
24/07/2025
आज वाळवा तालुक्यातील तरुण, होतकरू हर्षल पाटील या अभियंता कंत्राटदाराने जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचे शासनाकडून पैसे मिळत नसल्याने, सरकारच्या त्रासाला व भ्रष्टाचाराला कंटाळून आत्महत्या केली. ही अत्यंत दुःखद घटना आहे. हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
सरकारच्या रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं कंत्राटदारीकडे वळली. स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करु पाहणाऱ्या युवकांच्या स्वप्नावर सरकारने पाणी फेरले. राज्य शासनाने निवडणुका जिंकण्यासाठी तिजोरीत पैसे नसतांना विविध कंत्राटांचे वाटप केले. आज थकलेली बिले घेण्यासाठी राज्यातील कंत्राटदार सरकारच्या दारात याचना व आंदोलने करत आहेत. ही एका खात्याची परिस्थिती नसून, सर्वच खात्यांची परिस्थिती आहे.
एका कंत्राटदारावर केवळ एक घर चालत नसून त्याच्यावर अनेक कामगारांची कुटुंबे सुद्धा अवलंबून असतात, याचे सरकारला कसलेही भान राहिलेले नाही.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रमाणे कंत्राटदारांच्या आत्महत्यांची मालिका सुरु होईल अशी मला भीती वाटते. या परिस्थितीवर सरकारने तात्काळ तोडगा काढावा.