08/05/2024
पाणीटंचाई संदर्भात लोक चळवळीकडून जनहित याचिका
उद्या स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार
नांदेड- शहराच्या उत्तर भागाला मागील आठ दिवसापासून पाणीपुरवठा होत नाही. ही कृत्रिम पाणीटंचाई केवळ महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप केला जात असून या संदर्भात लोक चळवळ या सामाजिक संघटनेच्या वतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे याला पुष्टी म्हणून उद्या गुरूवार सायंकाळी पाच वाजल्यापासून महात्मा फुले नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.
कोटीतीर्थ येथील पंपगृहात नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोटीतीर्थ येथील पंपगगृहात अचानक पाईपलाईन फुटल्यामुळे व विद्युत मोटारी खराब झाल्यामुळे मागील आठ दिवसापासून नांदेडच्या उत्तर भागाला पाणीपुरवठा बंद आहे. दुरुस्तीच्या नावाखाली वेळोवेळी खर्च दाखवणाऱ्या महापालिका प्रशासनाने येथील पंपगृहाकडे दुर्लक्ष केले,त्यामुळेच अचानक नांदेडकरांवर जलसंकट ओढवले आहे. 365 दिवस पाणी देणार म्हणून पाणीपट्टी वसूल करणारी महापालिका केवळ शंभर दिवस पाणीपुरवठा करते. नांदेडकर नागरिक हा अन्याय देखील सहन करतात. यावर कोटी म्हणून महापालिकेने कृत्रिम पाणी टंचाई नांदेडकरांवर लादली आहे.याचा जाब विचारण्यासाठी 'लोक चळवळ' या सामाजिक संघटनेकडून लवकरच जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यापूर्वी जनमानसात जागृती करण्यासाठी आज गुरूवारी सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत शहराच्या आयटीआय भागातील महात्मा फुले पुतळ्यासमोर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. या संदर्भात बुधवारी हॉटेल विसावा पॅलेस येथे बैठक झाली. या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन या अभियानाला पाठिंबा द्यावा असे आवाहन लोक चळवळीच्या वतीने दिलीप शिंदे, बालाजी पवार, दिनेश कवडे, नरेश दंडवते, गिरीश नारखेडे, बिरबल यादव, महेंद्र देमगुंडे, शिवानंद सुरकुटवार, रमेश देवडे आणि मनोज शिंदे, शाम कांबळे यांनी केले आहे.