपल्या वाचनाच्या कृतीमुळे विरूप होऊ नये याची काळजी घ्यावी, त्याने लिहिणाऱ्याची सावलीच होऊन राहावे आणि कधीही त्याच्यापासून पृथक होऊ नये अशा अपेक्षा वाचणाऱ्याकडून केल्या जात. लिहिलेल्या संहितेचा अर्थ लावताना वाचणाऱ्याने कोणती तंत्रे वापरावीत याविषयीचे मार्गदर्शन साहित्यशास्त्रात पंडित करत असले तरी वाचनाची प्रक्रिया गौणच याविषयी सर्वांचीच खात्री पटलेली असे. लिहिणाऱ्याप्रमाणे वाचणाराही प्रतिभावंत असावा अशी अपेक्षा धरली जाई, तथापि, या प्रतिभेचा उपयोग त्याने लिहिणाऱ्याला अनुसरण्यासाठी करावा अशी अट घातली जाई. लिहिणाऱ्याने आखलेल्या लक्ष्मणरेषेपलीकडे वाचणाऱ्याने जाऊ नये अशीच संस्कृतीची इच्छा असे.
अलीकडच्या काळात वाचणाऱ्याने विचार करणाऱ्या लोकांचे चित्त आकर्षून घेतले आहे. त्याच्या वाचनाच्या कृतीमध्ये सुप्त स्वरूपात दडलेल्या सर्जनाच्या शक्यता पुढे आणल्या जात आहेत. लिहिणाऱ्याचा अग्रक्रम रद्दबातल होऊ लागला आहे. याचा अर्थ वाचणाऱ्याने तो अग्रक्रम पादाक्रांत केला आहे, असे नाही. वाचावे कसे याचे अभ्यासक्रम अजूनही विद्यापीठांमध्ये सुरू झालेले नाहीत. वाचायला शिकवणे औपचारिक शिक्षणाच्या पहिल्या दोनतीन वर्षांपुरतेच मर्यादित राहिले आहे. असे असले तरी वाचण्याला व वाचणाऱ्याला बरे दिवस येऊ लागले आहेत, असे खात्रीने म्हणता येते. दोहोंपैकी कोणाला तरी अग्रक्रम देण्याऐवजी लिहिणे आणि वाचणे यांच्यातील द्वंद्वात्मक संबंध अधोरेखित होऊ लागले आहेत. लिहिण्यामुळे वाचणे आणि वाचण्यामुळे लिहिणे शक्य होते, दोहोंतील संघर्षातून परस्परांचे असणे निश्चित होते याची जाणीव लोकांना होऊ लागली आहे. वाचणाऱ्याला केंद्रस्थानी ठेवून सैद्धान्तिक उपक्रम रचले जाऊ लागले आहेत. वाचणारा वाचतो तेव्हा नेमके काय होते याचे तत्त्वज्ञानाच्या पातळीवरचे विश्लेषण होऊ लागले आहे. वाचणारे काय वाचतात, कसे वाचतात, त्यांची वाचण्याची प्रक्रिया कशी चालते, तिचे सामाजिक संदर्भ काय असतात, ते वाचनाच्या कृतींवर कोणते परिणाम घडवून आणतात, वाचण्याचा वाचणाऱ्यावर कोणता परिणाम होतो, वाचणाऱ्याच्या संहितेकडून काय अपेक्षा असतात, वाचणाऱ्याच्या कृतीमध्ये आणि मनामध्ये लिहिणाऱ्याचे कोणते चित्र असते अशा अनेक प्रश्नांचा विचार होऊ लागला आहे. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, साहित्यशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास अशा अनेकविध ज्ञानशाखांचे लक्ष वाचणाऱ्याकडे गेले आहे.
लिहिण्यावाचण्याच्या इतिहासानेच नव्हे तर मानवी संस्कृतीच्या इतिहासाने वाचणाऱ्यावर आणि वाचण्याच्या कृतीवर मोठीच जबाबदारी टाकली आहे. मराठी वाचणारे ही जबाबदारी पेलत आहेत असे म्हणता येईल काय?

- हरिश्चंद्र थोरात
संपर्क : ९८१९०९४२३६

18/06/2020

मुक्त शब्द , जून २०२०

जातिव्यवस्था आणि स्त्रीवाद
- रूपाली जाधव

जातिव्यवस्था
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, प्रत्येक जात ही दुसऱ्या जातीला कमी लेखते, आपल्यापेक्षा वरच्या जातीचा द्वेष आणि खालच्या जातीला तुच्छ लेखते या समीकरणातून जातिव्यवस्थेची उतरंड टिकून राहते. हे बाबासाहेबांचे वाक्य आजही इथल्या समाजव्यवस्थेला तंतोतंत लागू पडते. आज वर्णव्यवस्था अस्तित्वात नसली तरी जातिव्यवस्था आणि पितृसत्ता ही शोषण शासनाची व्यवस्था भारतात आहे . जातीच्या उतरंडीमध्ये स्त्रियांचे स्थान हे सर्वांत खालचे मानले गेले आहे.
पुरुष सत्तेचा उदय हा शोषण व वरकड मूल्याच्या आधारावर झाला.

‘‘ढोल, गंवार, शूद्र, पशु, नारी सकल ताड़न के अधिकारी" अशी ही धारणा प्रचलित असली तरी त्याही खाली बाई ही पायाखालची धूळ आहे तिला पायाखालीच ठेवले पाहिजे". हेही याच मनुस्मृतीत म्हटले आहे. स्त्रियांना स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतरही कुटुंबापासून ते सार्वजनिक क्षेत्रापर्यंत दुय्यम वागणूक दिली जाते. आपल्या समाजामध्ये ब्राह्मणी पितृसत्ताक समाजव्यवस्थेच्या आधी मातृप्रधान गणपद्धती अस्तित्वात होती. जी की, "समता, बंधुता, स्वातंत्र्य" या मूल्यांवर आधारित होती. जिथे खाजगी मालकीला कुठलाही थारा नव्हता. निसर्गाशी मैत्री करत प्रत्येक घटकाला म्हणजे नारी-नर असा कुठलाही भेद न मानता स्त्रियांच्या नेतृत्वाखाली समान न्याय देणारी पद्धती अस्तित्वात होती. ही मातृप्रधान पद्धत नेस्तनाबूत करून येथे पितृसत्ताक पद्धती प्रस्थापित केली गेली. ती इथल्या विषमता, शोषण व वरकड मूल्याच्या आधारावर. या कब्जा केलेल्या खाजगी संपत्तीचे जतन, समृद्धी व संवर्धन, या प्रश्नांतून पुढे पुरुषसत्तेचा उदय झाला.
ही सत्ता टिकवण्यासाठी धर्म आणि पितृसत्ताक विचारधारा एकमेकांच्या हातात हात घालून, ब्राह्मणी पितृसत्ता म्हणून काम करू लागली. या ब्राह्मणवादाला कुठलाही जातिवाचक अर्थ न चिटकवता जातिसंस्था व पितृसंस्था यांचे गठण व भरणपोषण करणारी सांस्कृतिक यंत्रणा म्हणून समजून घेतले पाहिजे. ब्राह्मण्यवाद ही फक्त स्त्री-पुरुषांच्या विषमसंबंधावर नव्हे तर जातिव्यवस्थेच्या शोषण शासनालाही आधारभूत ठरते. स्त्री लैंगिकतेच्या नियंत्रणाची व्यवस्था हा जातिव्यवस्थेचा मुख्य आधार आहे, स्त्रियांच्या लैंगिक नियंत्रणावर व पायावरच जातीची निर्मिती व सातत्य टिकून आहे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या निदर्शनास आणून दिलेले आहे.
ब्राह्मणी पितृसत्ताक समाजव्यवस्थेत स्त्री-पुरुषांच्या भागीदारीचा प्रश्नच नसून यात स्त्रियांचे संबंध हे जाचक, अन्यायकारक आहेत. येथे जातीनुसार स्त्रियांच्या भागीदारीचे स्वरूप बदलते. यात कोणा एकाची हुकूमशाही, व्यक्तिवाद, हक्क, वारसा,मालकी याचा समावेश होता, अशा गोष्टींच्या पायावर उभारलेली ही सत्ता मुळातच "कुणा एका वर्गाचे हित, तर कुणा एका वर्गाचे शोषण" घेऊन उदयास आलेली दिसून येते. या जातीय पितृसत्ताक समाजव्यवस्थेमुळे श्रमिकांची विभागणी, जातीचे अस्तित्व, उत्पादनपद्धती उभी राहिली. त्याचबरोबर श्रेणीबद्ध उतरणीचे सातत्यही टिकून राहिले.
ब्राह्मणी पितृसत्ताक समाजव्यवस्थेच्या उभारणीचा प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा इथल्या ब्राह्मणी पितृसत्ताक विचारधारेने इथले राजकारण, अर्थकारण,धर्मकारण, समाजकारण, रूढी,परंपरा, या सर्व गोष्टींवर आपले प्रभुत्व व त्याचबरोबर आपली सत्ता प्रस्थापित केली. ही सत्ता टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी धर्माचा मोठय़ा प्रमाणावर आधार घेतला आणि एकाधिकाराच्या दृष्टीने सर्व नीतीनियम, हक्क, लिंग आधारित श्रमविभागणी, कर्तव्य व नौतिक-अनौतिक भ्रामक कल्पना यांची मांडणी धर्माच्या आडून केली. या सत्तेचे संवर्धन करण्यासाठी सत्ता वंशपरंपरेने पुरुषांकडे बहाल केली.
पितृसत्तेच्या वृद्धीसाठी कुटुंबसंस्था,सार्वजनिक जीवन, विवाहसंस्था, जात-जमात, इत्यादींसारख्या सर्व स्तरांवर ब्राह्मणी पितृसत्ताक पुरुष घडविण्यासाठीची तरतूद करण्यात आली, ज्यातून त्यांचा कच्चा माल हा या व्यवस्थेत तयार होऊन इथल्या पितृसत्ताक समाजव्यवस्थेला पूरक असे साधन तयार होईल.
याच धर्माने स्त्रीला देवत्व बहाल केले आणि दुसरीकडे
‘‘चूल आणि मूल" या लिंगाधारित श्रमविभागणीत अडकवून तिला परावलंबी बनवले. जाति-धर्माच्या आडून रोटी-बेटी व्यवहार, योनिसशुचिता, वंशशुद्धीच्या नैतिक कल्पनेतून जातीतच स्त्रीचे लग्न होऊन संपत्तीचे रक्षण आणि केंद्रीकरण होईल याचे षडयंत्र आखले . प्रत्येक जातीची दोरी ही पुरुषाच्या हातात दिली व सोयीस्करपणे विविध संस्था, शिक्षणव्यवस्था, राजकारण, समाजकारण, अर्थकारण यांत पुरुषसत्तेला पूरक असे वातावरण मिळून त्या त्या जातीतील स्त्रीवर अंकुश ठेवता येईल असे मोठे जाळे आखले गेले.

