04/05/2022
सुवर्णा प्रकाश क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला स्वर पालवी सन्मान दश कलांचा हा दिमाखदार कलाविष्कार परशुराम सायखेडकर नाट्यगृहात संपन्न झाला.
नाशिक : प्रशांत जुन्नरे यांच्या बाबाज थिएटर्स आणि सुवर्णा प्रकाश क्षीरसागर यांच्या स्वरांजली संगीत संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने ' स्वर पालवी सन्मान दश कलांचा ' हा कलाविष्कार आयोजित करण्यात आला होता. या अभिनव संकल्पनेद्वारे एकाच मंचावर दहा कला आणि 47 महिला कलाकारांच्या संचाने बहारदार कलाकृती सादर करत कलाविष्कार उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विश्वास ठाकूर, कवी प्रकाश होळकर, डॉ. अविराज तायडे, केशव अण्णा पाटील, जे. पी जाधव, शामराव केदार, नितीन सुगंधी, दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आयोजकांच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात निःस्वार्थ सेवा देणाऱ्या डॉ. रंजना कुलकर्णी, गायिका हेमा नातू तसेच संगीत क्षेत्रातील दसककर भगिनींचा विशेष गौरव करण्यात आला.
मीना निकम यांच्या भाव मधुर स्वरातून कार्यक्रमाचा प्रारंभ होत, सत्यम शिवम सुंदरम या गीतावर सुमुखी अथणी यांच्या शिष्यांनी आपला कथ्थक नृत्याविष्कार सादर केला. रसिका नातू -देसाई यांच्या तरुण आहे रात्र अजुनी... या गीताने रसिकांची दाद मिळवली. भार्गवी कुलकर्णीच्या आर्त स्वरातून ' पिया तोसे नैना लागे ' ने आणि त्याच बरोबर सोनाली करंदीकरांच्या भरतनाट्यम करणाऱ्या शिष्यांनी रसिकांच्या मनावर भुरळ पडली. चिन्मयी जोशी वैद्य यांच्या व्हायोलिन वादनातून ' गोरी गोरी पान ' या बाल गीताने बच्चे कंपनीची वाह वा मिळवली, सुवर्णा क्षीरसागर यांच्या एक प्यार का नगमा.. या गीतावरील व्हायोलिन वादनाने प्रेक्षागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमला, तसेच सुनिता देशपांडे आणि ज्योती डोखळे यांच्या सतारी वरील 'रस्मे उल्फत..' ने कार्यक्रमाची रंगत वाढवली. सानिका जोशी हिच्या सुमधुर बासरीच्या स्वरातून ' का रे दुरावा, का रे अबोला..' ने कार्यक्रमात बहार आणली. दीप्ती जोशी लिखित कॅटवॉक कथा, पल्लवी कुलकर्णी यांच्या वाचिक अभिनयाचे दर्शन घडवणाऱ्या अभिवाचनाने रसिकांना भावुक करून गेले. भाग्यश्री गुजर यांच्या काव्यवाचनाने रसिकांची दाद मिळवली, दैवी देणगी लाभलेल्या कृपा परदेशीच्या सिंथेसायझर वादनाने रसिकांची मने जिंकली. प्राजक्ता प्रभाकर आणि ईश्वरी कोरान्ने यांच्या संपन्न अभिनयाने सभागृह भारावून गेले. रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारी मोहिनी भुसेच्या संबळ वादनाने रसिकांचा वन्स मोअर मिळवला. ' बहु असोत सुंदर..' या महाराष्ट्र गीतावरील दिपाली सुरळकर आणि त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या भरतनाट्यममधून प्रेक्षागृह दुमदुमून गेला. यावेळी रसिका नातू - देसाई आणि समूहाने ॲकॅपेला सारख्या आगळ्यावेगळ्या संगीत प्रकाराचा वापर करत हार्मनीद्वारे सादर केलेल्या ' प्यार हुवा, इकरार हूवा है..' ने प्रेक्षकांची मने जिंकली.
या सर्व कला सादर होत असताना रंगमंचावरील एका बाजूला म्युरल कलाकार शुभांगी बैरागी आणि दुसऱ्या बाजूला चित्रकार समृद्धी चिखलीकर यांच्या कलाविष्काराने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. प्रेक्षागृहा बाहेरील पूजा बेलकर यांनी रेखाटल्यालेल्या रांगोळीने प्रेक्षकांच्या मनात मोहिनी घातली.
संपूर्ण सादरीकरणाला तितकीच समर्थ साथ रागेश्री धुमाळ (सिंथेसायझर), पूजा शुक्ल- पाठक (गिटार), प्रिया वझे (ऑक्टोपॅड), राधिका रत्नपारखी गायधनी ( तबला), वैष्णवी भडकमकर (तबला), गौरी सारंग (साईड रिदम) यांनी केली.
-- अश्विनी भालेराव (MA JMC Part 1)