21/08/2026
पाणी व माती संवर्धनासाठी चालले परभणीकर
‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’चा संदेश देत ‘महा-वॉकेथॉन’ उत्साहात
परभणी, दि.21 (जिमाका): माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच जलसंधारण दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश देत परभणी येथे ‘महा-वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आज राज्यभरात २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन, १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह तसेच १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिक, विशेषतः युवकांमध्ये मृद व जलसंधारणाचे महत्त्व पोहोचविण्यासाठी महा-वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथून कृषी विद्यापीठातील क्रीडा संकुलापर्यंत या महा-वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे यांच्या हस्ते वॉकेथॉनचा शुभारंभ झाला. यावेळी, महापौर सय्यद इकबाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोन्सीकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी कविराज कुचे, तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
माती आणि पाणी ही अत्यंत महत्त्वाची नैसर्गिक संसाधने असून त्यांच्या संवर्धनासाठी व्यापक लोकसहभाग आवश्यक आहे. केवळ भाषणातून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून जलसंधारणाचा संदेश जनमानसात रुजविणे गरजेचे आहे. पाण्याची उपलब्धता वाढविणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देणे आवश्यक आहे.
जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी अडविणे, पाणी जमिनीत जिरविणे आणि मातीची धूप रोखणे शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील जलस्रोत, पाणलोट क्षेत्र आणि मातीच्या संवर्धनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर यांनी केले.
जलसंधारण अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘आपला सहभाग, आपली बांधिलकी – जलसंवर्धनाची हीच खरी शक्ती’ हा संदेश प्रत्यक्षात आणावा. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करून जलसमृद्ध आणि हिरवागार महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इन्द्र मणि यांनी केले.
‘पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा’, ‘माती वाचवा, पाणी वाचवा’, ‘पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल, जपुया त्याचे मोल’, ‘पावसाचा प्रत्येक थेंब अडवूया, हिरवागार महाराष्ट्र घडवूया’, ‘थेंब थेंब पाणी साठवूया, भविष्यातील दुष्काळ टाळूया’, ‘पाणी नाही तर विकास नाही’, ‘जलसंधारणाशिवाय पर्याय नाही’, ‘जल है तो कल है’ अशा घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन नागरिकांनी वॉकेथॉनमध्ये सहभाग घेतला. विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
चित्ररथाच्या माध्यमातूनही जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच जलसंधारण विभागाच्या वतीने ‘रील्स बनवा, बक्षीस मिळवा’ या उपक्रमाची माहिती देण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जलसंधारणाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन मृद व जलसंधारण विभागाकडून करण्यात आले.
*-*-*-*-