भंवरीदेवी ही अस्पृश्य असल्यामुळे तिच्यावर सवर्ण पुरुष बलात्कार कसा करू शकेल?
स्त्रीद्वेष किंवा स्त्री-संघर्ष हा तिच्या जन्मापासूनच सुरू होतो. तिला या जगात येऊ द्यायचे की नाही इथून सुरुवात झालेली असते. लहानपणापासून तिला घरात समान वागणूक दिली जात नाही. आजही शिळे अन्न हे नेहमी घरातील बाईच्या वाटय़ाला तर ताजे व मर्जीचे अन्न पुरुषाला हे कित्येक घरांत होताना दिसून येते. खेडय़ात, झोपडपट्टय़ांमध्ये आजही सरकारी शाळांसाठी मुली तर प्रायव्हेट दर्जेदार शिक्षणासाठी मुलाचा विचार केला जातो.
पुरुषाच्या करिअरवर तर बाईच्या लग्नावर खर्च विभाजित केला जातो. लग्न झाल्यानंतरही सासरी बाईचं मूल्य हे ‘‘बिनपगारी अन् फुल अधिकारी" असेच असते. ती किती त्यागमूर्ती आहे यावर तिचे गौरवीकरण तसेच मूल्यमापन केले जाते.
जमीन, स्थावर मालमत्ता या गोष्टींवर तिची फक्त कागदोपत्री मालकी राहते. स्त्रीचे शोषण हे प्रत्येक जातीत वेगवेगळ्या स्तरावर अवलंबून असते. प्रत्येक जात ही ब्राह्मणी पितृसत्ताक विचारधारेचे अनुकरण करून जातिनिहाय बाईचे शोषण करते.

ब्राह्मण अथवा सवर्ण स्त्री ही जरी दलित स्त्रीपेक्षा उच्च असली तरी तिच्या जातीतील पुरुषाच्या तुलनेत तिला मिळणारे हक्क, अधिकार, नियम हे तुलनात्मकरित्या नगण्यच होते व आहेत. ब्राह्मण/सवर्ण स्त्रीवर तिचा वंश, कुळ, जात, धर्म शुद्ध ठेवण्याची तसेच ती जपण्याची - परिणामी स्वत:ला पिंजऱ्यात ठेवण्याची जबाबदारी तिच्यावर लादली जाते. ती जरी ब्राह्मण/सवर्ण म्हणून प्रतिष्ठित असली तरी तिला तिच्या पती, पिता, पुत्र या सर्वांची कामे करणे, कुटुंब सांभाळणे नैतिकदृष्टय़ा बंधनकारक असते. शिवाय ते न केल्यास ती आदर्श स्त्री नसते दुसऱ्याच्या आणि स्वतःच्या नजरेतही.

एखादी सवर्ण बाई ही जरी राजकीय पदावर असली तरी ती फक्त नामधारी असते. सर्व कामे ही पुरुषच करतात. तिच्या बुद्धिमत्तेवर घेतलेली ही एक शंकाच म्हणावी लागेल. परिणामी त्यांना शैक्षणिक कुवत असूनही नेतृत्वात येण्यासाठी खूप साऱ्या अडथळ्यांना पार करावे लागते. ती जरी ब्राह्मण/सवर्ण असली तरी, जातीच्या उतरंडीनुसार खालच्या जातीतील समजल्या जाणाऱ्या पुरुषांकडून तिला फक्त एक मादी म्हणूनच भक्ष्य बनवले जाते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे हैदराबाद येथील एका उच्चवर्णीय, उच्चवर्गीय, उच्चशिक्षित महिलेवर झालेला बलात्कार व तिची हत्या.
खालच्या जातीच्या पुरुषांना उच्चजातीय स्त्रियांच्या तुलनेत खालचे स्थान प्राप्त झालेले असते. या पुरुषाने उच्च जातीतील स्त्रियांचा विनयभंग केल्यास त्यांना मृत्युदंडाची शिक्षा ही ठरलेली असते. परंतु याच ठिकाणी दलित महिलांवर झालेल्या बलात्काराला शिक्षा होणे तर दूर उलट दलित महिलेवर सवर्ण पुरुष बलात्कार करूच शकत नाही असे प्रतिपादन भंवरीदेवीच्या केसमध्ये झालेले दिसून येईल. भंवरीदेवी ही अस्पृश्य असल्यामुळे तिच्यावर सवर्ण पुरुष बलात्कार कसा करू शकेल? हे एका न्यायालयाचे प्रतिपादन आहे.

सर्व प्रकारच्या हिंसा हे जातपितृसत्तेचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे.

