17/05/2026
चला... एकत्र येऊया, परळीला सुंदर - सशक्त बनवूया!
ग्लोबल विकास ट्रस्टचा एका आठवड्यात २५ लाख वृक्ष लागवडीचा ऐतिहासिक संकल्प
________________
*मयंक गांधी*
संस्थापक अध्यक्ष – [ग्लोबल विकास ट्रस्ट]
________________
भारत आज एका अत्यंत निर्णायक वळणावर उभा आहे. एका बाजूला वाढते दारिद्र्य, शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती, पाणीटंचाई, हवामान बदल आणि पर्यावरणाचा सतत होणारा ऱ्हास आहे; तर दुसऱ्या बाजूला लोकसहभाग, पर्यावरण पुनर्संचयितीकरण आणि शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून ग्रामीण भारताचे पुनर्निर्माण करण्याची अभूतपूर्व संधी उभी आहे. आज परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, छोट्या-छोट्या उपक्रमांनी किंवा मर्यादित प्रयत्नांनी या संकटांवर मात होणे शक्य नाही. आता वेळ आली आहे व्यापक लोकचळवळीची, जनसहभागातून उभ्या राहणाऱ्या परिवर्तनाची आणि राष्ट्रनिर्मितीच्या नव्या अध्यायाची.
याच विचारातून ग्लोबल विकास ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून देशातील ६,००० हून अधिक गावांमध्ये लाखो ग्रामीण कुटुंबांसोबत काम करत आहे. पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक समृद्धी यांचा संगम घडवणारे एक प्रभावी मॉडेल उभे करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. जीव्हीटीच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांच्या शेतांवर आजपर्यंत ७ कोटींहून अधिक फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. या उपक्रमाचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर किती मोठा परिणाम होऊ शकतो, याची प्रचिती विविध अभ्यासांतून आली आहे. Tata Institute of Social Sciences (TISS) च्या अभ्यासानुसार, या मॉडेलचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिएकर वार्षिक उत्पन्न जवळपास दहापट वाढून ₹३८,७०० वरून ₹३,९३,००० पर्यंत पोहोचले आहे.
*मात्र, हा प्रवास केवळ सुरुवात आहे.*
२३ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत परळी आणि परिसरात एक ऐतिहासिक लोकचळवळ उभी राहणार आहे. ५,००० हून अधिक स्वयंसेवक, १५० गावे, शाळा, महाविद्यालये, शेतकरी गट, युवक संघटना, सामाजिक संस्था आणि समाजातील विविध घटक एका महान ध्येयासाठी एकत्र येणार आहेत — फक्त एका आठवड्यात २५ लाख फळझाडांची लागवड केली जाणार आहे. वेगवेगळ्या अर्थाने प्रसारमाध्यमांतून आणि सोशल मीडियातून परळीचे नाव खूप खराब झाले आहे, मात्र माझा मागील अनेक वर्षांचा येथे काम करण्याचा अनुभव खूप चांगला आहे. मी नेहमी माझे अनुभव व्यक्त करतांना सांगत असतो की, परळीकरांसारखे लोक कोठेही शोधून सापडणार नाहीत. हा डाग पुसायचा आहे, खराब झालेली प्रतिमा पुसून काढत नव्याने एका सकारात्मकतेची मुहूर्तमेढ रोवायची आहे. राजकारण, जात, धर्म आणि सगळे वाद विसरून आता केवळ "मी शेतकरी" या एका शब्दावर सर्वांनी एकत्र येऊन परळीला बदलायला हवे.
*ही केवळ वृक्षलागवड मोहीम नाही; तर ग्रामीण भारताच्या पुनरुत्थानाचा व्यापक आराखडा आहे.*
ही चळवळ ग्रामीण दारिद्र्याविरुद्ध लढण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, नद्या आणि भूजल पुनर्जीवित करण्यासाठी, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी, हरित रोजगार निर्माण करण्यासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणीय संतुलन पुनर्स्थापित करण्यासाठी उभारली जात आहे.
या मोहिमेअंतर्गत जवळपास १५० गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी सर्वाधिक वृक्षलागवड आणि त्यांचे एक वर्ष संगोपन करण्यासाठी मोठी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. वृक्षलागवड ही केवळ एकदिवसीय मोहीम न राहता, दीर्घकालीन पर्यावरणीय जबाबदारी म्हणून रुजवण्याचा हा प्रयत्न असेल. या परिवर्तनात्मक उपक्रमाला अधिक बळ देताना जीव्हीटीने परिसरातील १०८ किलोमीटर नदीपात्रांचे खोलीकरण आणि रुंदीकरण पूर्ण केले आहे. आता या नद्यांच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून संपूर्ण नदीपट्टा हरित पट्ट्यात रूपांतरित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे जलसुरक्षा, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरणीय संतुलन यांना दीर्घकालीन लाभ मिळणार आहेत.
या मोहिमेची आणखी एक महत्त्वाची आणि विशेष बाब म्हणजे तिचे वैज्ञानिक व पारदर्शक दस्तऐवजीकरण. प्रत्येक लागवड क्षेत्राचे जिओ-टॅगिंग करण्यात येणार असून संपूर्ण मोहिमेचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला जाईल. त्यामध्ये लागवड केलेल्या झाडांच्या जगण्याचे परीक्षण, भूजल पुनर्भरणाचे मूल्यांकन, जलसंधारण परिणामांचा अभ्यास आणि कार्बन शोषणाचे अंदाज यांचा समावेश असेल.
> विशेष म्हणजे, ५ जून २०२७ — World Environment Day 2027 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या संपूर्ण मोहिमेचा प्रभाव अहवाल आणि सर्व्हायव्हल ऑडिट सार्वजनिक करण्यात येणार आहे.
राष्ट्रनिर्मिती ही केवळ सरकारची जबाबदारी नसते. कोणत्याही देशाच्या परिवर्तनासाठी नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, संस्था, उद्योग आणि समाज यांचा सामूहिक सहभाग अत्यावश्यक असतो. इतिहास त्याच पिढ्यांना लक्षात ठेवतो, ज्या राष्ट्राला गरज असताना पुढे येतात. आज भारत अशाच एका निर्णायक क्षणातून जात आहे. हा फक्त वृक्षलागवडीचा कार्यक्रम नाही; तर भारताच्या भविष्यासाठी उभारली जाणारी हरित क्रांती आहे.
या चळवळीच्या माध्यमातून चिंच, शेवगा, जांभूळ, बोर, आंबा (देशी), लिंबोणी, करवंद, आवळा, तुती, कवठ, बेल, सीताफळ, रामफळ, उंबर, पेरू (देशी), केळी इत्यादी फळांची आणि औषधी गुणधर्म असलेली झाडे लावण्यात येणार आहेत. जी झाडे सावली देतील, प्राणवायू देतील आणि त्यासोबतच गोड आणि रसाळ फळेही येणाऱ्या पिढ्यांना चाखायला मिळतील. ज्यामुळे पर्यावरण संवर्धन, आरोग्यवर्धन आणि आर्थीय स्थैर्य इत्यादी गोष्टी साध्य होणार आहेत.
*या. सहभागी व्हा, योगदान द्या.*
चला, एक हरित, समृद्ध आणि शाश्वत भारत घडवूया. या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क: 9558488686 करा आणि अधिक माहितीसाठी www.globalvikastrust.org ला भेट द्या.