11/03/2026
परळीची सुवर्णकन्या आभा मुंडे इटलीत होणाऱ्या पॅरा स्विमिंग वर्ल्ड सिरीजमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व
परळी वैजनाथ :
परळी वैजनाथ तालुक्यातील डाबी या गावची सुवर्णकन्या कु. आभा गणेश मुंडे हिची इटली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरा स्विमिंग वर्ल्ड सिरीज स्पर्धेसाठी निवड झाली असून ती या प्रतिष्ठित स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा १२ ते १५ मार्च २०२६ दरम्यान इटलीतील Lignano Sabbiadoro येथे पार पडणार आहे.
दिव्यांग जलतरणपटूंसाठी आयोजित होणाऱ्या या जागतिक स्तरावरील स्पर्धेचे आयोजन World Para Swimming या संस्थेमार्फत, World Paralympic Committee (WPC) यांच्या अधिपत्याखाली केले जाते. जगभरातील नामांकित पॅरा जलतरणपटू या स्पर्धेत सहभागी होत असल्याने या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे.
परळी सारख्या छोट्या शहरातून जागतिक क्रीडा मंचावर झेप घेणारी आभा ही पहिली शालेय विद्यार्थिनी ठरत असल्याने परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातून कठोर परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेली ही कामगिरी अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरत आहे.
आभा मुंडेने आपल्या अथक परिश्रमाच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. २०२४–२५ मध्ये गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग स्पर्धेत तिने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत ५ सुवर्णपदके पटकावली. त्यानंतर २०२५–२६ मध्ये हैदराबाद येथे आयोजित राष्ट्रीय पॅरा स्विमिंग स्पर्धेत देखील तिने तितक्याच दमदार कामगिरीने पुन्हा ५ सुवर्णपदके जिंकली. सलग दोन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये १० सुवर्णपदकांची कमाई करत तिने आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला असून त्यामुळे ती महाराष्ट्रातील आशादायी आणि उदयोन्मुख पॅरा जलतरणपटूंमध्ये गणली जाऊ लागली आहे.
आभाच्या क्रीडा प्रवासाची सुरुवात परळी वैजनाथ येथेच झाली. तिने जलतरणाचे प्राथमिक धडे माऊंट लिटरा झी स्कूल, परळी वैजनाथ येथील स्विमिंग प्रशिक्षक संजय भगत यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले. त्यानंतर आपल्या कौशल्यात अधिक प्रगल्भता आणण्यासाठी आभा सध्या Bengaluru येथे नामांकित पॅरा स्विमिंग प्रशिक्षक शरथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर प्रशिक्षण घेत आहे. सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे तिची कामगिरी दिवसेंदिवस अधिक उज्वल होत आहे.
जलतरणाबरोबरच आभाने योगा क्रीडा प्रकारातही राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक मिळवले आहे. तिच्या या यशामागे तिचे काका शरद रघुनाथराव मुंडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. शरद रघुनाथराव मुंडे हे सध्या Uzbekistan येथे Cultural Ambassador म्हणून कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे आभाच्या शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक एकाग्रतेत मोठी वाढ झाली आहे.
आभाच्या क्रीडा प्रवासामागे तिच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. तिचे वडील गणेश मुंडे हे स्वतः उत्कृष्ट क्रिकेटपटू असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच खेळाची आवड आहे. त्यामुळे त्यांनी आभाला बालपणापासूनच क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. वडिलांसह संपूर्ण कुटुंबाचा मिळालेला पाठिंबा, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन यामुळेच आभा आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेऊ शकली आहे.
सध्या आभा मुंडे ही परळी वैजनाथ येथील विद्यावर्धिनी विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
दरम्यान श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. एस. एस. कोळगे, उपाध्यक्ष श्री. एस. बी. भिंगोरे, सचिव श्री. पी. जी. ईटके, कोषाध्यक्ष श्री. पी. जे. पैंजणे, संचालक श्री. एम. टी. मुंडे, श्री. आर. पी. वाणी, श्री. बी. ए. चेवले, श्री. यू. एच. मातेकर, श्री. एस. एम. कराड तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. जी. नीला, श्री. जे. व्ही. सुमठाणे, क्रीडा शिक्षक श्री. विजय मुंडे, श्री. बालासाहेब हंगरगे आणि सर्व शिक्षकवृंद यांनी आभा मुंडेचे अभिनंदन करत इटलीत होणाऱ्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून देश व परळीचे नाव उज्ज्वल करावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
आभा मुंडेच्या या प्रेरणादायी कामगिरीमुळे परळी वैजनाथ शहराच्या क्रीडा क्षेत्राला नवे बळ मिळाले असून ग्रामीण भागातील अनेक तरुण खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळत आहे. जिद्द, चिकाटी आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा असेल तर ग्रामीण भागातील खेळाडू देखील जागतिक स्तरावर चमकू शकतात, याचे जिवंत उदाहरण म्हणून आभा मुंडेकडे पाहिले जात आहे.
आता संपूर्ण देशाचे लक्ष इटलीतील या जागतिक स्पर्धेकडे लागले असून परळीच्या या सुवर्णकन्येकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 🏊♀️🇮🇳