
16/07/2025
#जगावेगळी
#कथाविश्व
_लेखिका- प्रणिता खंडकर._
अनिताच्या बाळाचं आज बारसं होतं. घरात सगळी पाहुणेमंडळी जमली होती. हाॅल आणि पाळणा छान सजवला होता. हिरवी कुंची घातलेलं बाळ अनिताच्या मांडीत शांत झोपलं होतं. सगळी तयारी नीट झालीय ना, याकडे आशाताई जातीनं लक्ष देत होत्या.
बाळाला पाळण्यात ठेवलं, तसं हळूच डोळे किलकिले करून ते हसलं आणि परत झोपी गेलं. 'कुणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या', असा गोपा करून झाला. अनिताची आई आणि काकू यांनी खणात गुंडाळलेल्या वरवंट्याला पाळण्याच्या वरून आणि खालून एकमेकींच्या हातात दिलं-घेतलं आणि त्या अनिताला म्हणाल्या, "चला, आता बाळाचं नाव सांगा बरं त्याच्या कानात!"
अनितानं सांगितलं, "हा मान माझ्या सासूबाईंचा" आणि तिनं आशाताईंचा हात धरून त्यांना पाळण्याजवळ आणलं. आईच्या आणि काकूच्या चेहऱ्यावरची नापसंती तिच्या नजरेतून सुटली नाही, पण अजितच्या नजरेतलं कौतुक आणि अभिमान तिला सुखावून गेला.
आशाताईंनी बाळाच्या कानात नाव सांगितलं... 'अर्णव' आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आशाताईंनी अनिताला मिठी मारली. त्यांचे डोळे भरून आले होते.
जेवणाला वेळ होता आणि मंडळी आपसांत गप्पा मारत बसली होती. बाळ अर्णव पाळण्यात निवांत झोपला होता.
अजितनी माईक हातात घेतला, "आज बारशासाठी आपण सगळे जमलो आहोत. बाळाचं आगमन ही आई-वडिलांसाठी किती आनंदाची घटना! आई आणि बाळाचं नातं तर त्याही आधीपासूनचं आणि अधिक गहिरं!
पण आज या सोहळ्याचे औचित्य साधून, मी तुम्हां सगळ्यांना एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे एका जगावेगळ्या आणि उदात्त मातृत्वाची!" सगळे जण सरसावून आणि कान टवकारून बसले.
"अरविंद देवधर आणि अवंती जोशी, दोघेही बँकेत नोकरीला होते. एकमेकांच्या प्रेमात पडले आणि विवाहबद्ध झाले. अरविंदच्या घरी भांडुपला फक्त त्याची आई आणि तो. अरविंदचे बाबा तो नोकरीला लागला, त्याच वर्षी अचानक हार्ट अॅटॅकने गेले.
अवंतीच्या घरी नेरळला, आई-बाबा आणि धाकटा भाऊ!
अवंतीचे लग्न होऊन पाच वर्षे झाली, तरी घरात पाळणा हलेना. दोघांनी सर्व तपासण्या केल्या, पण कोणातच काही कमतरता नव्हती. तेव्हा नशिबाचा भाग मान्य करून, अवंती आणि अरविंदनी मूल दत्तक घेण्याचा विचार
केला. अर्थात दोघांच्या घरच्यांनीही संमती दिली होतीच.
मग त्यांनी अनाथाश्रमातून एक बाळ दत्तक घेतलं. त्यावेळी तो मुलगा जेमतेम तीन महिन्यांचा होता. आई-बाबा आणि आजीच्या प्रेमळ सहवासात त्याचं संगोपन सुरू झालं. त्याचं कौतुक करण्यात तिघांची अगदी अहमहमिका लागे. शिवाय दुसरे आजी-आजोबा आणि मामा देखील अधूनमधून यात सहभागी होत होतेच.
तो तीन वर्षांचा झाला, तसं त्याला कोणत्या शाळेत घालायचं असा विचार अरविंद आणि अवंती करू लागले होते. तशात एक दिवस अवंती ऑफिसमधून घरी आली तीच, बरं वाटतं नाही म्हणून! घरी आल्या आल्या तिला उलटी झाली. ॲसिडिटी किंवा अजीर्ण असेल म्हणून घरगुती उपचार केले, पण उलट्या थांबेचनात. म्हणून अरविंद तिला डाॅक्टरांकडे घेऊन गेला. त्यांनी तिला हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट करून सलाईन लावलं आणि काही तपासण्या करायला सांगितल्या, आणि दुसर्या दिवशी काविळीचं निदान झालं. अवंतीला तापही बराच होता. उपचार सुरू होते पण.. पण आठच दिवसात अवंती हे जग सोडून गेली.
अरविंद तर पार कोलमडून गेला. त्याचं चित्त थाऱ्यावर राहात नव्हतं. त्याच्या आईला देखील सुनेच्या अचानक मृत्यूमुळे जबरदस्त धक्का बसला. त्यांचा रक्तदाब खूप वाढला आणि आठवडाभर आय. सी. यू. त ठेवायची वेळ आली.
इकडे बाळानेही आई हवी म्हणून घर डोक्यावर घेतलं. अवंतीचे आई-बाबा आणि भाऊदेखील या आघाताने खचून गेले होते. कोणी कोणाला सावरायचं अशी सर्वांची अवस्था! आई घरात दिसत नाही आणि बाकी सगळे असे रडताहेत, याचा उलगडा त्या लहानग्याला होईना. तोही रडून गोंधळ घालू लागला.
मग बाजूच्या ब्लाॅकमध्ये राहणाऱ्या दातेबाई या लेकराला आपल्या घरी घेऊन गेल्या. दोन महिन्यांपूर्वीच त्या इथे राहायला आल्या होत्या. फारसा परिचय नसला तरी शेजारी म्हणून त्यांचं अरविंदच्या आईशी, क्वचित अवंतीशी तर कधी या छोटूशी हाय-बाय चालायचं.
