25/08/2025
#सहकार_शिरोमणीचा_लेखाजोखा...................................................
#स्वार्थ , संशय आणि निष्क्रियतेमुळे अधोगतीची 25 वर्षे..............................................
#पार्श्वभूमी
पंढरपूरच्या ग्रामीण भागामध्ये स्वर्गीय वसंतराव काळे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नेतृत्व उदयाला आलं. प्रस्थापित राजकारणाची चौकट मोडून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्यांच्या नेतृत्वाला बळ दिले आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारू सोलापूर जिल्ह्यामध्ये उधळला. विठ्ठल परिवाराच्या अंतर्गत सभास, शेतकऱ्यांच्या सहकार्याने चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली. दुर्दैवाने या परिवाराने वसंतरावांचे नेतृत्व हरवले आणि वारसदार म्हणून कल्याणराव काळे यांच्याकडे कारखान्याची सूत्रे आली. वसंत दादा खरे कर्तुत्व पुरुष होते. वसंतराव यांनी चार नव्या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली होती. दोन हातात होते. मात्र पुढील पिढीने या स्वप्नातील कारखान्याचा आरंभ केला नाहीच तथापि विठ्ठल हातातून घालवला आणि आता सहकार शिरोमणी देखील जाण्याच्या मार्गावर आहे .
#पारंपारिक_विरोधक
आज हा कारखाना खाजगी उद्योजकाला देण्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. काळे परिवाराचे पारंपारिक विरोधक असलेले दीपक पवार यांनी या संभाव्य खाजगीकरणाला विरोध करत पुन्हा एकदा कल्याणराव काळे यांच्या गैरकारभाराचा पाढा समोर वाचला.
वास्तविक पाहता पूर्वी दामू अण्णा पवार आणि आता दीपक पवार यांनी सातत्याने काळे यांच्या या कारभाराला विरोध करत कारखान्यांमध्ये सत्ता परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला परंतु काळे परिवाराने ' गावकी ,भावकी, जवळकी' च्या नात्याने गुंफलेली कारखान्याची ही वीण त्यांना आजपर्यंत उसवता आली नाही.
सभासदाच्या हिताचे असलेले अनेक मुद्दे जनतेला पटायचे परंतु कधी गणगोताच्या , नाती_ गोतीच्या भावनेने सातत्याने सभासदांनी काळे परिवारालाच कौल दिला.
#निष्क्रियतेची_25_वर्षे
वास्तविक पाहता कल्याणराव काळे हे चेअरमन होऊन आज 25 वर्षे झाले . परंतु कर्जमुक्ती , ऊस उत्पादकांना दर , वेळेत हप्ता याबाबत कधीही या कारखान्याने प्रगतीची एकही पायरी चढली नाही.
ज्यावेळी विठ्ठलच्या घुसळणीतून वर आलेले सिताराम चे लोणी कल्याणरावाना टिकवता आले नाही तेव्हाच त्यांची साखर कारखाना चालविण्याबाबतची ' संकुचित बुद्धी ' समजून आली होती . परंतु केवळ काळे यांचा वारस म्हणून सभासदांनी त्यांच्यावरती दीर्घकाळ विश्वास ठेवला.
त्यांच्यासोबत वाटचाल करीत असलेले विठ्ठल राव शिंदे साखर कारखाना , त्यांच्याच परिवारातील असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना , पांडुरंग सहकारी चे एक्सपान्शन अशा अनेक कारखान्यांनी प्रगती साधली.
विठ्ठल च अवस्था तर चंद्रभागे पेक्षाही वाईट होती . अभिजीत पाटील यांच्या बद्दल कितीही वाद विवाद झाले तरी सगळ्या संकटावर मात करून त्यांनी हा कारखाना चालू केला . नव्याने गाळप करता झाला. त्यामुळे यातून त्याची सक्रियता आणि कर्तुत्व सिद्ध होते. त्याच वेळेस मात्र सहकार शिरोमणी साठी हीच सगळी संसाधने , ऊस क्षेत्र, सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा असताना देखील हा कारखाना केवळ अधोगती करत गेला.
