26/08/2025
ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांचा आज जन्मदिवस.
समकालीन प्रकाशनाने त्यांची दहा पुस्तकं प्रकाशित केली. अवचटांची आधीची बहुतेक पुस्तकं वर्षभर कुठेकुठे किंवा दिवाळी अंकांमध्ये लिहिलेल्या लेखांमधून तयार झाली आहेत. पण समकालीनसाठी मात्र त्यांनी नव्याने काही पुस्तकं लिहिली. मुक्तांगणची गोष्ट, माझी चित्तरकथा, लाकूड कोरताना आणि माझ्या लिखाणाची गोष्ट ही ती पुस्तकं.. त्यातील माझ्या लिखाणाची गोष्ट या पुस्तकातला एक भाग.. स्वतःच्या आगळ्यावेगळ्या लिखाणाबद्दलचं अवचटांचं स्वगत.
विषय दिसले तसा मी लिहीत गेलो. विषयाला सोईचा होईल असा फॉर्म आपोआप मिळत गेला. तसा मी फार काही पक्क्या विचारांचा, तत्वनिष्ठ वगैरे माणूस नव्हे. एकूण काम ढिसाळ. कशात शिस्त नाही. पण काही बाबतींत मात्र मी फार हट्टी होतो. अजूनही आहे. संपादकाने मला विषय सांगितलाय आणि मी लेख लिहिलाय असं कधी झालं नाही. संपादकाने मला विषय सुचवायचा नाही. ते मी ठरवणार. कसा लिहायचा, किती लिहायचा, हे सगळं त्या लेखाच्या विषयावर ठरणार. संपादकाने माझ्या लेखनात काही बदल करायचे नाहीत, काटछाट करायची नाही. त्याने मला सुचवावं. मला पटलं तर ते बदल माझ्या हाताने मी करेन हवं तर. संपादकाला एकच मुभा- लेख स्वीकारणं किंवा नाकारणं! ही ऐट मी करू शकलो, कारण सुनंदाचा पाठिंबा. इतर पत्रकारांना हा चॉइस नसतो. मी पत्रकार मित्रांना म्हणायचो, “संपादक सांगतो तसं तुम्हाला लिहावं लागतं हे बरोबर. पण महिन्याकाठी किमान एक लेख असा लिहा की जो तुम्हाला सुचला आहे. तो लेख सर्वस्वी तुमचा असेल. कुणाचंही दडपण न मानता अनिर्बंध लिहू लागलात तर तुमच्यातला अंकुर जागा राहील.”
त्या वेळी पुस्तकजगात कथा-कादंबऱ्यांना फार महत्त्व होतं. मला प्रकाशक म्हणायचे, “तुम्ही कथा, कादंबरी लिहा, लगेच पुस्तक काढतो. हे काय लिहीत बसलाय?” काही कथालेखक दिवाळीला 15-20 कथा लिहायचे. त्याचा कंपोज ‘फिरवून' कथासंग्रह काढायचे. तिथे गरिबांच्या जीवनातली असह्य दलदल दाखवणाऱ्या माझ्यासारख्या लेखकाला कोण विचारणार? पण सगळ्यांचाच अंदाज चुकला. ‘पूर्णिया' या पहिल्याच पुस्तकाच्या पाच आवृत्त्या निघाल्या. शासनाचा राज्य पुरस्कारही मिळाला. आता समजतंय, ती ट्रेंड बदलाची सुरुवात होती. कथा-कादंबऱ्यांचा लोकांना कंटाळा येऊ लागला असावा. आमच्यासारखे ‘नॉनफिक्शन' लिहिणारे वाचकांना हवे होते. अनुवादाच्या पुस्तकांचाही खप वाढत होता.
मी हमालांवर लेख लिहिला (तो ‘माणसं' पुस्तकात आहे), तेव्हा तो वाचून माझ्या ज्येष्ठ स्नेही सरोजिनी वैद्य म्हणाल्या, “तू एका कादंबरीचा विषय वाया घालवलास.” मी म्हटलं, “यातनं कादंबरी कशी झाली असती बुवा?” त्या म्हणाल्या, “एक पात्र गुळाच्या गुदामातलं, एक मिरचीतलं, अशी पात्र उभी करून त्यांच्यात ‘इंटरॲक्शन' दाखवायची..”
