26/09/2025
मायबाप सरकार...
शेतकर्यांना भीक नको मदत द्या !
मराठवाड्यात पावसाने थैमान घातले. या अतिवृष्टीमुळे विशेषतः धाराशिव, सोलापूर, बीड जिल्ह्यातील बळीराजा रात्रीत उध्वस्त झाला. पुराच्या पाण्यात पिकं वाहून गेली, नाका तोंडात पाणी जाऊन दुबती जनावरं दावणीला मेली आणि एका क्षणात संसाराचं होत्याचं नव्हतं झालं. आता सुरु झाल्यात नेत्यांच्या पर्यटन यात्रा, बांधावर फोटो सेशन करायचं आणि टिव्ही चॅनेल, पेपरात बातम्या छापून प्रसिध्दी मिळवायची. तुम्ही बांधावर जाऊन पाहणी जरूर करा, पण त्यांना सढळ हाताने मदत देण्याची प्रक्रिया तातडीने राबवा. आणि यंदा तरी शेती मालाला हमीभाव द्या. आहो आमचा शेतकरी इमानेइतबारे काळ्या आईशी निष्ठा राखून देशाला धान्य पिकवून देतोय आणि त्याच शेतक-याने पिकविलेल्या मालाचा कवडीमोल भाव करून त्याची थट्टा केली जाते. हे आता सहनशीलतेच्या पलीकडे जात आहे, याचा विचार आपण करावा.
सायोबीनला हमीभाव देण्याची घोषणा आपण सत्तेत येण्यापूर्वी केली होती, मुख्यमंत्री साहेब. आज जवळपास दहा वर्षे राज्यात आपली सत्ता आहे, आणि आपण सत्तेच्या सिंहासनावर विराजमान आहात. तरीसुध्दा आपण शेतक-यांना दिलेला शब्द पाळू शकला नाही. सोयाबीन, हरभरा, कापूस यासारख्या महत्वाच्या पिकांना वर्षानुवर्षे आपण हमीभाव नाकारत आला आहात. हमीभाव जरी जाहिर केला तरी तो बाजारात शेतक-यांना मिळत नाही. व्यापा-यांचे साटेलोटे आणि बाजार समित्यांतील राजकीय हस्तक्षेपामुळे योग्य भाव न मिळाल्यास शेतकरी देशोधडीला लागणार नाही तर काय होणार ? ही भ्रष्ट साखळी जोपर्यंत तुटत नाही, तोपर्यंत शेतकर्यांचे भले होणार नाही, हे अलिखित सत्य आहे.
साहेब.. अतिवृष्टी, पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्ती ओढावल्यावर मदतीची प्रक्रिया वेळेत राबविली जात नाही. पंचनामे उशिरा होतात. मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, पण प्रत्यक्ष मोबदला अपुरा ठरतो आणि तोही शेतकऱ्यांच्या हातात वेळेवर पोहोचत नाही. ई-कृषी किंवा इतर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया शेतकऱ्यांना नीट समजत नाही, तरीही ती सक्तीची केली जाते. पीकविमा योजनेत तर वारंवार गैरप्रकार समोर येतात. शेतकऱ्यांनी वेळेवर हप्ते भरले, तरी नुकसानभरपाई वेळेवर मिळत नाही. त्यामुळे हा सगळा प्रकार केवळ विमा कंपन्यांचा गल्ला भरण्यासाठीच आहे का, असा संशय वाटू लागला आहे.
सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला जातो, पण त्यावेळी अपात्र लोकही त्याचा लाभ घेतात. उलट खरे लाभार्थी स्थानिक पुढाऱ्यांच्या दबावाखाली येऊन मदतीपासून वंचित राहतात. कर्जमाफी वेळेवर दिली जात नाही; झालीच तर ती निवडक लोकांपुरतीच मर्यादित राहते. या सगळ्या अन्यायातून निर्माण होणारे नैराश्य आणि विवंचना शेतकऱ्याला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलायला भाग पाडते. सरकारकडून योग्य मदतीऐवजी केवळ आकडेवारीची झाकपाक केली जाते. कितीही शेतकऱ्यांचे बळी गेले तरी ‘मायबाप’ सरकारला ते जाणवत नसेल, हे शेतकर्यांचा उपयोग निवडणुकीत मते घेण्यासाठी करणार का ?
पूरग्रस्त भागात सध्या रस्ते आणि वीज यांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पुनर्बांधणीचे काम युद्धपातळीवर करणे आवश्यक आहे. शेतकरी आणि पशुपालन व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, हाताला आलेले सोयाबीन पुरात वाहून गेले आहे. कांदा पाण्यावर तरंगत आहे, तर फळबागाही पूर्णतः नष्ट झाल्या आहेत. पाण्यात वाहून गेलेल्या शेतीची पुनर्बांधणी करणे अशक्य झाले आहे. यासोबतच पशुधनासाठी आर्थिक सहाय्य करण्याची गरज आहे, आणि दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय पुन्हा उभा करणेही आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागातील पंचनामे प्रामाणिक अधिकाऱ्यांकडूनच केले जाणे अत्यावश्यक आहे.
नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करताना कोणतेही निकष लावणे योग्य ठरणार नाही. नैसर्गिक आपत्ती घोषित करून बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई दिली, तरच ते या संकटातून कसेबसे सावरू शकतील. यासाठी गावपातळीवर कृषी अधिकारी, तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी सुसंवाद होणे अत्यावश्यक आहे. तसेच, तक्रार निवारणासाठी स्वतंत्र समिती गठित करावी लागेल. फोटोसेशन आणि घोषणाबाजीवरच समाधान न मानता प्रत्यक्ष शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करण्याची हीच खरी वेळ आहे—याचे भान सरकारने ठेवणे गरजेचे आहे.
उपमुख्यमंत्री साहेब.., आपण म्हणता की पैशाचं सोंग करता येत नाही. मग लाडकी बहिण योजना किंवा महिला सन्मान योजना सुरू करताना हा विचार का केला नाही ? महिलांचा सन्मान झालाच पाहिजे. पण, आज शेतकऱ्यांवर वेळ आली की मात्र आपण विपरीत भूमिका घेता. एकदा नाही, तर तब्बल दोनवेळा शेतकरी कर्जमाफीच्या विषयावर आपण “पैसे नाहीत” असे सांगितले. शेतकऱ्यांना मदत करण्याची वेळ आली की सरकार वारंवार मागे का हटते, हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही असे समजू नका. शेतकरी खुळा नाही. तो आपल्या हक्काची मदत मागतो आहे, भीक नाही.
- अमोल शित्रे
#मराठवाडा_पूरसंकट
#शेतकरी_वाचवा
#हक्काची_मदत_हवी
#सरकार_जागे_हो
#बळीराजा_आव्हानात
#नुकसानभरपाई_आता
#शेतकरी_आत्महत्या_थांबवा
#आकडेवारी_नको_मदत_हवी
#कर्जमाफी_वाचा
#काळ्या_आईचा_पुकार