23/11/2025
*आ. देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून नवीन रामसेतू पूल मंजूर*
*बालाजी कोट ते गणेशवाडी जोडणार ‘राम झुला’ पूल*
नाशिक |
आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि नाशिकच्या पर्यटन ओळखीला नवे आयाम देण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून गोदावरी नदीवर ‘राम झुला’ हा नवीन पादचारी पूल उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना महापालिकेकडून तयार करण्यात आली आहे. जुने नाशिकमधील बालाजी कोट ते गणेशवाडी भाजीबाजार यांना जोडणारा हा पूल नाशिकची नवी ओळख बनेल.
सध्या गोदावरी काठी अस्तित्वात असलेला रामसेतू पूल हा पूरपरिस्थिती पाण्याखाली जातो. यामुळं या पुलाला तडे गेले आहेत.गोदावरी नदीतील अचानक वाढणारी पातळी, धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि पूरस्थितीमुळे घाट परिसर व सध्याचे पादचारी पूल अनेकदा वाहतुकीला बंद ठेवावे लागतात. यामुळे दैनंदिन धार्मिक विधी, बाजारपेठेशी संपर्क, तसेच आपत्कालीन सेवांची तातडीची उपलब्धता बाधित होते.
सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नवीन पूल बांधण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली होती. मात्र हा पूल करताना नाशिकचे धार्मिक महत्व यातून उमटावे अशी मागणी त्यांनी केली होती.
त्यानुसार या पुलासाठी सुमारे २५ कोटी खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. प्रकल्पामुळे सुरक्षित, अखंड आणि सर्वांसाठी सुलभ असा पादचारी मार्ग उपलब्ध होणार आहे.
नवीन ‘राम झुला’ पूल ब्लू फ्लड लेव्हलपेक्षा अधिक उंचावर बांधण्यात येणार असल्याने तो वर्षभर वापरण्यायोग्य राहील. महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, भाविक आणि पर्यटक यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल. बालाजी मंदिर, रामकुंड, काळाराम मंदिर, मेन रोड, सराफ बाजार, तपोवन आणि गणेशवाडी बाजार या प्रमुख परिसरांतील वाहतूक-यामुळं सुलभ होणार आहे.
याशिवाय, अनेक वर्षे विनावापर पडून असलेल्या गणेशवाडी भाजीबाजार इमारतीचा वापर सुरू होईल.