19/01/2025
मुंबई -१७ जानेवारी २०२५.
#सचिन_मोटे यांना वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा.!
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्राचे निर्माते-दिग्दर्शक आणि लेखक
जन्म- १७ जानेवारी १९७३.
सचिन मोटे हे साताऱ्याचे.पिढीजात वडिलांचं किराणा मालाचं दुकान असलेल्या सचिन मोटे यांच्या घरांत नाटक-सिनेमाविषयी पोषक वातावरण होतं. लहानपणापासून सचिन यांना गोष्टी सांगायचं खूप वेड होते. शाळेत असताना शिक्षक सचिन यांना गोष्ट सांगायला लावायचे. पुढे मालिका लिहिताना ही सवय त्यांना उपयोगाला पडली.
सचिन यांच्या मामांना पण चित्रपटाची आवड,ते नेहमी सांगत सचिन तू चित्रपट क्षेत्रात जा,त्याचं रीतसर शिक्षण घे पण घरच्यांना त्यांनी बी.फार्म करावे व सातार्यात मेडिकल स्टोअर सुरू करावे. त्या साठी त्यांनी कोर्ससाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला. एक वर्षाच्या कोर्ससाठी महाविद्यालयात असताना त्यांनी एका एकांकिकेत भाग घेतला आणि सचिन यांना आवड निर्माण झाली. मोठ्या भावाने त्यांना प्रोत्साहन दिले आणि पुण्याला पाठवले. बी फार्मचा एक वर्षाचा कोर्स झाल्यावर सचिन पुण्यात एक मेडिकल स्टोअरमध्ये नोकरी करू लागले आणि तिथे त्यांना संध्याकाळी नाटकांच्या ग्रुप्समध्ये काही ना काही करायची संधी मिळाली. त्याचबरोबर सचिन यांनी पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात वि. भा. देशपांडे यांचा नाट्यप्रशिक्षणाचा कोर्स केला. त्यामुळे सचिन यांना उमेद मिळाली आणि त्याच वेळी महाराष्ट्र कलोपासक संस्थेने सत्यदेव दुबें यांचे शिबिर आयोजित केले होते, ती तिन्ही शिबिरे सचिन यांनी पुर्ण केली. या मुळे सचिन व्यक्त होऊ लागले. पुण्यात बर्यापैकी स्पर्धा, एकपात्री वगैरे करत असताना अचानक त्यांच्या मामांचे निधन झाले त्यामुळे ते सातार्याला परतले आणि वडिलांच्या किराणा मालाच्या दुकानात काम करू लागले. तिथे त्यांचा जवळचा मित्र नितीन दीक्षित यांनी सचिनला त्यांच्या नाट्यसंस्थेत येणार का विचारले. त्याच उत्साहाने सचिन त्यांच्या नाट्यसंस्थेत गेले, तर तिथे नितीन आणि सचिन असे दोघेच त्या संस्थेत होते. आणखी दोघे त्यांना नंतर मिळाले, अशी चौघांची नाट्यसंस्था झाली आणि त्यातून त्यांनी बर्यापैकी एकांकिका-नाटके करायला सुरुवात केली. सचिन यांचे किराणा मालाचे दुकानात नाटकाच्या रिहर्सल चालायच्या. पुढे नाटकातून धंद्यात लक्ष जाईना, मग दोन-तीन वर्षांनी सचिन यांनी आपल्या बंधूना सांगून काही जमलं तर ठिकाय, नाहीतर परत येईन या बोली वर वर्षभरासाठी मुंबईत आले. त्यावेळी पुरुषोत्तम बेर्डे, विनय आपटे, विजय केंकरे, वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे अशी नावे मुंबईत गाजत होती, पुरुषोत्तम बेर्डे यांनी विजय केंकरे यांना फोन लावून सांगितले सचिन मोटे या मुलाला पाठवतोय, तुझ्या नवीन नाटकात बघ कुठे अॅडजस्ट होतोय का…’ सचिन मोटे त्याला जाऊन भेटले, एकाला एक लागून सचिन मुंबईत नाटकांत काम करू लागले. दरम्यान लेखक व्हायचं ठरवलेलं नसतानाही सचिन अधूनमधून लिहीत राहिले. ते नाटक किंवा संवाद रूपातच. प्रेमभंग झाल्यावर आपल्याकडे कविता लिहिण्याची पद्धत आहे पण त्याही वेळी सचिन यांनी एकांकिकाच लिहिली होती. पुढे काही वर्षांनी ‘एक डाव भटाचा..हे नाटक आले. त्याचे लेखक होते सचिन मोटे व दिग्दर्शक त्यांचे मित्र सचिन गोस्वामी. पुढे त्या दोघांनी ‘एक डाव भटाचा’ नाटकावर आधारित ‘मस्त चाललंय आमचं’ हा मराठी सिनेमाही केला.त्यानंतर हे नाटकाचं माध्यम बदलून त्यांनी टेलिव्हिजन माध्यमात प्रवेश केला.