उच्चजातीय स्त्रिया पतीला मालक धनी संबोधतात पण त्याच स्त्रिया जातिउतरंडीनुसार निम्नजातीतील पुरुषांच्या मालक किंवा धनी ठरतात. याउलट दलित पुरुष जो स्वतः जातीच्या उतरंडीत पिचला गेला असला तरी पुरुषसत्तेचे काही अंशी फायदे मिळतात (जे ब्राह्मण पुरुषांच्या तुलनेत कमी असतात.) उदाहरणार्थ, खालच्या जातीतील पुरुषांना पितृसत्ता शुद्धता, श्रेष्ठता, स्वामित्व, प्रदान करते त्याचप्रमाणे दलित स्त्रीला अशुद्धता, कनिष्ठता व अवलंबित्व बहाल करते. दलित पुरुषांना उतरंडीप्रमाणे त्यांच्या खाली कोणती दुसरी जात नसून ती एका बाईच्या/लिंगभेदाच्या स्वरूपात आपले पुरुषी वर्चस्व गाजवत असते. याची कैक उदाहरणे दलित वस्त्यांमध्ये बाईला फक्त मारझोड करण्यापुरती नव्हे तर तिला चारचौघांत नागडी करण्यात, पावित्र्याच्या संकल्पनेतून तिचे नाक कापण्यातही दिसून येते.( याची मी स्वत: साक्षीदार आहे.)
दलित पुरुषामध्ये असणाऱ्या ब्राह्मणी पितृसत्तेच्या अहंकाराला दलित महिला बळी पडतात. त्या शोषणासाठी उच्चजातीय पुरुषालाही उपलब्ध असतात आणि स्वतः शोषित असलेल्या दलित पुरुषालाही उपलब्ध असतात. दलित पुरुषांकडून तिचे शोषण जात आणि स्त्री म्हणून दुहेरी असते.
उदाहरणार्थ, तिला घरामधे कुटुंबातील सर्व कामे करणे बंधनकारक तर आहेच शिवाय तिला सवर्णाच्या घरी मजुरी/घरकामे करावी लागतात. त्याचबरोबर सर्व घाणीची कामे उदाहरणार्थ, संडास धुणे, मुलांची,आणि घरातील वृद्ध लोकांची शुश्रुषा, साफ करणे ही बाईचीच अलिखित स्वरूपातील कामे मानली जातात. घराची इज्जत राखण्याची आद्य जबाबदारी म्हणजे त्या पुरुषाबद्दल कुठेही न बोलणे व आपल्यावर झालेल्या अन्यायाची वाच्यता कुठेही न करण्याची जबाबदारी ही समाजमान्य पद्धतीने तिच्यावर लादली जाते.
एकीकडे बाईला अबला म्हणत दुसरीकडे मात्र तिच्याकडून खूप मोठमोठय़ा अपेक्षा ठेवण्यात येतात. पुरुषाला नेहमी बाईमध्ये आई हवी असते जी त्याच्या प्रत्येक गोष्टीला मान्यता देईल, निःस्वार्थी पद्धतीने प्रेम करेल, त्याचा प्रत्येक हट्ट पुरवेल म्हणजे यामध्ये केंद्रस्थानी पुरुष असतो, ‘‘मी" असतो. बाईमधे आई असावी याचे उदात्तीकरण करणारी कैक उदाहरणे आपल्या साहित्यामध्ये आहेत..
येथे पुरुषाचा दांभिकपणा दिसून येतो. एकीकडे ती अबला, पीडित, सर्वस्वी पुरुषावर अवलंबून आहे पण दुसरीकडे मात्र तिच्याकडून मोठी अपेक्षा करणे आणि सतत आपल्या सोयीनुसार नात्यांची गुंफण करणे हे किती योग्य आहे?
मी असं म्हणेल की सगळ्यात आधी तुम्ही तिचं माणूसपण स्वीकारा.
तिला तिचं ‘‘माणूसपण जगू द्या" मग ती स्वत: ठरवेल की तिला काय हवंय काय नको ते.
जातिव्यवस्थेमुळे सगळ्यात जास्त दबलेला शोषित परंतु तरीही आवाज न काढता येणारा घटक म्हणून दलित बाईची होणारी कुचेष्टा आपल्याला इथे दिसून येते.
पितृसत्ता का टिकते? याचे एक महत्त्वाचे हेही कारण आहे की काही प्रमाणात समाजव्यवस्थेत पुरुषसत्तेच्या वाहक या मोठय़ा प्रमाणावर स्त्रियाही बनल्या आहेत, परिणामी शोषकांच्या संस्थेत आणखीन भरच पडली आहे.

सर्व प्रकारच्या हिंसा हे जातपितृसत्तेचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. यामध्ये शाब्दिक, भावनिक हिंसा, लैंगिक, शारीरिक, आर्थिक हिंसा, या सर्व स्त्रियांवर नियंत्रणासाठी वापरल्या जातात.
महिलांचे तथाकथित चारित्र्यहनन हे जातपितृसत्तेचे महत्वाचे साधन आहे. स्त्रीची प्रतिष्ठा तिची जात, वैवाहिक दर्जा, विधवा, परित्यक्त्या स्त्रिया मूल/मुलगा आहे की नाही. प्रतिष्ठेचे खोटे भ्रम तयार करून महिलांमध्ये ही फूट पाडली जाते
उदाहरणार्थ, टाकलेली बाई विरुद्ध नवरा असलेली बाई, विधवा विरुद्ध नवरा असलेली, मुले असलेल्या विरुद्ध नसलेल्या, समलिंगी विरुद्ध हेट्रोसेक्शुअल.
शासनसंस्था तिचे विविध घटक आणि जातपितृसत्ता यांची घट्ट मैत्री असते. पारंपरिक आणि नव्या रूपात असलेल्या जातपंचायती याही महिलांवर नियंत्रणे ठेवतात. आजच्या भांडवली डिजिटल युगात स्त्रीचे चारित्र्यहनन सायबर क्राइममार्फत केले जाते, या हिंसेची अनेक उदाहरणे आहेत. त्यातून महिलांना मोठय़ा प्रमाणावर शारीरिक-मानसिक हिंसेला सामोरे जावे लागते.

येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. पुरुषांना जरी या ब्राह्मणी पुरुषसत्तेचे फायदे मिळाले असले तरी काही प्रमाणात त्याचे तोटेही अप्रत्यक्षपणे त्यांच्यात समाविष्ट झाले आहेत. निदान बाईचे होणारे शोषण हे दृश्य स्वरूपाचे आहे, परंतु पुरुषांचे होणारे शोषण हे अदृश्य स्वरूपाचे आहे. जे मर्दानगीच्या, पुरुषार्थाच्या खोटय़ा भ्रामक कल्पनांनी इथल्या पुरुषाचे निरागस, संवेदनशील जगणे, सुखं, दुःख, हसणे, रडणे, लाजणे या सर्व क्रिया जे की जिवंत माणसाचे वैशिष्टय़ आणि लक्षण आहे ते हिरावून घेऊन त्याला एक निगरगट्ट, असंवेदनशील, क्रूर चालतेफिरते यंत्र बनविते आहे, ज्यामुळे खोटय़ा मर्दानगीच्या ओझ्याखाली दबून त्याला आपले माणूसपण गमवावे लागते.

या जातिधर्माने स्त्री शोषित तर केलीच त्याचबरोबर या शोषणव्यवस्थेचा भार आपल्या डोक्यावर वाहण्याची आद्य जबाबदारीही कशी तिचीच आहे हेही तिच्या माथी मारण्याची व्यवस्था सफल झालेली आपणास दिसून येते, परिणामी कुठल्याही जातीतील स्त्री ही (जरी त्या जातीत तिचा तिरस्कार होत असेल तरी) त्या जातीचा द्वेष करताना दिसत नाही, तर ती जात,धर्म, वंश पुढे कसा जाईल त्याचे संवर्धन कसे होईल याची तरतूद करताना दिसून येते. जातीच्या अनुषंगाने उच्चस्तरीय स्त्रिया थोडय़ा प्रमाणात का होईना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सुविधा मिळाल्याने त्या शोषणावर बोलताना अथवा ते नाकारताना दिसतात. परंतु दलित स्त्रीला यापैकी कुठलीही गोष्ट न मिळाल्याने ती पुन्हा याच शोषक व्यवस्थेच्या आधारावर विसंबून असलेली आपणास दिसून येते. आजच्या भांडवली युगात स्त्रीच्या शोषणाचे स्वरूप काहीसे बदलेले दिसून येत आहे.

डिजिटल युगात तिचे प्रॉडक्ट वस्तू म्हणून शोषण झालेले दिसून येते. इथल्या ब्राह्मणी भांडवलशाहीने आणखी पुढे जाऊन तिचे वस्तूकरण करत तिच्या शरीराला बाजारात वस्तू म्हणून विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. आजही आपण पाहू शकतो की आर्थिक - सामाजिक - सांस्कृतिक हे सर्व अधिकार महिलांना नसल्यामुळे त्या कोणत्याही गोष्टीत पुढे येत नाहीत. त्या स्वतः त्याबद्दल जागृत नाहीत आणि जरी जागृत झाल्या तरी त्यांना पुढे जाण्यापासून रोखणाऱ्या या व विविध संस्था मोठय़ा प्रमाणावर काम करताना, साधं तिला तिचं शिक्षण पूर्ण करायचे असेल तरी घरातील कामे कोण करणार हा छोटा वाटणारा पण गंभीर प्रश्न तिच्यासमोर असतो. घरातील कोणीही व्यक्ती तिला मदत करणे तर दूरच परंतु तिच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलेही जात नाही. ही आजची परिस्थिती आहे.