#अधोगतीचे_त्रिकूट
या सातत्यपूर्ण अधोगतीचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कल्याणराव काळे यांचा अत्यंत संशयी स्वभाव , सहकारी संचालक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवरील अविश्वास आणि मूळतः साखर कारखाना चालवण्याबाबतची ' असमंजस बुद्धी' .
जेव्हा विरोधक कल्याणराव काळे यांना कारखान्यातला काही कळत नाही असे म्हणत होते , त्यावेळी लोकांनी त्यांना राजकारणासाठीचे विरोधक ठरवले . परंतु आज पंचवीस वर्षानंतर खरोखरच या नेतृत्वाने या कारखान्याची , त्या सभासदांची, ऊस उत्पादकांची आणि त्यांच्यावर विश्वास ठेवलेल्या पाहुण्या _ रावळ्यांची किती अधोगती केली आहे , हे समोर येते.
गेल्या दहा वर्षापासून कारखान्याला एच एन टी म्हणजे वाहन, टोळी ऍडव्हान्स अशा खर्चासाठी जी कर्ज मिळत होते , ते देखील अनेक संस्थानि नाकारले आणि तेथूनच या कारखान्याच्या अधोगतीला सुरुवात झाली .
काळे यांच्यावर सभासदांनी ठेवलेल्या विश्वासाचा जसा घात झाला तसाच प्रत्येक राजकीय नेत्याचा , त्यांच्या पक्षाचा आणि आर्थिक संस्थांचा झाला आहे . सातत्याने जो सत्ता स्थानावर आहे त्याच्या पायऱ्या झीजवायच्या , 5/ 25 हजार मतांची बेगमी करायची आणि कारखान्याला मदत आणायची हे त्यांनी गेल्या दोन दशक भर केले.
जो ज्येष्ठ सभासद , जेष्ठ ऊस उत्पादक कारखान्याच्या भल्याच्या हिताच्या चार गोष्टी सांगतो त्याला पुढच्या संचालक मंडळातून डच्चू देण्याचा त्यांनी प्रघात पाडला .
प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील सातत्याने अविश्वास दाखवला .वाडी कुरोलीचे दोन अधिकारी जर सोडले तर कोणाच्याही हातामध्ये सहकार शिरोमणीच्या कारभाराबाबत कल्याण काळे यांनी विश्वासार्ह चर्चा केली नाही .. त्यामुळे कोणाचेही शहाणपण या कारखान्यात कधी चालले नाही. कल्याण काळे आणि ह्या दोन अधिकाऱ्यांनी _ अशा त्रिकूटाने या कारखान्याची त्रेधा तिरपीट केली असे आता सभासद सांगत आहेत.
ाबाकीचे_राजकारण
ज्यांनी कारखाना उभारणीमध्ये खांद्याला खांदा लावून लढा दिला , त्या सगळ्यांचे राजकीय खच्चीकरण कल्याणराव काळे यांनी केले. सुरेश दाजी बागल . बाळासाहेब देशमुख. कौलगी अण्णा , दामू अण्णा , पंडित भोसले . हिम्मत आसबे , गोरख तात्या ताड , तावशी चे यादव . नागणे सर अशा अनेक निष्ठावंतांना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला .
आज कृष्णात पुरवत , नागणे सर , मुकुंद देवधर हयातीत नाही . पण यांच्या सहकार्यामुळेच स्व. वसंतदादा हे धाडस करू शकले. या सगळ्यांना कल्याणरावांनी दूर लोटले , अशी चर्चा आहे त्यामुळे ते अखेरच्या क्षणी खट्टू होते .
इतकेच नव्हे तर ज्या शिवसेनेमुळे चंद्रभागा कारखान्याचे निर्मिती झाली , त्या शिवसेनेच्या नेत्यांना कारखान्यामध्ये प्रवेश होऊ द्यायचा नाही हा निर्णय जणू काही घेतल्यामुळे अनेक शिवसेनेचे नेते नाराज झाले . संभाजी राजे शिंदे , दत्ता भोसले हे देखील त्या कारखान्याच्या पायरीचे दगड होते .