मला ही कल्पना कशीशीच वाटली. कमालीची कृत्रिम. मी त्यांना म्हणालो, “नाही बुवा जमणार आपल्याला.” त्या म्हणाल्या, “तुझा लेख एकदा वाचला की परत कोण वाचणार? कादंबरी सार्वकालिक आहे. तुझं हे लिखाण अल्पजीवी आहे.” मी म्हटलं, “असू द्या अल्पजीवी. आजची हमालांची परिस्थिती वाचकांपुढे ठेवायची, एवढाच माझा उद्देश आहे. तेवढं काम करतोय की हा लेख.” पण आज पाहतोय, तर 80 सालचं ‘माणसं' चाळीस वर्षांनीही तेवढंच वाचलं जातंय. पुस्तकाच्या आवृत्त्या आजही निघताहेत.
तसाच दुसरा एक प्रसंग. जशा सरोजिनीबाई माझ्या जवळच्या, तसेच विजय तेंडुलकरही. त्यांना मी ओतूरच्या घराविषयी, मागच्या पिढ्यांविषयी सांगत होतो. ते म्हणाले, “तू यावर कादंबरी लिही.” त्यांनाही मी तेच सांगितलं, “ते माझं काम नाही. मला तसं सुचत नाही.” नंतर दरवेळी भेटलो की ते विचारायचे, “कादंबरी कुठवर?” मी तोंड चुकवायचो. एवढा मोठा माणूस म्हणतोय तर लिहू या, म्हणून बसलो; पण कागद कोराच राहिला. मित्र म्हणाला, “तुला तुझा फॉर्म सापडला आहे तर त्यातच लिही. भलत्या फॉर्ममध्ये कशाला अडकतोस?” मग ती रुखरुख जाऊन शांत झालो. नंतर तेंडुलकरांनीही नाद सोडून दिला.
असे आग्रह जवळच्यांकडूनच व्हावेत हा मोठाच योगायोग. सदाशिव अमरापूरकरला मी ‘वाघ्या-मुरळी' या संशोधनातलं काही सांगत होतो. तो हट्टच धरून बसला, मला यावर नाटक लिहून दे. परत माझी माघार. दादापुता. पण तो ऐकेच ना. तो त्या वेळी आय. एन. टी. या ग्रुपमध्ये नाटकं करायचा. त्याने तिथेही जाहीर केलं, “अनिल माझ्यासाठी नाटक लिहितोय.” मग मला कुणी कुणी विचारायचे, “काय, कुठवर आलंय नाटक? किती प्रवेश लिहून झालेत? जसं लिहून होईल तसं आमच्याकडे द्या. आम्ही तालमी सुरूच करतो.” एवढी जवळची, प्रिय माणसं आग्रह करत असतानाही मी त्या दडपणाला जुमानलं नाही.
कवितेपासून मी खूप काळ दूर राहिलो; पण वयाच्या साठीनंतर अचानक कविता सुचू लागली आणि मी कविता लिहू लागलो. कथा, गोष्टी आदी ‘फिक्शन'पासूनही दूर होतो; पण गोष्टीही मला अचानक सुचू लागल्या. त्यातून इतक्या लिहिल्या की त्यांची तीन पुस्तकं झाली. त्यातल्या एका पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. आतून आलं तर लिहिलं जातंच.
आधीचं माझं लिखाण कमालीचं कोरडं होतं. भावनांना मी आसपास फिरकू देत नसे. कारण मला दाखवायचं होतं दाहक वास्तव. मी कॅमेऱ्यामागचा माणूस. त्याने दृश्यात कडमडायचं नसतं. जे लिहितो त्या परिस्थितीवर फोकस. मग त्यात माझं म्हणजे लिहिणाऱ्याचं स्वातंत्र्य काय? तर मी काय दाखवायचं ते ठरवू शकतो. ते कसं, कुठल्या क्रमाने दाखवायचं ती रचना ठरवू शकतो. फक्त जे काही ‘वाटायचं' ते वाचकाला वाटलं पाहिजे. आपणच गळा काढून चालणार नाही. परिस्थिती जितकी भीषण, तितका लेखक अलिप्त, तितकं लिखाण कोरडं हवं. म्हणजे आपल्याला हवा तो परिणाम वाचकांवर होण्याची शक्यता.
