08/07/2026
आई-बाबांचा संघर्ष आणि आपला खोटेपणा
"कधीकधी रात्रीच्या शांततेत, जेव्हा शहरातल्या या चार भिंतींच्या खोलीत मी एकटा बसतो, तेव्हा डोळ्यांसमोरून अनेक प्रश्न सर्रकन निघून जातात. आपण ज्या पैशांच्या, करिअरच्या आणि तथाकथित मोठ्या स्वप्नांच्या मागे आपलं हक्काचं घरदार सोडून एवढं धावतोय, तो पैसा शेवटी आपल्याला नक्की काय देणार आहे? माणसाला आयुष्यात स्थैर्य हवं असतं, पण ते मिळवता मिळवता ज्यांच्यामुळे आपण या जगात आलो, त्यांनाच आपण मागे सोडून देतो, हे किती मोठं दुर्दैव आहे. परवा रविवारी सुटी होती, म्हणून खोलीतलं जुनं कपाट आवरत होतो. अगदी कपाटाच्या तळाशी एका कोपऱ्यात बाबांचा तो जुना, रंग उडालेला शर्ट आणि शेजारीच आईची ती साधी, जुनी सुती साडी एकत्र घडी करून ठेवलेली दिसली. त्या दोन्ही कपड्यांना हात लावला, आणि नकळत माझ्या काळजात एकदम चर्र झालं. त्या कपड्यांमधून येणारा तो ओळखीचा सुवास थेट माझ्या बालपणात घेऊन गेला.
आठवलं की, माझं भविष्य घडवण्यासाठी, मला एका चांगल्या शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी या दोन माणसांनी स्वतःचं अख्खं आयुष्य कसं पणाला लावलं होतं. मला आठवतंय, लहानपणी जेव्हा कधी गावात मोठा सण असायचा, तेव्हा बाबा माझ्यासाठी आणि आईसाठी हक्काने नवीन कपडे आणायचे. पण जेव्हा मी त्यांना विचारायचा, 'बाबा, तुमच्यासाठी नवीन शर्ट नाही आणला का?' तेव्हा ते नेहेमी हसून म्हणायचे, 'अरे, माझ्याकडे आहेत की जुने शर्ट, हे बघ हा तर अगदी नवा कोरा वाटतोय.' तोच रंग उडालेला शर्ट ते वर्षानुवर्षे वापरत राहिले. आईनेही कधी स्वतःचे नखरे पुरवले नाहीत, नवीन साडीसाठी कधी हट्ट केला नाही. तिने तिच्या फाटक्या संसाराला नेहमी आपल्या पदरामागे लपवून ठेवलं. स्वतःच्या सगळ्या गरजा, आवडीनिवडी त्यांनी हसतमुखाने मारून टाकल्या, पण माझ्या शिक्षणात आणि सुखात मात्र कधीच कोणती कमी पडू दिली नाही.
पण जेव्हा आपण थोडे मोठे होतो, शहरात येतो, चार पैसे कमवायला लागतो, तेव्हा या मोठ्या चकचकीत जगात आणि कॉर्पोरेट लाईफच्या न संपणाऱ्या कामाच्या व्यापात आपण त्यांनाच विसरून जातो. 'खूप काम आहे', 'आज वेळ नाही', 'मी नंतर फोन करतो' ही उत्तरं आपली हक्काची बनून जातात. आपण विसरतो की, गावात दोन वृद्ध डोळे रोज मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत असतात, की कधी माझ्या लेकराचा फोन येतोय आणि कधी मी त्याचा आवाज ऐकतेय. मग एक दिवस अचानक, जेव्हा आपण ऑफिसच्या मिटिंगमध्ये व्यस्त असतो, तेव्हा घरून फोन येतो की, 'आई-बाबांची तब्येत खूप खालावलीये, तू लवकर निघून ये.' त्या एका सेकंदात पायाखालची जमीन सरकते. गळ्यात सुटाचा टाय आणि खिशात क्रेडिट कार्ड असूनही आपण स्वतःला जगातले सर्वात हतबल माणूस समजायला लागतो.
जेव्हा आपण सर्व कामं सोडून धावत पळत त्या जुन्या घरी पोहोचतो, तेव्हा बेडवर खचलेले, थकलेले आई-बाबा आपले डोळे पुसत आपला हात त्यांच्या थरथरत्या हातात घेतात. बाबांच्या डोळ्यात एक वेगळीच भीती असते, तरीही ते खंबीर होत म्हणतात, 'बाळा, शहरात खूप काम असतं का रे? तू खूप बारीक झालास.' आणि आई तिच्या अश्रूंना लपवत विचारते, 'वेळेवर जेवतोस ना रे? हॉटेलचं खाऊन तब्येत बिघडवून घेऊ नकोस.' स्वतः मृत्यूच्या दारात उभे असतानाही, ज्यांच्या शरीरात त्राण उरलेला नसतो, त्यांना काळजी मात्र आपलीच असते. त्या क्षणी डोळ्यातून घळाघळा पाणी येतं आणि एक भयंकर सत्य समजतं की, आपण कमवलेला हा पैसा आपल्याला जगातल्या सगळ्या अलोट सुख-सुविधा, ब्रँडेड कपडे आणि महागड्या गाड्या विकत घेऊन देऊ शकतो... पण आई-बाबांच्या त्या सुरकुतलेल्या हातांची हक्काची माया आणि तो निवांतपणा कधीच विकत घेऊ शकत नाही. वेळ अजूनही गेलेली नाही मित्रांनो, कामाच्या व्यापातून रोज फक्त दोन मिनिटं काढा, पण आपल्या आई-बाबांशी नक्की बोला. कारण जेव्हा ते नसतील, तेव्हा या जगात तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करणारं दुसरं कोणीही नसेल. जर हे 'माझे शब्द' तुमच्या काळजाला स्पर्श करून गेले असतील, तर कमेंटमध्ये ❤️ नक्की टाका आणि आपल्या पेजला फॉलो करा."