26/05/2020
अनोळखी वाटेवर...यशस्वी प्रयोग
भय एक आभास आहे. कमकुवत मनाला खच्ची करणारं सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे भय. गेल्या संपूर्ण वर्षात मी लिहिलेल्या ३-४ दीर्घ भयकथा लिहिताना आलेले अनुभव कथित करत बसलो, तर एखादं पुस्तक अजुन जन्माला घालता येईल. रात्री-अपरात्री एखादा प्रसंग लिहिताना , नकळत अंगावर आलेला शहारा भयानक होता. मी एका खोलीत, आणि दोन खोल्या सोडून एखाद्या खिडकीने वाऱ्यामुळे बदललेली कूस , त्या क्षणासाठी तुमचं सगळं धैर्य कोळून पीत असते. आपली दृष्टी आपल्या लेखनात व्यस्त असताना, अचानक मागे कोणीतरी उभं आहे, किंवा त्याच खोलीच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून आपल्याकडे कोणीतरी पहात बसलंय, हा अनुभवही मला भयकथा लिहिताना आलाय.
भयाला जागा, वेळ-काळ अशी मापदंड कधीच नसतात. फक्त अंधारात, रात्रीचे इतकेच वाजल्यावर, किंवा याच रस्त्यावर, त्यात घरात, असं काहीही विशिष्ट नसतं. भय आपल्या मानसिकतेत आहे, आणि तो उजागर झाल्यावर आपल्यातील कल्पनाशक्तीला वाव देत ,आपल्यालाही त्याच्यासोबत घेऊन जातो. एखादा माणूस, एकाच वेळेस, एकतर स्वतःला वाचवू शकतो, अथवा घाबरू शकतो. स्वतःच्या आतील सुप्त शौर्याला मारायचे काम भय करतो. आणि हे दिवसाच्या कोणत्याही प्रहरात घडू शकतं.
"अनोळखी वाटेवर" हा दिसायला खूप साधा लघुपट आहे. तुमच्या-माझ्यासारख्या माणसाला रस्त्याने चालताना , सहज घडून गेलेले एक भयनाट्य आहे. पण यात वेळोवेळी नियतीने, अथवा निसर्गाने पारवे सरांना दिलेले इशारे कदाचित त्यांना लक्षात आले नसावे. त्या दुकानदाराने आधीच सांगितल्याप्रमाणे, जर ते पांदीच्या वाटेवर गेलेच नसते, तर कदाचित पुढचे काहीच घडले नसते, इतक्या सोप्या भाषेत एखादा लघुपट मांडणे, खरंतर कठीण काम आहे. प्रत्येक पात्र हे आपल्या आजूबाजूला असलेलंच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे संशयाने पहाणे शक्य होत नाही. आणि इथेच भय जिंकलेले आहे. यातच दिग्दर्शक जिंकतो. प्रत्येक प्रसंग, हा रोज आपल्या बाजूला घडतो. कोणीतरी मरतं, त्याला स्मशानात घेऊन जातात. त्याचा अंतविधी पार पडतो. पण इथे ही सगळी दृश्ये एक सूचक इशारा देताना दिसतायत, आणि हे इशारे, माणूस म्हणून मी देखील गांभीर्याने घेतले नसते.
माणसाला आज प्रमाण हवे आहे. या लघुपटात प्रमाण ,परिणामांत दिसतं. पारवे गुरुजी डाळवाडीला पोहोचले, पण ते कसे पोहोचले आणि त्यांच्या पोहोचण्याची नांदी नेमकी कुणाला मिळालीय, हे दिगदर्शकाने दाखवताना , तिसऱ्या जगाचे काही अधोरेखित नियम कटाक्षाने पाळले आहेत. मानवाला सहज न दिसणाऱ्या गोष्टी ,प्राण्यांना सहज दिसतात ! हा प्रसंग अप्रत्यक्ष जरी असला, तरी तो खूप सूचक आहे.
पारवे सरांचा पायी प्रवास आणि त्यांना दिसणारी माणसं ही साधी कधीच नव्हती. त्यांचे कटाक्ष भयानक होते. पण बोलीभाषेचा चपखल वापर तुम्हाला इथे खिळवून ठेवतो.
मोठे sets, creepy background score, तेच ते कथानक आणि रंगवलेले चेहरे, यातून बाहेर पडताना हा भयपट एक नवीन उदाहरण देऊन जातो. तांत्रिक दृष्ट्या पुरेपूर असलेले भयपट धडाधड box office वर अपात्र ठरत असताना, अंधारे यांचा हा छोटासा प्रयोग आमच्या सारख्या नावख्यांना खूप काही शिकवून गेलाय. ग्रामीण कथानक, साधे चेहरे, बोलीभाषा याचा वापर हा या भयपटाचा एक सावळा चेहरा , प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. नारायण अंधारे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन ! पुढच्या कलाकृतीची आम्ही वाट पाहू...! सोबत लिंक देतो आहेच. नक्की बघा...!
https://youtu.be/NLyFgZKpBo8
अनुराग.