
23/06/2025
🌧होऊर' 🌧
'होऊर' म्हणजे अतिवृष्टीमुळे पाण्याच्या प्रवाहाचा प्रचंड ओघ. 'होऊर' हा मुळ मालवणी शब्द.
गोळवण गाव खरं म्हटलं तर...बागायती गाव.मुबलक पाणी उपलब्ध असल्यामुळे नारळाचे उत्पन्न जास्त घेतले जाते.गावठणपट्टा हा नारळाच्या उत्पादनात अग्रेसर आहे.बागायती शेती म्हणजे पोटधंदा असावा तशी केली जाते. मिरची,वांगी, लाल माट, मुळा,मोहरी, वाल अशी उत्पादने ओढ्याच्या जवळ ओलसर जमिनीत वहाळाला पाटबंधारे बांधून केली जाते.पण हा भाजीपाला परसदारी भाजीपाल्यासारखाच मर्यादीत केला जातो.विक्री करुन पैसा कमवावा हा उद्देश फारसा तिथल्या लोकांना नसल्याचे जाणवते.स्वाभिमानी शेतकरी वर्ग बहुतांश गोळवण गावात पाहायला मिळतो.आर्थिक तेजी मंदीची झळ नक्कीच गोळवणच्या अर्थकारणावर पडलेली दिसते.गोळवण गाव तसा सुजलाम् सुफलाम् आहे परंतु आधुनिकीकरण आणि वाढत्या महागाईच्या अक्राळविक्राळ विळख्यातून बाहेर पडताना आजच्या गोळवणच्या पीढीला आटापिटा करावा लागतो.आधुनिक भपकेबाज जगात मोबाईल म्हणजे तर ... अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल.... ही गरजही तेवढीच महत्वाची ठरली आहे. अर्थात मोबाईल म्हटलं की सोशल नेटवर्किंग....आणि सोशल नेटवर्किंगशी जोडलं जाणं म्हणजे 'स्मार्टफोन' पाहीजेच.मग महिन्याचे नेटपॅक आलं... सेल्युलर कंपनींच्या आकर्षक ऑफर ....यात प्रत्येकाचा आर्थिक ताळमेळ बसणं मुश्किल होऊन जातं. त्यामुळे मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणारी माणसं आज पोटाला चिमटा काढुन 'अनलिमिटेड काॅल विथ इंटरनेट' चा रिचार्ज करतात आणि आधुनिक जगाशी जोडले जातात.अर्थात त्यांनी सुद्धा आधुनिक जीवनाचा आनंद जरुर घ्यावा. आयुष्यभर मळणीच्या बैलासारखं राबाराब असताना निखळ जीवनाचा आनंद घेतलाच पाहीजे.
जीवनातल्या महाप्रलयात आज आपण भरकटत चाललो आहोत.मालवणी भाषेत बोलायचे झाले तर 'होऊर इलो हा' या होऊरात आपण पाल्यापाचोळयासारखे वाहत चाललो आहोत.अर्थात होऊरात लाकडाचे ओंडके, जुन्या वस्तू, नारळ, चपला ह्या सगळ्या गोष्टी वाहत असतात.कित्येक सरपटणारे जीव सुद्धा पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत असतात. त्या बिचा-या जीवांना थांबावं वाटलं तरी थांबता येत नाही.होऊरात कुठे जाऊन पडतील याची काही खात्री नसते.
आठवणीतले 'होऊर' तसे बरेच आहेत.अर्थात सगळे बालपणीचेच. पावसाळा सुरु झाला होता. जुन महिन्याचा तिसरा आठवडा असावा. नव्वदीच्या दशकातली गोष्ट.सतत चारपाच दिवस मुसळधार संतत पाऊस कोसळत होता.वेगात अजिबात बदल नव्हता. घराला बांधलेल्या माडाच्या चुडताच्या झडीतुन पडवीत पाणी येत होते.मातीच्या भिंती असल्यामुळे भिंतीची ओल पालीसारखी वरवर सरकत होती.घरात जमिनीत पाय रुतत होता.घराच्या छप्पराच्या नळयातुन कुठून कुठुन पाणी ठिबकतच होतं.तिथे खाली बादली, टोप अशी भांडी ठेवत असू. अर्थात ती भांडी देखिल भरायची. भर दुपारी अंधारून आलं होतं. ढगांचा प्रचंड गडगडाट सुरु होता. विजा चमकत होत्या.थंडगार वारा सुटला होता. घराच्या बाजूला भलं मोठं चिंचचे झाड फुलांनी बहरलेले होते. चिंचेच्या फुलांचा मोहर अंथरुणासारखा पसरला होता.पिवळसर तांबूस फुले मोहक वातावरणात मन वेधून घेत होती. घरात आम्ही मुलंच होतो. आई शेतात गेली होती.किती पाऊस कोसळत असला तरी शेतात कामाला जाणं तिला भाग पडायचं. अठराविश्व गरीबी पुढे वातावरणातली कोणतीही संकटे आईला कधी हरवू शकत नव्हती.
सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं.थोडा पाऊस ओसरला की आम्ही मुलं दुकानाच्या जवळ नाक्यावर ओढ्याचं पाणी पहायला यायचो.कट्टा - पोईप मार्गाच्या रस्त्यावरून पाणी जाऊ लागायचे मुळात रस्ता समजत नसायचा सगळं पाणीचपाणी दिसायचं. जणू नदीचच रुप धारण केल्यासारखा सारा परिसर भासायचा.त्याकाळी नाक्यावर हवालदार आणि मारुती गावडे व यांचे एक चहा आणि भुशेरी सामानाचे दुकान होते.धर्मेंद्र आणि सनी देवल सारखे हे दोघे वडील व मुलगा व्यवसाय चालवत होते.कट्टा एस.टी. स्टॅन्डच्या बाजूला धामापूरकर यांचही असेच पितापुत्राचे दुकान दुकान होते.या दोन दुकानांमध्ये बरेच साम्य होते.काळाबरोबर कधी या दुकानात बदल घडलाच नाही. हवालदार यांच्या दुकानाच्या पडवीत केस कापण्याचे दुकानही होते.श्रीधर चव्हाण हे केशकर्तनालय चालवायचे.बालपणी आम्ही मुलं त्यांच्याकडेच केस कापत असू.
हवालदार यांच्या दुकानावर त्याकाळी ' दै. तरूण भारत' हे वर्तमानपत्र यायचे.मी विद्यार्थीदशेत तो पेपर वाचायला जायचो.हवालदार तोंडाने फुर्रर्र...फुर्रर्र... असा आवाज करत वस्तूंच्या पुड्या बांधत असत.. सारखी थुंकी उडण्याची भिती वाटायची.
होऊराच्या वेळी 'खवळे' मासे मारणारे बिलंदर लोक पाण्यामध्ये बांबूची काठी घेऊन इकडे तिकडे धावताना दिसायचे. पेंडकुळीण नावाच्या झाडाच्या फांदीच्या काठीत ओवून ठेवलेले दोन- तीन खवळे मासे घेऊन धावणारे तरबेज होऊरात दिसायचे.बांबूपासुन बनविलेली मासे पकडायची खुण घेवुन पडणावर काहीजण सापळा रचत होते.नाना ओरसकर पत्त्याच्या मेंढीकोट खेळात रमायचा माडाच्या झावळाच्या पडवीला असलेल्या कुडाच्याआडुन पावसाची सळसळ ऐकत आम्ही कधी कधी नाना सोबत मेंढीकोट खेळ खेळत असू.कधी कधी एखादा डाव हारलो तर नाना उल्हास व माझ्यावर प्रचंड रागवायचा. " चल ऊठ... चल... उठ" अस सांगून रागवायचा.पण खूप मजा यायची. नाना सोबत मेंढीकोट खेळताना. मध्येच नानी कोरा कोकाकोलासारखा दिसणारा चहा घेऊन यायची.पावसाच्या थंडगार वातावरणात चहा मग खेळात आणखी बहार आणायचा.
पावसाचे प्रमाण अलिकडे खूपच कमी झाले. ना कधी होऊर दिसत. ना कधी पुर्वीसारखे होऊरात चढणारे मासे. वाळय, ठीगूर, मळये, शेंगटी, काडय, फातका, डेमके, चाणके, मराल, टोळ असे मासे आता होऊराबरोबर दिसत नाहीत.आज मानवतेचाच होऊर वाहुन गेला आहे. होऊराचे गढूळ पाणी आयुष्याच्या रंगात भरून माणुसकी नष्ठ होऊ नये.होऊर भावनेचा यावा... आपुलकीचा यावा.... सहकार्याचा यावा....आपल्या एकतेचा यावा...ऐक्याचे जोरदार वारे वहावे...सर्वधर्मसमभाव...माणुसकी हीच एकमेव जात उरावी पुन्हा एकदा ती माणुसकीची संस्कृती होऊरासोबत यावी....होऊर...होऊर....आणि होऊरच यावा ..असा.
🕺लेखक:धनंजय शेटये.
एम.ए.बी.एड.( मुंबई)
📸 अमोल तिर्लोटकर