25/07/2024
नागपूर येथील लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी शफी पठाण यांनी खूपच आत्मीयपणे संमेलनाची आठवण नमूद केली आहे.
विखाराला विवेकाने उत्तर......अलविदा फादर!
९ जानेवारी २०२० चा दिवस. स्थळ - उस्मानाबाद. दुपारचे १२ वाजले होते. हॉटेलला बॅग ठेवली आणि तडक निघालो फादर राहणार असलेले हॉटेल शोधायला. कारण, बातमी तिकडेच होती. फादरच्या साहित्य व सामाजिक क्षेत्रातील योगदानाकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करून त्यांच्या धर्मांच्या नावावर द्वेषाचा विखार पसरवणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर अचानक व्हायरल होऊ लागल्या होत्या. उद्या हा माणूस संमेलनाच्या मांडवात अध्यक्ष म्हणून दिसायलाच नको, यासाठी साहित्य महामंडळाला सलग धमक्या येत होत्या. फादर घाबरून येेणारच नाहीत, अशीही राळ उठवली जात होती. ऐरवी साहित्य संमेलन म्हणजे, एका मांंडवापुरती कथा. पण, कट्टरतेच्या मुजोर अबलख घोड्यावर स्वार कथित शूरवीरांनी फादरच्या अखिल मानवतावादी विचारांना आव्हान दिल्यानेे अवघ्या उस्मानाबादेत तणाव होता. हा असहय तणाव आजारी फादरला झेपणारच नाही, त्यामुळे येणारच नाहीत, असा ठाम ग्रह करून माझे काही मित्र छान हॉटेलात आराम करीत होते. पण, मी आधी फादरला भेटलो होतो. विरोधाची तलवार पाजळणाऱ्या लोेकांची जबर कोल्हेकुई फादरला विचलित करू शकत नाही, यावर माझा तरी ठाम विश्वास होता. दिवस मावळतीला आला. हॉटेलसमोर कडक पहारा होता. धमक्यांचे फोन सुरूच होते. तिकडे संमेलनस्थळही सुतकात गेले होते. एक अजब अंधार दाटून आला होता. तितक्यात हॉटेलच्या प्रांगणात वाहनाचे दिवे चमकले. अविवेकाच्या ठार अंगणात विवेकाची एकच पणती उजाळते ना....अगदी तसेच. व्हीलचेअर गाडीजवळ आली. फादर कारमधून उतरले. भयाचा कुठलाही भाव त्यांंच्या चेहऱ्यावर नव्हता. ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूला मराठी साहित्याचा हा सर्वोच्च मान कसा काय दिला जातोय म्हणून पोटशूळ उठलेल्यांनी मनगटशाहीच्या बळावर निर्वाणीचा इशारा देवूनही फादर उस्मानादच्या धर्तीवर प्रत्यक्ष दाखल होते. त्यांचा हा वैचारिक विद्रोह थेट दुर्गा भागवतांचा वारसा सांगणारा होता. फादरशी नजरानजर झाली, मला बातमी मिळाली. पहिली लढाई फादर जिंकले होते, पण खरा सामना दुसऱ्या दिवशी होता....तोही थेट संंमेलनाच्या मांडवात. फादरच्या येण्याने विरोधक आणखी चवताळले होते. धमक्यांचा स्वर अधिक तीव्र झाला होता. या धमक्यांचा रोेख आता फादरऐेवजी आयोजकांकडे वळला होता. या प्रसंगात ठालेे पाटलांनी जो ठामपणा दाखवला व त्याना प्रा. मिलिंंद जोशींचे जे पाठबळ मिळाले . ते अभूतपूर्व होते. आमचे सहकारी रवींद्र केसकर व त्यांच्या चमूनेही छातीची ढाल केली होती. सगळयांनाच आता पहाटेची प्रतीक्षा होेती. अखेर ती प्रतीक्षा संपली. पण, फादर दिंडीला आले नाहीत. त्यामुळे धमकवणाऱ्यांना काही क्षण असुरी आनंद घेता आला. पण, प्रत्यक्ष संमेलनाचा बिगुल वाजला आणि फादर मंचावर दिसायला लागले. संमेलनाला रक्तरंजित करण्याच्या दांभिक नतद्रष्टपणाच्या छाताडावर वार करून फादर मंंचावर आले होते. आपल्या पूर्वायुष्यात पाणी, पर्यावरण, निसर्ग यांच्या रक्षणार्थ सरकारी यंत्रणेसोबतच सरळ सरळ गुंड बिल्डर आणि अंडरवर्ल्ड डॉन यांच्याशी थेट रस्त्यावर भिडणाऱ्या फारदनी संमेलनाच्या मांंडवातली लढाईसुुद्धा जिंकली होती. या मांडवात संमेलनाचा अध्यक्ष म्हणून फादरनी जे भाषण केले ते समाजहितासाठी वैचारिक दस्तऐवज ठरावे, इतके अनमोेल आहे. त्या भाषणाचा प्रत्येक बिंदू समोर बसून नोंदवताना माझेही सर्वांग अभिमानाने शहारत होते. (ते भाषण या लेखाच्या खालील दिलेल्या लिंकमध्ये आहे) लोकशाहीचे सोंग घेऊन हुकूमशहा जन्माला येत असतील तर आपल्या लेखणीला वाघनखे बनवून त्यांचा बुरखा साहित्यिकांनीच फाडला पाहिजे. निश्पाप विद्यार्थ्यांची डोकी फुटत असतानाही साहित्यिक बोलत नसतील तर ती लेखनिशी बेईमानी ठरेल, अशा शब्दात फादर गरजले होते. ही गर्जना आता कायमची लोपली आहे....
अलविदा फादर!
शफी....