11/02/2021
महिनाभरात फलटण-पुणे रेल्वेची शिट्टी वाजणार
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते शुभारंभ
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून बर्थडे गिफ्ट
स्थैर्य लाईव्ह, फलटण : माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या स्वप्नातील फलटणची रेल्वे महिनाभरात सुरु होणार आहे. आगामी महिन्यात केंद्रीय रेल्वे मंत्री ना. पियुष गोयल यांच्या हस्ते फलटण-पुणे रेल्वे सुरु होणार असून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा फेब्रुवारी महिन्यात वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपाकडून त्यांना हे रेल्वेचे गिफ्ट मिळाले असल्याचे सध्या बोलले जात आहे.
दरम्यान, दिल्ली येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल व भाजपाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री ना. पियुष गोयल यांची भेट घेतली. फलटण-पुणे रेल्वे सुरु केल्याबद्दल खासदार रणजितसिंह व मान्यवरांनी त्यांचे आभार मानले व या रेल्वेच्या शुभारंभास येण्यासाठी त्यांनी ना. पियुष गोयल यांना निमंत्रण दिले आहे.
गत काही दिवसांपूर्वी फलटणच्या तहसील कार्यालयात खासदार रणजितसिंह यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली. या पार्श्वभूमीवर फलटण, माळशिरस, माण, खटाव व परिसरातील शेतकऱ्यांसाठी तसेच फलटणच्या औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या नोकरदारांसाठी फायदेशीर ठरणारी फलटण-पुणे ही रेल्वे सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते. खासदार रणजितसिंह यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ही रेल्वे आता धावणार आहे.
दरम्यान, लवकरच या रेल्वेच्या शुभारंभाची तारीख जाहीर करण्यात येईल. माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या स्वप्नातील फलटण तालुका उभारण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते कदापि मागे राहणार नाही, असे मत भाजपाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे.