02/08/2026
देशभरात 'मीही स्वदेशी समर्थक' राष्ट्रव्यापी अभियानाचा शुभारंभ
नवी दिल्ली, दि. १ ऑगस्ट : स्वदेशी जागरण मंचातर्फे देशभरात १ ऑगस्टपासून 'मीही स्वदेशी समर्थक' या राष्ट्रव्यापी जनजागरण अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. मंचाचे अखिल भारतीय संयोजक आर. सुंदरम यांनी मदुराई येथून या अभियानाची सुरुवात केली.
अभियानाचा शुभारंभ करताना त्यांनी सांगितले की, भारताची खरी प्रगती स्वदेशीच्या मार्गानेच शक्य आहे. प्रत्येक नागरिकाने स्वदेशीचा समर्थक बनून देशी उत्पादनांचा वापर आणि प्रचार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. परकीय वस्तू किंवा विचारांच्या आधारावर देश सर्वांगीण प्रगती करू शकत नाही. भारताला समृद्ध आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वदेशीचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मंचाचे अखिल भारतीय सहसंयोजक डॉ. अश्वनी महाजन यांनी दिल्लीतून, डॉ. धनपत राम अग्रवाल यांनी कोलकाता येथून, डॉ. राजीव कुमार यांनी मुरादाबाद येथून, डॉ. अजय पतकी यांनी बिकानेर येथून तसेच अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. धर्मेंद्र दुबे यांनी गुवाहाटी येथून अभियानाची सुरुवात केली. डॉ. अश्वनी महाजन यांनी सांगितले की, हे अभियान पूर्णपणे डिजिटल माध्यमातून राबविण्यात येणार आहे. डिजिटल नोंदणी, सोशल मीडिया, क्यूआर कोड आणि ऑनलाइन जनसंपर्काच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना या अभियानाशी जोडले जाईल. अभियानात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला डिजिटल स्वरूपात 'स्वदेशी समर्थक' प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत नागरिकांनी स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणे, स्वदेशी भाषा, वेशभूषा, जीवनशैली आणि संयुक्त कुटुंब व्यवस्थेला प्रोत्साहन देणे, युवकांना स्वावलंबन, उद्योजकता, नवकल्पना आणि स्वरोजगारासाठी प्रेरित करणे, राष्ट्रहितासाठी कार्य करणाऱ्या शक्तींना सहकार्य करणे तसेच देशाची एकता, अखंडता आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प करायचा आहे.
डॉ. धर्मेंद्र दुबे यांनी सांगितले की, देशातील सर्व राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबवून सुमारे दोन कोटी नागरिकांना या ऑनलाइन संकल्प अभियानाशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.