
29/07/2025
बारमध्ये सरकारी फाईल्सवर स्वाक्षरी, पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश, म्हणाले ' ही बाब गांभीर्याने घेतली"
नागपूर : बारमध्ये शासनाच्या फाईल्स घेऊन बसलेल्या एका व्यक्तीचा व्हीडीओ समाज माध्यमावर प्रसारित झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. दरम्यान महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या फाईल्स नेमक्या कोणत्या विभागाच्या होत्या व ते कर्मचारी कोण याबाबत सोमवारी दिवसभर प्रशासकीय वर्तुळात चर्चा होती. शहरातील मनीषनगर भागातील एका बारमध्ये रविवारी सुटीच्या दिवशी तीन व्यक्ती महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फाईल्सचा गठ्ठा घेऊन बसले होते. त्यापैकी एक व्यक्ती त्या फाईलवर स्वाक्षरी करीत होता. याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली. दरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेची गंभीरपणे दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. वर्धा येथे भाजपच्या बैठकीसाठी बावनकुळे गेले असता तेथे पत्रकारांनी नागपूरच्या घटनेकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले “ विभागीय आयुक्तांशी मी याबाबत बोललेलो आहे, सायबर शाखेसोबतही सोबतही चर्चा केली आहे आणि त्याना यासंदर्भातील अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. येत्या तीन दिवसात या प्रकरणात कारवाई झाल्याचे दिसेल. पालकमंत्री म्हणून मी या घटनेचे पूर्ण विश्लेषण करणार आहे कोणत्या विभागाची फाईल हे याची चौकशी सुरू झालेले आहे". दरम्यान बारमध्ये बसलेले ते कर्मचारी कोण होते. कोणत्या विभागाचे होते. त्या फाईल कशाच्या होत्या. रविवार असताना कार्यालयाबाहेर फाईल्स कशा गेल्या असे एक नव्हे तर अनेक प्रश्न या निमित्ताने चर्चेला आले आहे. नागपूर हा खुद्द मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. याच जिल्ह्यात या घटनेमुळे प्रशासनाचे लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. विशेष म्हणजे रविवारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरातच होते. ते शहरात असताना सरकारी फाईल्स कार्यालयाबाहेर नेणे ही गंभीर बाब आहे. कार्यालयनीन गोपनीयतेचा हा भंग असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी आहे.