05/12/2025
*बाबासाहेब म्हणजे काळ आणि युगाच्या पुढे पाहणारा महामानव*
जगाच्या इतिहासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे एकमेव महापुरुष आहेत की, ज्यांनी आपल्या एकाच हयातीमध्ये एक ‘राज्यघटना’ जाळली. आणि, त्याच हयातीमध्ये दुसरी राज्यघटना दिली.” ‘मनुस्मृती’ नावाची एक घटना (दुर्घटना) बाबासाहेबांनी जाळली आणि ‘भारतीय संविधान’ नावाची राज्यघटना देशाला दिली. मानवतावादी राज्यघटना बाबासाहेबांनी दिल्यामुळेच आधुनिक भारत घडू शकला.
बाबासाहेबांनी अवघ्या ६५ वर्षाच्या एका जन्मात हजारों वर्षांचा इतिहास आरपार बदलून टाकला. बाबासाहेब तूम्ही रचलेला इतिहास सांगायलाही आणि ऐकायलाही आमचं आयुष्य कमी पडायला लागलं. बाबासाहेब हे का करु शकले तर ते नामदेव ढसाळांच्या शब्दात सांगता येईल.
"हजारो वर्ष तुम्ही शस्त्र पारतली,
परंतु इथला कोपरा सुद्धा हलला नाही,
बाबासाहेब, तुम्ही फक्त पेन उचललात
आणि अवघा इतिहास बदलत गेला."
आज अनेक विद्यार्थ्यांना अनुकुल परिस्थिती असताना शिक्षण सोडतांना दिसतात. अपयश आल्यामुळे आत्महत्या करतात. परंतु प्रतिकूल परिस्थिती असतांना प्रसंगी वर्गाच्या बाहेर राहुन, उपाशी राहून बाबसाहेब आंबेडकर शिकत राहिले आणि त्यामुळेच ते जागतिक किर्तीचे महामानव ठरलेत. म्हणून शिक्षण घेतांना - संघर्ष करतांना आजच्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श - प्रेरणा म्हणून डॉ. बाबसाहेब आंबेडकर असायला हवेत. म्हणजे कोणताही विद्यार्थी आत्महत्या करणार नाही, अर्ध्यावर शिक्षण सोडणार नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे काळाच्या पुढे पाहणारे आणि अनेक युगांच्या पुढचा विचार सांगणारे व्यक्ती होते. त्यांनी सांगितलेली मानव कल्याणाची प्रत्येक गोष्ट आपणा सर्वांनाच स्वीकारावी लागत आहे. त्यामुळेच ते फक्त भारताचेच नाही तर संपूर्ण जगाच्या मानवमुक्तीच्या लढ्याचे दिशा देणारे महामानव ठरलेत. अशा महामानवला महापरीनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन...!!!
===== अनिल भुसारी =====
तुमसर, जि. भंडारा