23/07/2025
मी आज जे काही काम करायला घेत आहे, त्याचा मूळ उद्धेश काय ?
मी हे कशासाठी करतोय ?
मी जे करतोय त्यातून लोकांना काय मिळणार आहे ? आपण त्यांना काहीतरी समाधान, विचार, आनंद देतोय का ? माणसांनी फक्त वस्तू द्यायच्या नसतात. असंख्य गोष्टी आहेत देण्यासारख्या. माझं प्रत्येक काम हे दातृत्वाच्या हेतूने किंवा असे विशिष्ट काम ज्यातून लोकांचं भलं अथवा त्यांना काहीतरी त्यातून मिळेल या भावनेने असावं. सतत आपल्या मनासारख्या काही गोष्टी होत नाहीत. कधी कधी प्रवाहाबरोबर वाहत जायचं. आता पर्यंत सोबत असलेले विचार आणि त्यातून घेतलेली शिकवण यातून आपण बरंच शिकत आलोय. आपल्या कामाचा विस्तार करताना, आपण काम सहजरित्या करता करता ते आपोआप मोठं होईल एवढी मजल गेली पाहिजे. म्हणजेच एखाद्या कामासाठी जर जास्त ऊर्जा लागत असेल तर आपण ते काम चुकीच्या पद्धतीने किंवा त्यातील प्रोसेस जी निसर्गाला सहज रुचणारी नाही त्यात बदल करायला हवा. निसर्ग म्हणजेच हि श्रुष्टि ज्यात सर्व आलं. आपण जे काम करतो ते केवळ मनुष्यासाठी आहे हाच विचार चुकीचा आहे. आपण सर्वजण एकमेकांवर अवलंबून आहोत. मी आज जे काही करणार आहे किंवा करायचा विचार करत आहे. त्यात अग्रस्थानी मी काय देणार आहे हे पाहिले आले पाहिजे. मग ते किती स्वरूपात आहे याच इथे विचार नसावा. मला मी करत असलेल्या कामातून किती अथवा कधी फायदा होईल असा विचार येणे साहजिकच आहे. मनाला आपण थांबवू शकत नाही. प्रत्येक काम यातून तुमचं भविष्य ठरणार आहे तर सर्वच गोष्टी आताच का मिळाव्या. काही गोष्टी किंवा त्याचे परिणाम भविष्यात मिळतीलच. कदाचित कमी कालावधीत मिळणारं समाधान किंवा त्याचा मोबदला काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी मिळतो त्यात जास्त समाधान असतं. त्यामुळे आज जे करतोय ते चांगल्या मनाने, चांगल्या विचारांनी, आणि दातृत्वाच्या भावनेने केले गेले पाहिजे. असा विचार करूनच जर योजना आखली तर यशस्वी होण्यापासून कोणीच रोखणार नाही.
- सतीश रटाटे