वजाबाकीचे राजकारण करत अनेकांचे सभासदत्व रद्द केले , त्या संचालकांनी विठ्ठल कडे ओढा घेतला. काहींनी बबनदादा शिंदेंकडे घेतला . ऊस बंद केले . त्यामुळे परिणामी कारखान्यालाच त्याचे नुकसान झाले. कै. वसंतराव काळे यांनी सतत बेरजेचे राजकारण केले. त्याचे नेमके उलटे राजकारण कल्याण रावांनी केले.
#पाहुणे_ रावळे देशोधडीला लावले
कल्याणराव काळे यांना सभासदांपेक्षा देखील त्यांच्या घरच्यांनी , मोलाची साथ दिली . अनेक पाहुणेरावळे , गावकी , मित्र मंडळी , साखर व्यापारी अशा अनेकांची साथ घेऊनच कल्याण काळे यांनी वाटचाल केली . परंतु प्रत्येक पायरीला प्रत्येकाच्या डोक्यावर पाय देऊन त्यांनी यशाची शिखरे चढण्याचा प्रयत्न केला.
' आमच्या सगळ्यांच्या जमिनी गहाण ठेवल्या , सिबिल खराब केले ' अशी ओरड आता गणगोता मध्ये सुरू आहे. आज या कारखान्याला मदत करणारा एकही घटक राहिला नाही.
#बदलत्या_निष्ठेचा_विक्रम
या महाराष्ट्रात कल्याण काळे यांनी जितके पक्ष बदलले तितके कोणीही बदलले नसतील. पक्षप्रवेश करायचा , सत्ताधाऱ्यांकडून फंड्स मिळवायचे हे त्यांचे रुटीन आहे . त्यांनी आठ वेळा पक्ष बदल केले . कधी तिकिटाच्या बेगमीवर , कधी उमेदवाराला मदत करायची म्हणून तर कधी सभासदांच्या नावावर सतत पक्ष प्रवेश केले . पैसे आणले . दीपक पवार यांनी दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार , गेल्या पाच वर्षात कारखान्याला तब्बल 900 कोटी रुपये मिळाले आहेत . कुठे गेले हे 900 कोटी ? इतर जबाबदाऱ्या पार पाडत असताना कायम शेतकऱ्याना पैसे देण्याच्या बद्दल पाठीमागे ठेवले. कधीही शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका व्यक्तिशः कल्याण काळे आणि त्यांच्या संचालकाने घेतली नाही. आलेलेे पैसे वाडीच्या _ भाळवणीच्या शिवारापर्यंत पोहोचायच्या आधीच पुण्यातील मोहम्मदवाडीच्या बंगल्यात त्याची ' वाटणी ' संपून जायची. अशी चर्चा होत होती. आणि हे आता सर्वच पक्षांच्या नेतृत्वांना माहीत झाले आहे.
#अजित_पवारांची_नाराजी
अनेक पक्ष फिरल्यानंतर शेवटी आज कल्याण काळे अजित पवार यांच्या वळचणीला गेले आहेत. आणि ही कल्याण काळे यांची सर्वात मोठी चूक आहे . कारण अजित पवार हे वास्तववादी नेते आहेत . ते कधीच भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेत नाहीत . भेटायला आलेला समोर दारात बघितला की , कशा करता आलाय? किती रुपया करता आलाय ? याने मागे काय माती खाल्ली ? पुढे ह्याला काय घोळ घालायचेे आहेत .... दादांच्या चाणाक्ष नजरेत याचे एका क्षणात स्कॅनिंग होते.