स्त्रीवाद
महात्मा फुले यांनी जातिअंताच्या लढाईतील स्त्रियांच्या मुक्तीचा प्रश्न हा केंद्र व मध्यवर्ती ठेवला; मात्र त्यानंतर चळवळीमध्ये हा प्रश्न मागे पडला. सर्व जातिचळवळी व वर्गचळवळी या पुरुषमुक्ती चळवळ असल्याचे कॉम्रेड शरद पाटील नोंदवतात. वर्चस्वाचा सामना करण्याच्या धुमाकुळीत आक्रमक पुरुषी आवेशाने चळवळी व्यापून गेल्या. दलित चळवळीतही तेच घडले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनंतर स्त्रीसहभाग कमी होत गेला. स्त्रियांचे अधिकाधिक गृहिणीकरण होत गेले आणि चळवळ पुरुषप्रधान बनत गेली.

गुलामाला गुलामीची जाणीव झाल्यानंतर तो पेटून उठणारच..
गुलामाला गुलामीची जाणीव झाल्यानंतर तो पेटून उठणार या बाबासाहेबांच्या उक्तीप्रमाणे प्रत्येक शोषित घटक - मग तो कुठल्याही जाती ,वर्ण,वर्गातील असेल वा कोणत्याही लिंगाचा असेल - तो पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आज शाहीनबागमध्ये एनआरसी, सीएएसारख्या आंदोलनात आपल्या समूहासाठी राजसत्तेशी निर्भीडपणे भिडणाऱ्या, लढणाऱ्या मुस्लीम स्त्रिया उद्या स्वतःच्या मूलभूत न्याय्य हक्कासाठी झगडणार नाहीत, पेटून उठणार नाहीत या भ्रमात कोणी राहू नये.
स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या पुरुषांनी जातीय, वर्गीय, धार्मिक प्रश्नांप्रमाणे लिंगभेदाचा मुद्दा पुढे आणला नाही. प्रस्थपितांप्रमाणेच इथेही स्त्रियांची संख्या ही प्रातिनिधिक स्वरूपाचीच दिसून येते.
चळवळीतील भाषा, संस्कृती, लिखाण हे अजूनही पुरुषप्रधानच आहे. आजही चळवळीतील लोक पारंपरिक पद्धतीचे सर्व सोहळे करताना दिसतात. स्वत:च्या लग्नात मंगळसूत्र अथवा हुंडा याला ठामपणे नकार देताना कुणीही दिसत नाही.( हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत काही मान्यवर सोडून.)
स्त्रीला नेतृत्वात अथवा चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी कुठल्याही चळवळी विशेष श्रम घेताना दिसून येत नाहीत. किंबहुना ते त्याच्या जाणिवेत नेणिवेत दूरपर्यंत नसल्याचे लक्षात येते.
चळवळीमध्ये येणारा खालच्या जातीतील पुरुष हा जात-लिंगभावाच्या उतरंडीमधून येताना विशिष्ट मनोद्वंद्वामध्ये अडकलेला असतो. एका बाजूला पुरुष म्हणून प्राप्त झालेली श्रेष्ठता, वर्चस्व, स्वामित्व ; दुसऱ्या बाजूला जातीने दिलेल्या कमीपणा, सेवावृत्ती पालन करताना दिसतात. त्याचबरोबर उच्च स्त्रियांमध्ये असणारी श्रेष्ठता वर्चस्व स्वामित्व तर दुसऱ्या बाजूला बाई म्हणून मिळालेली हीनता, सेवावृत्ती, अवलंबित्व या परस्परविरोधी गोष्टी घेऊन दोघेही आपल्या जातवास्तवासहित चळवळीत येतात. परिणामी स्त्रीदास्याचा मुद्दा लांब फेकला गेला.

स्त्रीदास्य चळवळीची भूमिका पत्रात बंद झालेली दिसून येते.

एकोणिसाव्या शतकात संपूर्ण जगात स्त्रीमुक्तीचे वारे वाहू लागले. स्त्रियांचे प्रश्न पुढे आले. भारतामध्ये स्त्रियांच्या प्रश्नावर काम चालू होतेच; परंतु १९७५नंतर स्त्रीवादाची खरी मांडणी सुरू झाली. यामध्ये बलात्कार, हुंडाबळी, कौटुंबिक हिंसा मुख्यतः या प्रश्नांना घेऊन महिला पुढे येताना दिसल्या.
१९९० साली दलित स्त्रियांनी आपला स्त्रीवाद आणि सवर्ण स्त्रियांचा स्त्रीवाद यामध्ये काही फरक असल्याचे नमूद केले. जातीने, वर्गाने आणि लिंगाधारित होणाऱ्या शोषणाने त्या उच्चवर्णीय स्त्रियांपेक्षा कशा वेगळ्या आणि अधिक शोषित होत्या हे त्यांनी इथे नमूद केले.
‘‘माझं जगणं, माझा अनुभव, माझा स्त्रीवाद" अशी मांडणी करत त्या पुढे आल्या.
‘‘( परंतु त्याचबरोबर सवर्ण महिलांशी मित्रभावी पद्धतीने सतत संघर्ष करत राहू ही मांडणी झाली.)''

स्त्रीदास्य ही गोष्ट चळवळीच्या भूमिका पत्रात बंद झालेली दिसून येते.

आजही चळवळीत १०० पुरुषांमागे साधारण एक स्त्री येताना दिसते, बाहेरील ब्राह्मणी पितृसत्ताक समाजव्यवस्थेप्रमाणेच इथेही थोडय़ाफार प्रमाणात तिला लिंगभेदाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. किंबहुना इथे झालेल्या अनपेक्षित अन्यायामुळे ती आणखीनच निराशेच्या गर्तेत जाते व समाजबदलाच्या विचारापासून कोसो दूर फेकली जाते. तिला कुठल्याही चळवळीत सुरक्षित हक्काची व ती आत्मविश्वासाने वावरेल असे वातावरण अशी जमीन अजून तरी तयार झालेली दिसून येत नाही.
पुरुषांपेक्षा कितीतरी अधिक पटींनी स्त्री ही आधी घरात, मग समाजात संघर्ष करत ती चळवळीचा भाग बनू पाहते.
प्रत्येक मोर्चा, आंदोलन, वर्गभेद, जातिभेद या विषयावर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून भिडते; परंतु जेव्हा लिंगभेदाची लढाई समोर येते तेव्हा नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्व जण सोयीस्कर पद्धतीने स्त्रीप्रश्न डावलताना दिसतात.
स्त्रीदास्य ही गोष्ट फक्त चळवळीच्या भूमिका पत्रात लिखित स्वरूपात बंद झालेली दिसून येते. स्त्री प्रश्नाकडे मुळातच फक्त महिलांचा विषय म्हणून बघितले गेले. जरी जात ,वर्ग, स्त्रीदास्यअंत हे एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जात असले तरी.

कित्येक नेते,कार्यकर्ते, कॉम्रेड यांच्या घरी स्वतःच्या बायकोला, आई, बहिणीला चहा-पोहे देण्याव्यतिरिक्त दुसरे कुठलेही काम नसते. (मी स्वतः याची साक्षीदार आहे ) हेच नेते पुढे जाऊन स्त्रीमुक्तीची मोठमोठय़ा चर्चा विचारपीठावरून तासन् तास करताना आपल्याला दिसतात. नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत लिंगाधारित श्रमविभागणीचा प्रश्न चळवळीने अजेंडय़ावर घेतलेला दिसत नाही, किंबहुना तो प्रश्नच अस्तित्वात नाही असे वातावरण उभे केले जाते. महिलांनी जर स्त्रीप्रश्न उपस्थित केलाच तर समस्त पुरोगामी पुरुष एकत्र होऊन प्रतिगामी रूप धारण करतात व प्रश्न उपस्थित करणाऱ्या स्त्रीलाच मूर्ख ठरवतात. परिणामी काही स्त्रियांना या प्रश्नांना घेऊन वेगळे काम करायला लावण्यास ह्या सर्व पुरोगामी संघटनाच जबाबदार आहेत.
स्त्रीने केलेला विद्रोह हा लिंगभेदाला तर छेद देतोच सोबतच शोषणावर उभ्या राहिलेल्या जातिव्यवस्था, वर्गव्यवस्था, वर्णव्यवस्था, धर्मव्यवस्था या सगळ्यांना हादरा देतो, हे सोयीस्कर पद्धतीने दुर्लक्षित केले जाते.