पुढे सचिन मोटे यांनी गुरू ठाकूर यांच्या सोबत ‘हास्यसम्राट’ लिहीले, तसेच आशिष पाथरे, राजेश देशपांडे यांच्याबरोबर अनेक मोठमोठ्या इवेंट्सच्या स्किट्सचे लिखाण केले. हिंदी मालिकेत सचिन मोटे यांना मोठा ब्रेक मिळाला. ‘आर. के. लक्ष्मण’ या हिंदी मालिकेने सचिन मोटे यांना नाव आणि आर्थिक स्थैर्य दिले. पुढे दुसर्या एक हिंदी मालिकेसाठी सचिन यांनी काम केले, पण कारणाने हिंदी मालिका सोडली.त्याच वेळी पुन्हा त्यांनी सचिन गोस्वामी यांच्याबरोबर ‘आमच्या हिचे प्रकरण’ नावाचे नाटक केले.
वेगवेगळ्या चॅनेल्सची कामे करीत असलेल्या सचिन गोस्वामी यांच्या एकूण कामावर खूश होऊन ‘कलर्स मराठी’ने सचिन गोस्वामी यांना निर्माता होण्याची ऑफर दिली आणि ती संधी सचिन गोस्वामी यांनी न सोडता त्यासाठी एकटा निर्माता न होता स्वत:बरोबर सचिन मोटे यांना सोबत घेतले.सचिन गोस्वामी व सचिन मोटे या दोघांनी मिळून भागीदारीत ‘वेट क्लाऊड’ ही कंपनी स्थापन करून ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ ही स्टँडप कॉमेडी सुरू केली. त्यात वैभव मांगले, विशाखा सुभेदार, समीर चौघुले, नम्रता संभेराव, पॅडी कांबळे, अरुण कदम, अंशुमन विचारे, अतुल तोडणकर वगैरे जबरदस्त कलाकार ‘बुलेट ट्रेन’ गाजवत राहिले… चारशे यशस्वी भागानंतर ती मालिका बंद केली. २०१७ मध्ये सोनी मराठी हे नवे चॅनल सुरू झाले आणि त्यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांना घेऊन सुरू केली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बघता बघता प्रचंड लोकप्रिय झाली.मराठी रसिक तर ही ‘हास्यजत्रा’ परत परत बघतातच, पण साक्षात अमिताभ बच्चनही ती बघतात आणि त्यातल्या कलाकारांना भेटायची इच्छाही प्रकट करतात. लतादीदीही हा कार्यक्रम पाहायच्या हे कमालच.
सुरुवातीपासून लोकप्रिय असलेला हा कार्यक्रम लॉक डाऊनच्या तणावपूर्ण काळात प्रेक्षकांसाठी आनंदाचा ठेवा ठरला.कोविड काळात अस्वस्थ असलेल्या लोकांना, रुग्णांना, कोविड योद्ध्यांना, डॉक्टर्स, कर्मचारी, पोलीस अशा अनेकांना या कार्यक्रमाने दोन घटका रमवले हसवले. नुकतीच सोनी मराठीवर सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या लेखक-दिग्दर्शक जोडीची वेगळ्या विषयाची आणि धाटणीची 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' ही नवीन मालिका चालू झाली आहे.