24/04/2026
महाराष्ट्रात संजय गायकवाड सारखे मुजोर-अशिक्षित-गुंड आमदार होतायत, ह्यासारखी महाराष्ट्राच्या राजकारणाला लाजवणारी दुसरी कोणती गोष्ट नाही. काल ३७ वर्षांपूर्वी कॉर्मेड गोविंद पानसरे यांनी लिहीलेल्या ह्या पुस्तकाच्या शीर्षकावरुन कोल्हापूरचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना ह्या अडाणी निगरगट्ट आमदाराने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
पुस्तकाचं पान चाळलं असतं, तर कदाचित थोडी सद्बुध्दी संजय गायकवाडांना आली असती. पण १ ली तून शाळेतून हाकलून दिलेल्या या आमदाराला शरम तरी कसली असणार...प्रशांत आंबी यांचे आणि माझे कोणतेही संबंध नाहीत. पण एक लेखक आणि पुस्तक प्रेमी वाचक म्हणून मी ह्या प्रवृत्तीचा निषेध करायलाच हवा.
राजकीय वादांमध्ये किंवा वैचारिक वादामध्ये आपण एक मर्यादा ठेऊन बोलायला हवं. शिवाजी कोण होता? हे फक्त शीर्षक नसून शिवाजी महाराजांना थोडक्यात पण सखोल जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. हे पुस्तक आजही माझ्या पुस्तकांच्या साठ्यात आहे. आणि मला आनंद आहे...की हे पुस्तक मी वेळ मिळेल तसे काढून वाचतो आणि पुन्हा पुन्हा शिवाजी ह्या राजाच्या, मुलाच्या, मित्राच्या, बापाच्या, नवऱ्याच्या, सवंगड्याच्या, क्षत्रियाच्या आणि विशेषतः कर्तृत्त्ववान पुरुषाच्या प्रेमात पडतो.
मराठीत आपण ज्याच्यावर आतोनात प्रेम करतो, देवत्त्व देतो, त्याला आपण ऐकेरी भाषेतच बोलवतो. आजही प्रत्येक मराठी माणूस जय भवानी, जय शिवाजी म्हणतो. तिथे छत्रपती शिवाजी महाराज म्हणत नाही....ही घोषणा शिवसेनेच्याही अनेक कार्यक्रमांमध्ये दिली जाते, तेव्हा या निर्बुद्ध आमदाराचा प्रतिकार जातो कुठे?
कॉर्मेड गोविंद पानसरेंची हत्या झाली, पण त्यांचे विचार अशा पुस्तकांच्या रुपाने आजही अशा लोकांची झोप उडवतात आणि प्रसिद्धीसाठीचं साधन बनतात. पुस्तक हे वाचण्यासाठी इतिहासाची मिमांसा करण्यासाठी आहे. ज्या आमदारांना आपण लोकप्रतिनिधी म्हणतो, त्यांनी मिमांसा न करता लोकांच्या जीवावर उठणं महाराष्ट्राला बिलकूल शोभणारं नाही...पण मतदारांना शिव्या घालणाऱ्या, कोरोनाचा विषाणू फडणवीसांच्या तोंडात कोंबू म्हणत त्यांच्याच सोबत सत्तेत बसणाऱ्या, आमदार निवासात वेटरला मारहाण करणाऱ्या संजय गायकवांडांवर हे सरकार कारवाई तरी करेल काय?
शेवटी खेदाने म्हणावे लागेल...कायदे हे फक्त सामान्यांसाठीच आहेत. अशा आमदारांवर कारवाई होणार नाही. आणि आपण कितीही प्रतिकार केला, तरी आपली गिणतीच केली जाईल...After all democracy is beautiful untill its 'not' implimented!!! Keep going with S**t Politics Sanjay Gaikwad - संजय गायकवाड
| सुशांत वाघमारे