ज्यांनी या जातिअंतासाठी व स्त्रीदास्यासाठी योगदान दिले आणि ब्राह्मणी पितृसत्तेची उकल करण्यात पुढाकार घेतला त्यात महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कॉम्रेड शरद पाटील, उमा चक्रवर्ती, शर्मिला रेगे. अशा थोर विचारवंतांची मोठी परंपरा आहे.

कोणताही समाज तेव्हाच प्रगत असतो जेव्हा त्यातले स्त्री आणि पुरुष समान असतात.

एक गोष्ट ही काळ्या दगडावरची पांढरी रेष समजून लक्षात ठेवायला हवं की स्त्रीची प्रगती झाल्याखेरीज कुठल्याही समाजाची प्रगती होणे हे अशक्यप्राय आहे. कोणताही समाज तेव्हाच प्रगत होऊ शकतो जेव्हा इथला पुरुष आणि स्त्री हे समान पातळीवर आपले जीवन सुखकर पद्धतीने जगू शकतील. त्यासाठी स्त्रीची मुक्ती, प्रगती, विकास होणे आवश्यक आहे, तिचा झालेला विकास हा या समाजाला नक्कीच परिवर्तित केल्याशिवाय राहणार नाही. परंतु या समताधारित समाजनिर्मितीसाठी फक्त ती एकटी लढून चालणार नाही, तर इथल्या लिंगाधारित ब्राह्मणी पुरुषसत्ताक व्यवस्थेशी लढण्यासाठी समस्त नारी-नर सर्वजातीय स्त्रिया दलित, आदिवासी,बहुजन, ब्राह्मण भटक्या, मुस्लीम, LGBTQ समुदाय आणि पुरुषमित्रांनी एकमेकांच्या हातात हात घालून भगिनीभाव जपत हा समतेचा गाडा पुढे न्यावा लागेल, मिळून लढावं लागेल. तरच या ब्राह्मणी पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेच्या खडकात हे समतेचं बीज रुजेल व समतेचा हा वटवृक्ष आभाळझेप घेत, बहरेल, फुलेल व इथल्या प्रत्येक पीडित, शोषित, वंचित घटकाला समान फळ देईल.

मैं तब भरूंगी ऊंची उड़ान..
जब आज़ाद होगी मेरी सखी सहेली
हर बंधन से हर लगाम से….
वह दिन एक नया उजियारा लाएगा...
उस दिन मैं भरूंगी ऊंची उड़ान आत्मविश्वास के साथ
क्योंकि तब नहीं रहूंगी सिर्फ आजाद मैं..
आजाद होगा मेरा पूरा समाज
आजाद होगी मेरी सखी-सहेली.