मदतीची जाण नसेल आणि त्याचे काही आउटपुट मिळत नसेल तर किती वेळा मदत करायची ? हे अजितदादा यांचेच शब्द आहेत. मागील मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच्या उपसमितीत राजगड , छत्रपती सहकारी याच्यासह अनेक कारखान्यांच्या आर्थिक मदतीचे विषय होते . सहकार शिरोमणीचाही प्रस्ताव होता . तो प्रस्ताव थांबवला गेला हे विश्वसनीय वृत्त आहे . सोलापूर जिल्ह्याचा विषय चर्चेला आल्यानंतर या समितीमध्ये केवळ माळशिरस च्या शंकर सहकारी ची चर्चा झाली. सर्व कारखाने मागे ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
कल्याणराव काळे यांच्यावरती आज कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे कदाचित हा कारखाना कुठल्यातरी बड्या उद्योगपतीला द्यायचा आणि पुन्हा काही कोटी एकत्रित करत राजकारण करत बसायचे हा त्यांना सुचलेला शेवटचा पर्याय दिसत असावा. परंतु ते या कारखान्याचे मालक नाहीत , विश्वस्त आहेत हे ते विसरले.
मध्यंतरी एका नेत्याबद्दल जिल्ह्यात खूप चर्चा होत होती. ते नेते ज्या पक्षात गेले त्या पक्षाची सत्ता गेली म्हणून समजा. हे असे पंधरा वर्षे घडत असल्यामुळे आजही प्रदेश काँग्रेसच्या वर्तुळात ' छोटा पप्पू ' म्हणून कोण प्रसिद्ध आहे याच्या सुरस चर्चा ऐकायला मिळतात.
#राजकीय_आत्महत्या
सहकार शिरोमणी कारखाना हा खाजगी उद्योजकाला देणे म्हणजे स्वर्गीय वसंतराव काळे यांच्या वारसदारीची राजकीय आत्महत्या ठरेल. दादांच्या निष्ठावंत शिलेदारांना हे मान्य होणारे नाही. कार्यक्षमता नसेल तर कितीही मोठी वारसदारी असली तरी ती संपून जाते . आज औदुंबर अण्णांनी खऱ्या अर्थाने जे विकासाचे साम्राज्य सुरू केले होते , त्यांचा फोटो केवळ औपचारिकता म्हणून राहिला आहे . स्वर्गीय वसंतदादांचे तसे होऊ नये , त्यांच्या स्मृती त्यांच्या साम्राज्याच्याच रूपाने जिवंत रहाव्यात. ही सभासदांची इच्छा आहे.
#पर्याय_काय ?
जो भावकी , गावकी संभाळू शकत नाही तो कारखाना काय चालवणार ? अशा प्रकारची कठोर टीका आज कल्याण काळे यांच्यावरती होत आहे. आता ही लढाई सभासदांची राहिली नाही तर आधी ती भावकीतून सुरू झाली आहे . आपलाच कुटुंबकर्ता निष्क्रिय असल्याची जाणीव सगळ्या भावकीला झाली आणि तिथून खरी खदखद सुरू झाली आहे.
कल्याण काळे यांनी आता केवळ राजकारण करावे आणि हा कारखाना भाऊबंदकीतील कर्तृत्ववान सहकार्यांना संभाळयला द्यावा असाही एक सूर उमटत आहे. समाधान काळे यांना प्रोजेक्ट करण्याचे काम या निमित्ताने सुरू झाले आहे.
एक वेळ अभिजीत पाटील आणि समाधान काळे दोघांनी मिळून कारखाना चालवावा पण सभासदांची ही हालअपेष्टा थांबवावी , असा प्रामाणिक सूर स्वर्गीय वसंतरावांचे नेतृत्व मानणाऱ्या आणि काळे घराण्याशी निष्ठावंत असणाऱ्या वर्गातून निघत आहे.
विशेषतः अजित पवार यांच्या देखील नजरेत समाधान काळे यांचे नेतृत्व नव्याने आले आहे . कल्याण रावांचे नेतृत्व बाजूला झाल्याशिवाय अजित दादांसारखा चोखंदळ माणूस या कारखान्याला मदत करू शकणार नाही . हा राष्ट्रवादी काँग्रेस मधीलच सूर आहे.
एक तर समाधान _ अभिजीत यांचे नेतृत्व पुढे आणावे अन्यथा दीपक पवार यांच्या नेतृत्वाखालील ' नव्या सोंगट्यांना पट ' उपलब्ध करून द्यावा , तरच स्व. दादांचे नाव चिरंतन राहील , हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल .
- अनिरुद्ध बडवे
[email protected]