त्यांनी त्याला चुचकारून कसंबसं जेवायला घातलं. जवळ घेऊन गोष्ट सांगत, थोपटत त्याला झोपवलं. अवंतीचं दिवसकार्य होईपर्यंत रोजच अधून-मधून दातेबाई त्याला सांभाळू लागल्या.
पण नंतर अवंतीचे आई-बाबा नेरळला आपल्या घरी जाणार होते. अरविंदची आई आजारीच होती, त्यांना विश्रांतीची गरज होती. अरविंद एकटा तरी सगळं कसं सांभाळणार?
अवंतीच्या आईने काही दिवस बाळाला, नेरळला घेऊन जाण्याची तयारी दाखवली. पण एकतर मुलगी गेल्याने त्याही सैरभैर होत्या आणि अरविंदलाही ते प्रशस्त वाटत नव्हतं.
अरविंदकडे स्वैपाकाला आणि धुणं-भांडी करायला दोन बायका होत्याच.आता बाळाला सांभाळायला आणि आईकडे लक्ष द्यायला एखादी बाई शोधायची असं त्यानं ठरवलं.
बाई मिळेपर्यंत बाळाला सांभाळायची आणि जमेल तशी मदत करायची दातेबाईंनी तयारी दर्शविली. त्यांना मूलबाळ नव्हतं आणि त्यांचे मिस्टर मरिन इंजिनिअर असल्याने दोन-दोन महिने बोटीवर, परदेशात असायचे. त्यामुळे त्यांना ते जमण्यासारखं होतं. शिवाय बाळालाही आता त्यांची सवय झाली होती. तो आनंदाने त्यांच्याजवळ राहात होता.
महिनाभर गेला पण योग्य बाई काही मिळत नव्हती. अरविंदला कामावर जाणंदेखील आवश्यक होतं. या धक्क्यातून सावरण्यासाठी थोडी मदत झाली असती. त्यामुळे काही दिवस
स्वैपाक करणाऱ्या आणि कामवाल्या बाईंना थोडा जास्त वेळ थांबायची व्यवस्था करण्यात आली.
अरविंद कामावर रूजू झाला खरा, पण त्याचं मन अजून अस्थिरच होतं. एके दिवशी सकाळच्या गर्दीत तो गाडीत चढला, गाडीने वेग घेतला आणि कसा कोण जाणे, पण गाडीतून बाहेर फेकला गेला. त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. चार दिवसांनी हाॅस्पिटलमध्ये कोमातच तो गेला.
त्याच्या आईवर तर आभाळच कोसळलं. जवळचे असे फारसे कोणी नातेवाईकही नव्हतेच. आणि जे होते त्यांनी या दोघांची जबाबदारी घ्यावी लागेल, या भीतीनं संबंधच तोडून टाकले.
दातेबाईंनी आणि त्यांच्या मिस्टरांनी या स्थितीत त्यांची खूप काळजी घेतली. अरविंदचं क्रियाकर्म व्यवस्थित पार पाडलं. अवंतीचे आई-वडील येऊन गेले. पण बाळाविषयी फारशी आस्था त्यांनीही दाखवली नाही. त्या बाळाशी काही त्यांचं रक्ताचं नातं नव्हतं ना!
दातेबाईंच्या मिस्टरांनी, अशोकरावांनी बँकेत खेपा घालून, अरविंदच्या
मृत्यूनंतरचे सर्व आर्थिक व्यवहार मार्गी लावले. मिळालेले पैसे अरविंदची आई आणि मुलगा यांच्या संयुक्त नावाने गुंतवून त्यांच्या योगक्षेमाची तरतूद करून दिली. बाळाचं संगोपन आणि आजींचीही जबाबदारी दातेबाईंनी स्वतःहूनच स्विकारली.
काळ कोणासाठी थांबून राहात नाही. त्याप्रमाणे बाळ शाळेत जाऊ लागला, मोठा होऊ लागला. तो चवथीत असताना त्याची आजीही हे जग सोडून गेली. त्यानंतर दातेबाईंनीच बाळाला मुलाप्रमाणे सांभाळलं.
मुलगा शिकून साॅफ्टवेअर इंजिनिअर झाला. नोकरीला लागला. त्याच्यासाठी श्री व सौ. दातेच त्याचे आई-बाप होते.
ते बाळ म्हणजेच मी.. अजित अरविंद देवधर. आणि माझी ही जगावेगळी आई म्हणजे आशाताई दाते आणि बाबा अशोक दाते."
सगळे जण ही कहाणी ऐकून स्तब्ध झाले होते. अनिताची आई आणि काकू अवाक् झाल्या होत्या. कारण अनिताचं लग्न ठरवताना त्यांना फक्त एवढंच माहित होतं की, अजितला दत्तक घेण्यात आलंय, आशाताई त्याची आई नव्हे, आणि म्हणूनच निपुत्रिक स्त्रीला बाळाच्या बारशाच्या कार्यक्रमात महत्त्व देणं त्यांना पटत नव्हतं. अजितच्या तोंडून ही हकिकत ऐकून मात्र त्यांना आपल्या वागण्याची आता लाज वाटत होती.
बाळाला केवळ जन्म दिला म्हणजेच कोणी स्त्री आई होत नसते. उलट आपल्या पोटी जन्म न घेतलेल्या मुलाला, आईचं प्रेम देणं ही मातृत्वाची भावना फार उदात्त आहे, नाही का?.
_*© प्रणिता खंडकर,*_ डोंबिवली.
*+91 98334 79845*
कथाविश्व - आपले कथांचे विश्व🎉
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