- रूपाली जाधव
(कबीर कला मंच,महाराष्ट्र)
संपर्क : ९८८१८४४८५३

18/06/2020

मुक्त शब्द , जून २०२०

जातिव्यवस्था आणि स्त्रीवादातील समलैंगिकता
--- अनिकेत गुळवणी

सामाजिक शोषण व अन्यायाच्या विरोधात होत असलेले कोणते लढे व त्यांचे मार्ग हे योग्य आणि जास्त जवळचे याबाबतची वाटणारी संदिग्धता फारच जटील आणि त्यांच्यात अध्याहृत असणाऱ्या राजकारणाचे बारीक गुंतागुंतीचे सर्वच पदर अभ्यासणे क्लिष्ट. माझ्या अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा मुख्य विषय हा लिंगभाव आणि लैंगिकता; म्हणजेच जेन्डर आणि सेक्शुअॅलिटी. स्वतः समलैंगिक असल्याने आयुष्यभर घेतलेले बरेवाईट अनुभव आणि आता या वयात मानवशास्त्र विषयात मास्टर्स करताना जेन्डरचा केला असलेला अभ्यास, यांमुळे लैंगिक असमानतेवर भाष्य करण्याचा हक्कच असल्याप्रमाणे मी लिहितो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्त्री-अभ्यास केंद्रात लिंगभाव आणि लैंगिकता विषयाचे कोर्स करताना माझ्या लक्षात आले की लैंगिक असमानता ही जातीय, वर्गीय आणि इतर बऱ्याच प्रकारच्या सामाजिक असमानता यांना सतत छेद देत असते, निगडीत आणि गुंतलेली असते. जातीयवादाच्या विरोधात असलेला लढा हा केवळ जातीपातीशीच निगडीत नसून सर्व प्रकारच्या वर्चस्ववादाच्या विरोधात आहे. आणि लिंग-लैंगिकतेचा लढाही प्रस्थापित पितृसत्ताक-ब्राह्मण्यवादी व्यवस्थेच्याच विरोधात असल्याने तो जातीयवादविरोधी लढ्यापासून वेगळा काढता येत नाही. ब्राह्मण कुटुंबात जन्मल्याने जातीयवादाचा त्रास कधी होण्याचा मला प्रश्नच आला नाही, उलट नकळत का असेना फायदेच झाले आणि जातविरोधी लढा व त्यातील राजकारण इत्यादींबाबत सखोल विद्वत्तापूर्ण वाचन-अभ्यास न झाल्याने; याबाबत लिखाणाचा किंवा मतप्रदर्शन करण्याचा मला हक्क नाही, अशी माझी समजूत होती. कारण जातीय अन्यायाचा फर्स्ट-हॅन्ड अनुभव नसल्याने माझ्या लिखाणात ती पोटतिडीकीची कळकळ येणार नाही कदाचित. समलैंगिकतेच्या लढ्यात थोडाफार सक्रिय सहभाग घेतल्यावर आणि त्याबाबत शैक्षणिक अभ्यास-संशोधन केल्यावर मात्र माझ्या लक्षात आले की, मला जसे भोगलेल्या लैंगिक अन्यायाबाबत लिहिता येऊ शकते, तसेच उपभोगलेल्या आणि आता अभ्यासलेल्या जातीय-वर्गीय प्रिविलेजेसबद्दल / विशेषाधिकाराबद्दलही लिहिता येऊ शकतेच. लहानपणी मी ज्या उच्चवर्णीय सग्यासोयऱ्या सामजिक वर्तुळांत वावरलो, तेव्हापासून सतत ऐकत आलेल्या त्यांच्या आरक्षणविरोधी व वर्चस्ववादी अरेरावीच्या प्रश्नांची उत्तरे; आणि तसेच २०१४नंतरच्या राजवटीत वाढलेल्या मुस्लीमद्वेषाची कारणे-उत्तरे मला माझ्या ‘प्रिविलेजेस उपभोगलेल्या परिप्रेक्ष्यातून’ यथाबुद्धी त्याच व्यक्तींना देणे भाग आहे. तरच माझा समलैंगिकतेचा लढा जास्त प्रांजळ, सर्वसमावेशक आणि निःपक्षपाती आहे अशी मला खात्री वाटेल, म्हणून आत्ता या लिखाणाचा प्रपंच होय. माझ्या नेहमीच्या अवजड ‘प्रमाणभाषेत’ हाही लेख लिहीत असल्याने त्यांना समजणे सोपे जाईल अशी अपेक्षा आहे.
समलैंगिकतेबद्दल आणि त्याबाबतच्या अन्यायावर भाष्य केल्यावर बऱ्याच स्ट्रेट व्यक्तींचे म्हणणे असते की,’’ का बरं सारखं सेक्स आणि लैंगिकता-लिंगाबद्दल बोलता तुम्ही एलजीबीटी लोकं, तेसुद्धा सरकार आणि समाजापुढे इतर महत्त्वाच्या आर्थिक-सामाजिक-राजकीय समस्या असताना. लैंगिकतेचा दुय्यम आणि अश्लील मोकाट सुटणारा मुद्दा वर चर्चेत आणण्याचे प्रयोजनच काय सतत?’’ याला उत्तर हेच की, "ज्याचं जळतं त्यालाच कळतं.’’ स्ट्रेट व्यक्तींना हा अन्याय कधीच भोगावा लागत नाही आणि समलैंगिकता म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागत नाही, त्यांना या लढ्याचे महत्त्व जास्त वाटणे शक्यच नाही. फारतर संवेदनशीलतेतून अनुकंपा आणि सहानुभूती/पाठिंबा काही ठरावीक जण दाखवतात. इतर सर्व सामाजिक असमानतेच्या आणि अन्यायाच्या बाबतसुद्धा हेच तत्त्व लागू होते ना? अल्पसंख्याकांच्या अधिकाररक्षणाची आणि शोषितांच्या आरक्षणाची गरज ही फर्स्ट-हॅन्ड त्यांनाच जास्त कळते. एकतर जातिसंस्थेमुळे झालेल्या अन्यायाची तीव्रताच शहरी सवर्णांना माहीत नसते, शोषणातील दु:खाचं, अन्यायाचं , स्वानुभव नसल्याने त्याला कसं हाताळायला पाहिजे हे पण माहीत नसतं. सवर्ण पुरोगाम्यांचे संशोधनात्मक ज्ञान लेखीच शेवटी. सरंजामी समाजावर संशोधनच होत नाही, होऊ दिलंपण जात नाही. जातीचे प्रिविलेजेस म्हणजे मेरीटमुळं आलेले हक्कच वाटत असतात सामान्य सवर्णांना. अन्यायापेक्षाही जास्त प्रक्षोभक भडकवणारे त्याचे सवर्णांनी केलेले समर्थन आहे. उद्विग्न वाटेल इतक्या बोथट संवेदनशीलता, जाणिवा आहेत. ब्राह्मणी वर्चस्ववादी शिक्षणव्यवस्था अजूनच भर घालते यात. ब्राह्मणद्वेषी राजकारण हा एक स्वतंत्र मुद्दा आहे. बऱ्याचदा गावगाड्यातील वर्चस्ववादी सरंजामी मराठा लोक ब्राह्मणांना सर्व दोष देत मोकळे होतात. ब्राह्मणवादी समाजव्यवस्था म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या ब्राह्मणांनी निर्माण केलेली व्यवस्था, जी मुख्यत: राबवली मराठ्यांनी. खरोखरच ब्राह्मण वर्णाच्या लोकांनी धार्मिक आडोशाने गर्ह्य व अन्यायकारक चालीरीती रुजवल्या. त्यांचा सांस्कृतिक, अर्थिक, राजकीय फायदा अनेक शतकं मराठा व ब्राह्मण समाजाला मिळाल्याने ते आजच्या प्रिविलेज्ड स्टेजला आहेत. सांप्रत उच्चजातीय समाजाला या प्रिविलेजेसची कल्पनाही नसते बऱ्याचदा ; आणि कोणताही सामाजिक विज्ञानाचा अभ्यास न करता वैयक्तिक अनुभवांवर उथळ जाणिवा असलेली मतं दिली जातात. हे मी स्वत: माझ्या घरी नातेवाईकांत अनुभवलंय. मी स्वत: ब्राह्मण, शहरी, उच्चशिक्षित, मध्यमवर्गीय आणि पुरुष असल्याने समलैंगिक असल्याचे उघड सांगता येते, कारण जात, वर्ग, लिंगाचे सगळे फायदे मला अगोदरच मिळाले आहेत. लैंगिकता व जातिव्यवस्था यांचे प्रश्न वेगवेगळे मांडणं हे उथळपणाचं लक्षण आहे. त्यांची अतिशय जटिल अशी ऐतिहासिक व राजकीय सांगड असते. मराठा व दलित समलैंगिक व्यक्तीचे प्रश्न वेगळे असतात व समाजव्यवस्था त्यांना माझ्याइतकी मुभा देत नाही. मराठ्यांनी स्वत:च निर्माण केलेली बेगडी अहंकारी पुरुषप्रधान जातिविषयक भूमिका कारणीभूत आहे, पण दलितांवर ही व्यवस्था जबरदस्तीने लादलेली असते, म्हणून स्वतः समाजव्यवस्थेचा अन्यायकारक भाग आहोत या जाणिवेची, आत्मपरीक्षण करण्याची, आपले प्रीविलेजेस मान्य करण्याची व शोषितांना जास्त समजून घेण्याची गरज आहे. समता नाही तर समानतेची आवश्यकता असते. मलाही राग येतो की, समलैंगिकता उदारपणे स्वीकारण्याचा वा अरेरावीने नाकारण्याचा स्ट्रेट लोकांना हक्कच काय? तसंच जातीचंही असतं. आधी हजारो वर्षं दलितांवर अन्याय करून आता उदारतेने समानता देण्याचा, नाकारण्याचा हक्कच काय सवर्णांना? आरक्षण ही जखमेवरची मलमपट्टी केवळ. समानता ही मूलभूत मानवी व सांविधानिक हक्कात येतेच. ती मुद्दाम द्यावी लागू नये. आंबेडकरवादी चळवळीतील व्यक्तींना समानतेचा मुद्दा नीट कळल्याने व शोषण-अन्याय भोगल्याने समलैंगिक व्यक्तींची घुसमट कळते, ते पाठिंबा देतात; पण त्यांचा तो अग्रक्रमाचा मुद्दा नाही होऊ शकत. आंबेडकरवादी विचारसरणीने भारतीय परिप्रेक्ष्यातून दलित समलैंगिक-हिजडा व्यक्तीचे प्रश्न मांडणं, हे पुढचं पाऊल होऊ शकेल. ते गरजेचं आहे कारण शहरी ब्राह्मण समलैंगिक व्यक्तीला दलित ग्रामीण समलैंगिक व्यक्तीचे प्रश्न कदाचित जास्त योग्य पद्धतीने मांडता येणार नाहीत. तसंच जी दलित स्ट्रेट व्यक्ती आंबेडकरवाद जाणत नाही, त्यांनीही दलित समलैंगिक व्यक्तीशी भेदभाव करू नये, हा मुद्दा साध्य होऊ शकेल. सामान्य दलित व्यक्ती समलिंगीविरोधी असू शकतेच. शहरी समलैंगिक ब्राह्मणही आंबेडकरवादाचा तिरस्कार व आरक्षणविरोध करते. ब्राह्मण म्हणून जातीचे फायदे उपभोगणे किंवा सहन करणे, दोन्ही अयोग्यच. ज्याचं जळतं त्यालाच कळतं शेवटी.
