Tarun Satyagraha News

Tarun Satyagraha News RNI.No.MAHMAR/2014/60324

नवी मुंबईतील घटनांचा सविस्तर वेध घेणारं आणि सामान्यांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारं आपल वृत्तपत्र !

असभ्य प्रतिक्रिया अथवा पोस्ट काढून टाकण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवत आहोत.

06/09/2026

ऐरोलीच्या राजाचा यंदाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. ऐरोलीच्या राजाला यंदा ३७ वर्षे पूर्ण झाली असून, यावर्षी गणपती बाप्पा मल्हारी मार्तंडाच्या रूपात अवतरला आहे.
बाप्पाच्या आगमनाला प्रहार ढोल पथकाच्या ढोल-ताशांच्या गजराने सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या निनादाने परिसर दुमदुमून गेला, तर फटाक्यांच्या आतषबाजीसह आकर्षक रोषणाईने ऐरोली परिसर उजळून निघाला. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात ऐरोलीच्या राजाचे आगमन झाले.

06/09/2026

कोपरखैरणे येथील एशेलॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या सुश्रुषा पाटील(नाव बदललेले आहे) यांच्या नाश्त्यात अळी आढळल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रविवारी कॅन्टीनमधून दिलेला उपमा रुग्णाला भरवत असताना हा प्रकार निदर्शनास आला.नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर संबंधित कॅन्टीन चालकावर कारवाई करून त्याला हटविण्याचे आश्वासन देण्यात आले. या घटनेमुळे रुग्णालयातील अन्नाची स्वच्छता व गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अन्न व औषध प्रशासनाने कॅन्टीनची तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

06/09/2026

नवी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पाटील यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ठाणे-बेलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पांडुरंग पाटील यांच्या मृत्यूला नवी मुंबई पोलीस दलातील काही अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. मात्र, संबंधितांवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याने संतप्त नातेवाईक आणि समर्थकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

06/09/2026

दहीहंडीच्या दिवशी Hiranandani Whitefield येथे ₹1,380च्या ऑर्डरसाठी ₹1,500 दिल्यानंतर ₹120 परत मागितल्यावरून वाद झाल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, डिलिव्हरी कर्मचारी कुंदन बाळू डोंगले याने मित्राला बोलावून घराबाहेर शिवीगाळ व गोंधळ घातला. सायकल फेकणे, दरवाजावर चप्पल फेकणे तसेच घरात घुसून मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून कारवाईची मागणी होत आहे.

06/09/2026

विशेष शाखेत कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पाटील यांनी लॉजिंगमध्ये आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर कथित नोट आणि व्हिडिओ पोस्ट केला असून, त्यात दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी व एका हेड क्लार्कला जबाबदार धरल्याचा आरोप आहे.दरम्यान, पाटील यांच्या लहान भावांनी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली. मात्र, गुन्हा दाखल न करता केवळ साध्या कागदावर स्टेटमेंट लिहून घेण्यास सांगितल्याचा आरोप नातेवाईक व मित्रपरिवाराने केला आहे. रबाले एमआयडीसी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

मृत ASI ने केलेल्या कथित आरोपांची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. गुन्हा दाखल होईपर्यंत रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात आंदोलन करण्याचा इशारा नातेवाईक व मित्रपरिवाराने दिला आहे.

05/09/2026

ऐरोली येथील साईनाथ वाडी येथे ‘देविदास चौगुले प्रतिष्ठान’तर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास थर रचताना गोविंदा मनोरा कोसळला. या अपघातात घणसोली येथे राहणाऱ्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून स्वप्निल (वय ३४, रा. घणसोली गाव, कोळीवाडा) असे मृत गोविंदाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा घणसोली येथील रहिवासी असलेला स्वप्निल ऐरोलीतील या दहीहंडीत थर रचण्यासाठी गेला होता. दहीहंडीचे थर रचत असताना अचानक संतुलन बिघडल्याने मनोरा कोसळला आणि स्वप्निल गंभीर जखमी झाला. उपस्थितांनी त्याला तत्काळ रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.
घणसोलीत राहणाऱ्या तरुण गोविंदाचा ऐरोलीतील आयोजनात असा दुर्दैवी अंत झाल्याने घणसोली कोळीवाडा परिसरासह ऐरोलीतही शोककळा पसरली आहे. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

05/09/2026

वाशी डेपो परिसरातील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांना अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रात्रीच्या शिफ्टमधून घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या गंभीर समस्येकडे अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही अंधार दूर करण्यासाठी ठोस कारवाई कधी होणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.महापालिका प्रशासनाकडून रस्ते, स्वच्छता आणि इतर कामांच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना वाशी डेपोतील साधे पथदिवे सुरू ठेवण्यातही प्रशासन अपयशी ठरत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. एखादी दुर्घटना किंवा अनुचित प्रकार घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही आता उपस्थित होत आहे.

05/09/2026

नवी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत (SB) कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने (ASI) लॉजिंगमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आत्महत्येपूर्वी ASI ने सोशल मीडियावर कथित आत्महत्येची नोट आणि व्हिडिओ पोस्ट केल्याची माहिती आहे. यामध्ये दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि एका हेड क्लार्कला जबाबदार धरल्याचा आरोप आहे.या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, आत्महत्येची नेमकी कारणे आणि सोशल मीडियावरील आरोपांची सत्यता तपासली जात आहे. अधिक तपशील मिळणे बाकी आहे.

05/09/2026

ऐरोलीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंडळाच्या गणरायाचे रविवार, ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आगमन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हा आगमन सोहळा इच्छापूर्ती गणेश मंदिर, सेक्टर १५ ते वरद विनायक गणेश मंदिर, सेक्टर ४या मार्गावर होणार आहे. ऐरोलीतील सर्वांत पहिला व मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ऐरोलीचा राजा’च्या आगमनासाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

05/09/2026

शिवसेना प्रणित सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने ऐरोली येथील इच्छापूर्ती मंदिर परिसरात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना उपनेते, महाराष्ट्र राज्य तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि उत्सवाचे आयोजक विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी उत्सवाची विधिवत पूजा करून मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.
नवी मुंबईतील भव्य दहीहंडी उत्सव म्हणून या सोहळ्याकडे पाहिले जात असून, यंदा दहीहंडी पथकांसाठी तब्बल ११ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विविध गोविंदा पथकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
उत्सवाच्या प्रारंभीच महिला गोविंदा पथकाने सहा थरांचा मानवी मनोरा रचत दहीहंडीला दिमाखदार सलामी दिली. महिला गोविंदांच्या या साहसी कामगिरीला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

Address

Sutar Tower , Sector 20, Airoli
Navi Mumbai
400708

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tarun Satyagraha News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share