
01/08/2025
विद्याने सांगितला कटू अनुभव
अ भिनेत्री विद्या बालन हिने नुकताच आपल्या बॉलीवूडमधील वीस वर्षांचा प्रवास पूर्ण केला असून, या विशेष टप्प्यावर तिनं तिच्या सुरुवातीच्या काळातील कटू अनुभव शेअर करत इंडस्ट्रीतील दुटप्पीपणावर भाष्य केलं. २००५ साली आलेल्या 'परिणीता' या सिनेमातून तिनं अभिनय क्षेत्रात दमदार पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटानं तिला घराघरात पोहोचवलं; परंतु या यशामागे एक अनोखा आणि अस्वस्थ करणारा अनुभव लपलेला होता. एका विशेष मुलाखतीत ती म्हणाली, "मी कोणत्याही फिल्मी घराण्यातून आलेली नव्हते; पण 'परिणीता'मुळे माझं आयुष्यच बदललं. मला ग्रँड लॉन्च मिळालं, हे खरंच भाग्य होतं; पण त्याच वेळी इंडस्ट्रीमध्ये मला सतत मुलगीच का दाखवायचे, याचा अजब दबाव होता." विद्या पुढे सांगते की, "मी २६ वर्षांची प्रौढ स्त्री होते. मी मुलगी नव्हते. तरीही मला लहान आणि नवखी नायिका असल्यासारखं सादर केलं जात होतं. मी प्रयोग करायला तयार होते; पण हे सगळं त्रासदायक वाटू लागलं." तिच्या मते, अभिनयाच्या दुनियेत वय लपवण्याची प्रथा ही केवळ महिला कलाकारांवरच अधिक लादली जाते. ती म्हणाली, "मी फिल्म मॅगझिन्सवर मोठी झालेली नाही, पोझ देणं मला जमत नव्हतं. माझं सगळं लक्ष अभिनयावर होतं. आंतरराष्ट्रीय मासिकं काय असतात हेही मला माहीत नव्हतं." तिच्या या वक्तव्यातून स्पष्ट होतं, की ग्लॅमरच्या आड लपलेली कृत्रिमता तिला कधीच मान्य नव्हती.
Vidya Balan #ऐकताय_ना