जात, धर्म, वर्ग, वर्ण, स्त्रिया यांच्या शोषणविरुद्ध होणारे लढे व समलैंगिक व्यक्तींचा लढा यात एक मूलभूत फरक आहे मात्र. ज्या समूहाचे शोषण होत आहे, त्या समूहाच्या व्यक्तींना ओळखून, खुलेपणाने एकत्र करणे, शोषणाची जाणीव करून देणे, अस्मिता जागवणे व लढा उभा करणे; हे समलैंगिक सोडून इतर सर्वांना तुलनेने जास्त शक्य व सुलभ आहे. दलित, मजूर, आदिवासी, कृष्णवर्णीय, स्त्रिया इत्यादी शोषित समूहांना स्वतःची सामाजिक व वैयक्तिक ओळख आहे, ती उघडपणे कबूल करता येण्यासारखी आहे, ती ओळख-अस्तित्व नैसर्गिक व स्वाभाविक मानली जाते, त्यांच्या तशा अस्तित्वाबद्दल त्यांना दोष दिला जात नाही. त्यांना त्यांच्या शोषणाची जाणीव करून देऊन त्यांचा स्वाभिमान व अस्मिता जागृत करणे सहज शक्य आहे, त्यांच्यासाठी झटणारे महापुरुष-स्त्रिया होऊन गेले/ आहेत, व त्यांच्या लढ्यांना समाजाची/कायद्याची मान्यता व सन्मान आहे, महत्त्व अग्रक्रमाने मिळते या लढ्यांना.. पण समलैंगिक समूहाला या सर्वच बाबतींत अजूनही भारतात समान वागणूक मिळत नाही. समलैंगिक व्यक्ती या सर्व जातींत, धर्मात, लिंगात, वंशात, वर्गात असतात. त्यांना लढ्यासाठी एकत्र करणे तर दूरच, पण ओळखणेही महाकठीण काम. त्यात लैंगिकता आणि कामवासना याबद्दल बोलणंच आपल्या संस्कृतीने निषिद्ध मानलं आहे, सेक्सकडेच बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असल्याने, समलैंगिकता हा विषय त्याज्यच होऊन जातो. हक्कांसाठी लढा वगैरे दूरच राहू देत, समलैंगिक व्यक्तींना आपल्या अस्तित्वाचीच घृणा आणि भीती वाटत असते. त्यांच्या समलैंगिक असल्याने तेच कुटुंबावर वगैरे अन्याय करत आहेत अशा समजुतीत असतात ही माणसं, आणि भयाण, निराश, आशाहीन, एकाकी आयुष्य जगतात लपत छपत. त्यांनी मदत मागायला येणं, स्वतःला स्वीकारणं, आपण अन्याय करत नसून आपल्यावर अन्याय होत आहे हे समजून घेणं, वैयक्तिक आयुष्यात कुटुंब व जातीतील लोकांना उघड होणं, चेष्टा-निंदा-अपमान-हिंसा पचवून उभं राहत जगण्याच्या स्पर्धेला तोंड देणं आणि मग आशेने जगण्याची मानसिक अवस्था उरलीच चुकून तर शोषणविरोधी लढा देणं, या स्थितीला पोचणं महाकठीण. आणि यातच जाती-वर्ग-लिंग यांच्या लढ्याची जाणीव येण्यासाठी प्रचंड काळ जातो. पुन्हा तो लढा 'सेक्स’च्या बाबीशी निगडीत म्हणून हेटाळणी होतेच; सामान्य माणसाकडून आणि कधीतरी चळवळीतील माणसाकडूनसुद्धा. पुन्हा सर्व जातींच्या व वर्गांच्या समलैंगिक व्यक्तींचे मुद्दे अजून गुंतागुंतीचे. आपापसातच भौतिक, सांस्कृतिक, राजकीय तफावत इतकी, की लढ्याला सामायिक स्वरूप येणे बिकट होऊन बसते. उच्चजातीय समलैंगिक व्यक्तींना इतर अनेक प्रीविलेजेस असूनही समलैंगिकतेच्या लढ्यात जाहीरपणे उतरण्याची हिंमत करता येतेच असे नाही, मग दलित-आदिवासी समलैंगिक व्यक्तीची तर अजूनच दुरवस्था असते. जातिवादविरोधी लढा त्या तुलनेत आता बराच पुढे गेला आहे. एकमेकांचे प्रश्न समजून घेत, जात व लैंगिकतेची अतिशय नाजूक-जटील गुंफण उलगडत दोन्ही लढे एकत्र पुढे नेणे आवश्यक आहे.
"आपण आपल्यापुरतं काय ते पाहायचं " असं म्हणता येण्यासाठीचे प्रचंड सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिक प्रिविलेजेस उच्चजातीय शहरी उच्चशिक्षित मध्यमवर्गीय पुरुष म्हणून आपल्यापाशी आहेत. मी गे असण्याला जे लोक उघड विरोध करतात, ते माझं कणभरही काही बिनसवू शकत नाहीत; कारण माझे प्रिविलेजेस. चुकीचं जिथं घडतंय, ते आधी घडण्यालाच रोखण्याचे प्रयत्नसुद्धा मला माझे प्रिविलेजेसच करू देतात. चुकीचं घडल्यावर तिथं योग्य करायला गेलो, तर तोवर गुंतागुंती अजून जटील झाल्या असतील. दलित गे मुलाला होणारे त्रास जर आपण लोकांना ( त्याच्या आईबापाला व इतर समाजाला) हवं तसं जगू दिलं व त्या मुलासोबत अन्याय करू दिला, तर आणखी वाढतील. तो गे दलित मुलगा जन्मण्याआधीच पालकांचं थोडंफार प्रबोधन झालं तर बरं. मला माहीत आहे की दलितांचे मूळ प्रश्न आर्थिक आहेत, पण सांस्कृतिक पातळीवर वरचा वर्ग मिळण्यासाठी ते उच्चवर्गीयांच्या प्रथांना स्वीकारतात. सगळेच दलित आंबेडकरवादी नसतात. प्रिविलेज्ड उच्चवर्गीयांना मुभा असते, जात-धर्म-लैंगिकता स्वीकारण्याची आणि नाकारण्याचीपण. इतरांना त्यांच्या भौतिक गरजांमुळे ती नसते. म्हणून प्रिविलेज्ड लोकांनीच हवं ते नाही, तर योग्य तेच सदासर्वदा करण्याची आवश्यकता आहे, जबाबदारी आहे. Personal is political. केवळ दाखवून दिल्याने वेगळेपणाचं अस्तित्व आहे, हे समाज मान्य करतो, पण लगेच त्याची प्रतवारी लावून सामाजिक उतरंडीत तळाचं स्थान देऊन राजकारण साधतो. सर्व प्रकारची शोषणं ( जातीय, वर्णिक, लैंगिक, वर्गीय, भाषिक, प्रांतीय इत्यादी) स्वतंत्रपणे वेगवेगळी कार्यरत नसतात कधीच. आपला लढा निवडला तरीही त्या लढ्याची इतर शोषणाविरुद्ध लढ्यांबरोबर असलेली राजकीय गुंतागुंत समजून घेतली नाही, तर लढा एकांगी बनतो व त्या लूपहोलचा फायदा व्यवस्था उठवते. लढ्यांना स्वतःविरुद्ध न घेता एकमेकांच्या विरुद्धच लढवते. सर्वप्रकारच्या लढ्यांची परस्परपूरक समानता व व्यवस्थाविरोधी समानता यांचे राजकीय महत्त्व, त्यातल्या जटील आंतरछेदक विवेचनाबद्दल बोलून-लिहूनच सामान्यांना समजावता येते; निदान संशोधकांना तरी. दर वेळी वेगळेपण असलेल्या गटांनी व्यवस्थेला स्पष्टीकरण देऊन स्वीकृत होण्याची केविलवाणी वाट बघण्याची लढ्याची जुनी पद्धत मोडून पारंपरिक समाजरचनेलाच सर्व शोषणाविरुद्ध लढ्यांनी एकत्र येऊन जाब विचारला पाहिजे. सामान्य माणूस यातील बारीक कंगोरे जाणत नसला तर ते लिखाणातून कोणीतरी जाणवून द्यावेत; तर कृतिशील सहभागाला गती व दिशा मिळेल.
