17/02/2021
सर्दी पडसा आलेल्या लोकांनो,
विनाकारण बाहेर पडू नका.
विभागीय आयुक्तांनी गुन्हे दाखल करण्याच्या दिल्या सूचना.
औरंगाबादः कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर अपेक्षित आहे, हे लक्षात ठेवा. सर्दी, तापाचे रूग्ण खासगी डॉक्टरांकडे गेले तर ते त्यांना कोरोना चाचणी करायला सांगत नाही. कुठलाही फ्लूसारखी लक्षणे असतील तर त्याला घरी पाठवू नका, त्याची चाचणी झालीच पाहिजे, अशा सूचना सर्व डॉक्टरांना लिखित स्वरुपात द्या. साधारण फ्लूची लक्षणे असतील तरी तो रूग्ण आयसोलेट झालाच पाहिजे. सर्दी-पडसे असलेले लोक कोणत्याही प्रोटेक्शनशिवाय फिरले तर त्यांच्यावर महामारी नियंत्रण कायद्यान्वये गुन्हे दाखल करा, अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
कोरोनाचा संसर्ग पुन्हा नव्याने फैलावण्याच्या धोका लक्षात घेता नियमावली पाळली नाही तर पुन्हा एकदा कडक स्वरूपाचा लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांच्या व्हिडीओ कॉन्फन्सिंगमध्ये दिल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा गतीमान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा औरंगाबाद दौऱ्यात दिला होता. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन चांगलीच कानउघाडणी केली. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
विनामास्क फिरणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणावर दंड आकारण्यास सुरूवात करा. या दंडाची ५० टक्के रक्कम पोलिसांकडे वर्ग करा आणि ५० टक्के रक्कम स्थानिक स्वराज संस्थांकडे ठेवा. संयुक्त पत्रकार परिषद घेऊन लोकांना इशारा द्या. ही परिस्थिती राहिली तर अत्यंत कडक स्वरुपाचा लॉकडाऊन लावावा लागेल, हे लोकांना सांगा. लोकांना स्वतःहोऊन बाहेर यायला सांगा. प्रारंभिक लक्षणे असतील तर होम आयसोलेशनचा विचार करू. अन्यथा अनिवार्यपणे संस्थात्मक विलगीकरण केले जाईल. संस्थात्मक विलगीकरणातच उपचार होतील, हे लक्षात घ्या, असेही केंद्रेकर या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणतात.
काही कोविड केअर सेंटर बंद झाले असतील तर ते तयार करा. आढावा घ्या. त्याचे प्लानिंग तयार करा. व्हेंटिलेटर सुरू आहेत की नाहीत, याच्याकडे लक्ष द्या. परभणीचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अत्यंत सुमार आहे. परभणीचा काय प्रॉब्लेम आहे हेच कळत नाही. परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दहा वेळा ही गोष्ट सांगून झाली आहे पण ही गोष्ट आहे तिथेच आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा. कोणत्याही जिल्ह्यातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग २० च्या खाली आले नाही पाहिजे. हिंगोली आणि बीडचे टेस्टिंग अत्यंत कमी आहे. टेस्टिंग नसेल तर हे चालणार नाही. टेस्टिंग झालेच पाहिजे. लातूर, बीडची परिस्थिती चिंता करण्यासारखी आहे. नांदेडही आता तसेच होत चालले आहे. परभणीच्या सिव्हिलचे प्रशासन आणि इतर टेस्टिंग फिस्टिंग फार बोगस आहे. त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावे. पुन्हा यंत्रणा गतीमान करा, असेही केंद्रेकर म्हणाले.
दुकानदारांच्या पुन्हा चाचण्याः भाजी मंडई, दुकानदार यांच्या पुन्हा चाचण्या सुरू करा. आधी आपण रुग्ण सापडला तर तो एरिया सील करायचो. आता किमान मायक्रो सिलिंग तरी सुरू करा. किमान बिल्डिंग सील करा. त्यांच्या घरच्या लोकांना तपासा आणि हे रुग्ण बोंबलत बाहेर फिरणार नाहीत, याची दक्षता घ्या, अशा सूचनाही केंद्रेकरांनी दिल्या आहेत.
झोपा काढू नकाः मोठमोठी लग्ने होत आहेत आणि सगळे झोपा काढत आहेत, काहीच कारवाई होत नाही, हे यापुढे चालणार नाही. सर्व मंगल कार्यालयांवर धाडी टाका, त्यांना नोटीस द्या, मंजुरी दिलेल्या लोकांपेक्षा तेथे जास्त लोक असतील तर त्यांच्यावर कारवाई करा, दंड आकारा आणि पोलिस केसेस दाखल करण्याचा इशारा द्या, अशा सूचना केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
हिंगोली, परभणीमध्ये मोठमोठी लग्ने होत आहेत. औरंगाबादचीही तीच परिस्थिती आहे. पण काहीच कारवाई होत नाही. सगळे झोपा काढत आहेत. सर्व मंगल कार्यालयांवर धाडी टाका, मंजुरी दिलेल्या लोकांपेक्षा तेथे जास्त लोक आणि विनामास्क लोक आढळले तर त्यांना नोटीस द्या, दंड आकारा पोलिस केसेस दाखल करण्याचा इशारा द्या, दुसऱ्यांदा जास्त लोक आढळले तर मंगल कार्यालय १५ दिवसांसाठी सील करा, अशा सूचनाही केंद्रेकरांनी दिल्या आहेत.
कोचिंग क्लासेसनाही भेटी द्या. तेथे सॅनिटायजेशनची व्यवस्था आहे की नाही ते पहा, विद्यार्थी विनामास्क आहेत का ते पहा, दुसऱ्यांदा तशीच परिस्थिती आढळली तर कोचिंग क्लासेस सील करा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.