30/08/2025
- चौमुखी गणेश, जवळगाव, यवतमाळ
भारतीय संस्कृतीत गणरायाचे सर्वोच्च स्थान आहे. आपणास एकमुखी गणेशाचे लोभस रूप ज्ञात आहे. परंतु नेर तालुक्यातील ऐतिहासिक दुर्लक्षित जवळगाव येथे प्राचीन व दुर्मिळ गणेशाची चतुर्मुखी पुरातन मूर्ती आढळली आहे. विदर्भात अशा तीनच प्रतिमा असल्याने याला प्राचीन काळात विशेष महत्त्व असावे. म्हणून याबाबत पुरातत्त्व विभागाकडून संशोधनाची गरज आहे.
नेर तालुक्यात प्राचीन गणेशाचे स्थान असूनही ते उजेडात आलेच नाही. तालुक्याला मोठा सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा आहे. काही गोष्टी काळाच्या ओघात लुप्त होत असून, त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. जवळगाव येथे आढळलेली प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण असून, ती यासाठी वेगळी आहे की, एकाच पाषाणात चार गणपती प्रतिमा अंकित केलेल्या आहेत. अशा प्रतिमेला प्रतिमाशास्त्रात 'सर्वतोभद्र' असे म्हणत असून, जवळगावची प्रतिमा याच प्रकाराची आहे. ती प्रतिमा उत्तमस्थितीत असून, पूर्वी उघड्यावर असलेली ही प्रतिमा ग्रामस्थांनी लहान मंदिरात स्थानापन्न केली आहे. काळ्या पाषाणात उत्कीर्ण केलेली ही प्रतिमा अंदाजे ७०० वर्षे प्राचीन आहे. चारही प्रतिमा चतुर्हस्त असून, अर्धपर्यकासनात बसलेली आहेत. हातात हस्तिदंत, परशु, अंकुश, मोदक धारण केलेले दाखविले आहे. या प्रतिमेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे चारही प्रतिमांच्या मस्तकावर सुंदर नक्षीकाम केलेला भव्य व सुंदर मुकुट आहे. या मुकुटामुळे दुरून बघितल्यास ही गणेशाची सर्वतोभद्र प्रतिमा छोट्या मंदिराची प्रतिकृती वाटते.
गणपतीच्या इतर अलंकारात अतिशय ठळक दिसणारा अलंकार म्हणजे 'सर्प उदरबंध'. हाताला केयूर व बाजूबंध आहेत, अशी ही सर्वतोभद्र प्रकारातली प्रतिमा आहे. अशा प्रतिमा जेथे चार वाटा मिळतात, अशा ठिकाणी स्थापन केल्या जात असाव्यात, असे तज्ज्ञ सांगतात. म्हणजे वाटसरूंना चार दिशा दाखविण्यासाठीही अशा प्रतिमांचा प्राचीन काळात शुद्ध व्यावहारिक उपयोग होत असावा. याला पूरक असा संदर्भ ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत आढळतो. ज्ञानेश्वरीत 'चतुष्पथीचे गणपती' म्हणून जो उल्लेख येतो, तो अशा प्रतिमांसंदर्भात असावा, असे सांगतात.
या मंदिराच्या बाजूला हेमाडपंथी शिवालय आहे. बाजूलाच पूर्वी श्री विष्णूचेही मंदिर होते. सोबतच गणपतीचेही मंदिर होते. परंतु, आता विष्णू व गणपतीच्या मंदिराचे केवळ अवशेष आहेत. परंतु, श्रीविष्णू व गणपतीच्या मूर्ती सुस्थितीत आहेत. गावाच्या पश्चिमेस आणखी एक हेमाडपंथी मंदिर असून, त्यात श्रीविष्णूची व गरुडाची मूर्ती स्थानांतरित केली आहे. दोन्ही हेमाडपंथी मंदिर गावचा ऐतिहासिक वारसा जपून आहे. गावात एक गढी असून, त्याचाही मोठा इतिहास आहे. गावात एक भवानी मातेचे अर्धपीठ असून, जेठसिंगच्या वंशजांनी ते तुळजापूरवरून आणल्याचे गावातील ज्येष्ठ नागरिक महादेव गुघाणे व ग्रामपंचायत सदस्य बाळू घोडे यांनी सांगितले. नेरमधील मानाच्या गणपती मठासोबतच आता या चौमुखी गणेशाची प्रतिमा मिळाल्याने याचाही विकास व्हावा, अशी अपेक्षा भाविक लोकप्रतिनिधींकडून व्यक्त करीत आहेत.