मागच्या वर्षभरात वेगवेगळ्या लैंगिकता असलेल्या व वेगवेगळ्या सांस्कृतिक-आर्थिक पार्श्वभूमीतून आलेल्या q***r व्यक्तींना भेटलो. व लैंगिकतेचा अभ्यास केला. दोन्ही प्रकारच्या अनुभवांमुळे माझ्या लैंगिकतेबद्दलच्या पूर्वसंकल्पना आमूलाग्र बदलल्या आहेत. गे/LGBT असणं हेच मुळात पाश्चिमात्य देशांमधील सामाजिक रचित आहे. मी स्वत:ला पुरुष किंवा जेंडर्सच्या कोणत्याही वर्गवारीतील व्यक्ती म्हणून ओळख देऊ शकत नाही; तर मग त्यावर आधारित लैंगिकतेची चौकटबद्ध ओळख तरी कशी देणार? होमो किंवा हेटरो पुरुष असं स्वत:ला म्हणवल्यावर पुन्हा तसं असण्याचे आदर्श दांभिक सामाजिक निकष पाळावे लागतात. मी गे, शहरी, उच्चशिक्षित, उच्चवर्गीय व पुरुष अशी ओळख सांगणाऱ्यांच्या ग्रुपमध्ये असतानाही, माझं स्वैराचारी, अनेक जोडीदार असणे, counter-heretonormative, निरीश्वरवादी, डाव्या विचारसरणीचा असणं त्यांना मान्य झालं नाही. वेगवेगळ्या पातळ्यांवर गे पुरुषही सामाजिक भेदभाव करत आहेत. मला लक्षात आलं की मी केवळ q***r/ लैंगिकदृष्ट्या वेगळा किंवा लौकिकार्थाने विचित्र आहे, गे नाही. म्हणून ज्या व्यक्ती राजकीय व आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली नसतानाही केवळ आपल्या मानसिक बळावर, गाभ्यातील अंत:प्रेरणेच्या अनाकलनीय रेट्यामुळे व संशोधनात्मक अभ्यासामुळे समाजाचे लैंगिकतेबद्दलचे परफॉर्मन्सबेस्ड नियम तोडतात ; ते मला जवळचे वाटतात, भावनिक सोबत करतात. तसे लेखक, नट, गायक इत्यादीसुद्धा जे मला कधीच भेटणार नाहीत. आणि समाज त्यांची फरफट काढायला हावरटपणे धावतो, कारण ते साच्यात बसायला नकार देतात. जी स्ट्रेट म्हणवणारी व्यक्ती आंतरजातीय लैंगिक संबंध जुळवते, अनेक पार्टनर्स ठेवते, वेश्याव्यवसाय करते, किंकी सेक्स करते; तीसुद्धा q***r आहे. भारतीय परिप्रेक्ष्यात LGBT सदस्य म्हणवून घेण्याचं प्रिविलेज हे मोजक्याच उच्चवर्गीय व्यक्तींना आहे. लैंगिकतेची ही वर्गवारी व प्रतवारी पुन्हा एकप्रकारे नवीन शोषक व्यवस्थाच बनवते. ज्या व्यक्ती लैंगिकता व लिंगभावाच्या द्वैतामधून बायनरीतून स्वत:ला मुक्त करू शकतात, स्वत:ला माझ्यासारखं agender व pansexual म्हणू शकतात, त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात भौतिक व सांस्कृतिक संसाधने उपलब्ध आहेत.
आदिवासी हिजडा व्यक्तीचे सामाजिक संदर्भ मला माझ्या मर्यादित दृष्टिकोनातून नाही कळत. आदिवासींचं नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी तसंच शोषण होतंय, त्यांची पारंपरिक जीवनशैली तशी उद्ध्वस्त केली आहे भांडवलशाहीने.. याची कल्पना नसणारे आरक्षणाच्या नावानं ओरडतात आणि सवर्ण बोगस शिक्षणव्यवस्थेत मेरीटची अपेक्षा करतात आदिवासींकडून. मेरीट लिस्टमधे नसलेल्या गरीब ब्राह्मणाची अडचण डोनेशनला पैसा नाही व आरक्षण नाही ही असते. आरक्षणातून वा मेरीटमधून प्रवेश घेताना आदिवासीला ज्या अडचणी येतात त्या ब्राह्मणी व्यवस्थेने लादलेल्या असतात, संस्थापक कोणत्याही जातीचा असो. ब्राह्मणी व्यवस्था झिरपत दलितांपर्यंत जातेच. त्यात आदीवासीला खाण्याचे वांधे असतात, गरीब ब्राह्मण उपाशीपोटी नसतोच कधी. नंतरचा पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रम ब्रिटिश-ब्राह्मणी असतो कोठेही. आरक्षण ही अडचण गरीब बामणाला वाटली तरी जातीय प्रिविलेजेसमुळे फालतू संस्थेत प्रवेश मिळाला तरी शिक्षण घेणं सोप जातं. ब्राह्मणाला नकळतसुद्धा सामाजिक दर्जा व आदर मिळतो. अभ्यासक्रम आपलासा व शिकायला तुलनेने सोपा जातो. शिकताना होस्टेल, खाणं, वगैरे वर्गीय अडचणी कमी येतात. गरिब आदिवासीला मेरीटवर किंवा आरक्षणावर प्रवेश मिळूनही या अडचणी येतात. साधं प्राथमिक बालभारती पुस्तक ब्राह्मणी मराठीत आणि उच्चजातीय सामाजिक संदर्भात असतं. ते आदिवासी लेकरांना व पाड्याच्या आदिवासी शिक्षकांनाही संदर्भहीन असतं. ब्राह्मण हे वर्णव्यवस्थेत व जातिव्यवस्थेत अत्युच्च टोकाला असतात. राजकीय वर्चस्व मराठ्यांचेच. पण सांस्कृतिक व सामाजिक धाक हा बामणांचाच परंपरेत. वैदिक साहित्य असो वा ब्रिटिश शिक्षण, हक्क बामणांचाच त्यामुळेच ब्रिटिशआधारित भारतीय शिक्षणव्यवस्था रचलीही बामणांनीच. त्यात कॉंग्रेस बामणी व उच्च नेत्यांनी राष्ट्रउभारणी करताना भारतीय संस्कृती ही बामणी संस्कृतीच दाखवली. सर्व जातींचं समान व सम रिप्रेझेंटेशन अभ्यासात नाही. भाषाही प्रांतीय बामणीच प्रमाण मानली. शिक्षणात शिकवली जाणारी मूल्यं व तत्त्वं, संस्कार बामणीच. इतकंच कशाला, शाळेतील पहिली प्रार्थनाही बामणीच असायची. बऱ्याच ठिकाणी अजूनही असते. मराठ्यांचे इतर अनेक प्रमाद आहेतच, पण जास्त राजकीय व आर्थिक स्वरूपाचे. शिक्षणव्यवस्थेत सांस्कृतिक वर्चस्ववादी बामणी मानसिकता तळागाळातील लोकांपर्यंत झिरपली. साचा तोच आहे, माणसं बदलतात.
आता माझ्याभोवती विविध प्रकारच्या जातीय, भाषिक, लैंगिक, वर्गीय, प्रांतीय पार्श्वभूमीतून आलेल्या व्यक्तींचा गराडा आहे, आणि त्यातील काहींची कोणतीही लैंगिक ओळख नाही सांगता येत. पण केमिस्ट्री जुळली की त्यांच्या शरीराच्या अवयवरचनेचा मला काही फरक पडत नाही. सेक्ससुद्धा आपण फक्त लैंगिक अवयवांनी नाही करत, संपूर्ण शरीराशी करतो. प्रेम, आकर्षण, ओढ व्यक्तिमत्त्वावर बसते. तसं मला अनेक बंडखोर व्यक्तींचं आकर्षण वाटतं. त्या व्यक्तींची वैयक्तिक अभिव्यक्ती भावते, समाजाने आखून दिलेल्या लैंगिक परफॉर्मन्सची नाही. त्यांची प्रजननसंस्था, हार्मोन्स व सेक्स क्रोमोसोम्स कोणती आहेत त्याचीशी काही देणंघेणं नाही. ज्या व्यक्ती जे शोषण प्रत्यक्ष भोगतात, त्यांना त्या शोषणाच्या सूक्ष्म खाचाखोचा व कंगोरे अनुभवल्याने माहिती असतात, व त्यांचा कदाचित अभ्यासही झालेला असतो. म्हणून त्याबद्दलच ते अग्रक्रमाने विद्रोह करतात. इतरांनी त्याबद्दल संशोधन केले असले तरी त्याच्या सूक्ष्म जाणिवांच्या कक्षा मर्यादित रहातात. सवर्ण समलिंगी/स्त्री व दलित पुरुष यांचे संबंध परंपरेने कायम निषिद्ध मानलेल्याने एकमेकांचे शोषणबाबत मुद्देही दुरावलेले असतात व त्यांची सांगड बसायला खास प्रयत्न करावे लागतात. त्यावर शांत संयमाने, गैरसमज टाळून, खाजगी पातळीवर न येता, वैचारिक चर्चा सर्वांनीच करणं अपेक्षित आहे. विचारमंथन ही जिंकण्याची स्पर्धा नाही, तर केवळ विचारांचं आदानप्रदान करून, चिंतन-विश्लेषण मतपरिवर्तन करण्याची संधी आहे. लैंगिकता सोडून इतर गंभीर विषय असे सुटेसुटे बोलता येत नाहीतच. जात, वर्ग, लिंग इत्यादींच्या जाणिवा सतत एकमेकांना आंतरछेद करत असतात. सर्वच व्यक्तींना त्यातल्या सर्वच सामाजिक जाणिवा प्रगल्भपणे कळण्याचा/ स्वीकारण्याचा अट्टहास नको. प्रत्येकाच्या अभ्यासकक्षा मर्यादित असतात. त्यांचा आदर करत , वैयक्तिक अहंकार बाजूला ठेवून, वैचारिक ऊहापोह करुयात.
प्रत्येक शोषित घटकाने आपापले गार्‍हाणे-व्यथा सांगून, लढ्याची स्पष्टीकरणे गरज मांडत, सवर्णांना ती समजावत बसत, त्यांना ती आधी/जास्त पटण्यासाठी इतर शोषित घटकांशी भांडत बसण्याची जुनाट प्रक्रियाच टाकून द्यावी. सरळ सर्वांनी अन्यायकारक जातीवादी पुरुषसत्ताक समाज-संरचनेलाच कठड्यात उभं करून जाब विचारण्याची गरज आहे. शास्त्रीय मांडणी करणारेही internal informants होतात सवर्णांचे आणि तीच जुनी समाजरचना कशी शोषितांच्या हिताची आहे, हे त्यांनाच एकमेकांशी लढवून पटवतात. शोषितांनी जगलेले स्वानुभव त्यांना समाजरचेनेचे हिडीस दांभिक स्वरूप दाखवत असतातच. सवर्ण पुरुष शोषकांनीच जबाबदारी उचलून, विचारलेले जाब मान्य करून, मूळापासून समग्र अन्यायकारक संरचना बदलायला सुरुवात करावी. शोषितवर्गही थकतो ना सतत आयुष्यभर लढत राहून
---अनिकेत गुळवणी

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Muktashabd Masik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category