याउलट मोर, स्वत:विषयी, आप्त वगैरे लिखाणात मी माझ्या मनातलं वास्तव न्याहाळतोय. जसं बाहेर एक वास्तव आहे तसं आतही आहे. तिथे माझं जगणं, विविध प्रसंगांना झालेल्या माझ्या भावनिक प्रतिक्रिया याही एका वास्तवाचाच भाग आहेत. आधीच्या लिखाणात मी दाखवणारा होतो, आता जे दाखवायचं आहे त्यातही मी आहे. आधीच्या लेखनातली अलिप्तता आता तितकी महत्त्वाची नाही. एकदम ‘मॅटर ऑफ फॅक्ट' असून चालणार नाही. इथे विषयाला काही बंधनही नाही. लहानपणातली एखादी आठवण यायची, पण तिच्या मागचं- पुढचं काही आठवायचं नाही. त्यावर विचार करून थोडंसं दिसायचं, पण ते तेवढंच.
यात लिहिण्यासारखं काही तरी आहे हे जाणवायचं आणि लिहायला बसायचो. लिहिता लिहिता किती आठवायला लागायचं. हे कोण उभं आहे, अंधुक अंधुक... अरे, हा तर आपला ज्ञानू सुतार किंवा माळवे गुरुजी. ते देऊळ दिसलं. त्याचा गाभारा दिसला. तिथला फुलांचा वास आला आणि बाजूच्या निर्माल्याचाही. पलीकडे जमिनीत पक्की बसवलेली मोठ्या परातीएवढी सहाण. त्यावर ठेवलेल्या चंदनाने उगाळून गंध करून कपाळाला लावायचो. त्या गंधाचा वासही इतक्या दूर इतक्या वर्षांनी आला. मला लोक म्हणतात, “तुम्हाला इतकं आधीचं कसं आठवतं? बुद्धी सतेज आहे.” माझं म्हणणं, “लिहायला बसलात तर तुम्हालाही आठवेल.”
या लिखाणाचा मला खूप फायदा झाला. ते लिहिता लिहिता मी स्वत:कडे निरखून बघू लागलो. मागे वळून पाहताना काही गोष्टी नव्याने जाणवू लागल्या. त्या वेळी अमुक एका व्यक्तीला त्रास झाला तर आपण तिच्याशी जाऊन बोललो का नाही? वेळीच आधार देऊ शकलो असतो. का मागे राहिलो? काही घटनांमध्ये तर स्वतःच्या चुकाही दिसू लागल्या. ‘अरेच्या, आपण असं कसं केलं? काय वाटलं असेल त्या माणसाला!' कधी कधी त्या माणसाला भेटून ही उपरती सांगूही लागलो. सुनंदा म्हणायची, “अनिल या तऱ्हेचे लिहू लागलाय ना, तर जास्त हळवा झालाय.” मी आधी स्वत:कडे पाहतच नव्हतो. बाहेरचं पाहण्यात व्यस्त. जेव्हा स्वत:कडे पाहू लागलो तेव्हा अनेक दोष दिसू लागले. आजवर हे दोष दुसरं कुणी दाखवत होतं; पण त्याकडे मी लक्ष दिलेलं नाही. आता ते मलाच दिसू लागले. नाकारायची सोयच उरली नाही.
मधल्या काळात सामाजिक आणि वैयक्तिक असं दोन्ही प्रकारचं लिखाण एकाच वेळी चालू होतं. एक फेज संपली आणि दुसरी सुरू झाली, असं झालं नाही. आता पाहताना असं वाटतंय, की त्यामुळे एकातून उडी मारून दुसरं लिखाण सुरू झालं नाही, तर हळूहळू झालेलं ते अवस्थांतर होतं.
निरनिराळ्या मानवसमूहांवर लिहीत होतो. ते तसंच चालू ठेवलं असतं तर त्याला तोचतोपणा आला असता. स्वत:च स्वत:ला गिरवणं, हा लेखनाचा अंतकाळच. तसं व्हायला नको, अशी आतून जाणीव होत होती. मनात आलं, वास्तवाचं एक रूप पाहिलं. आता वेगळ्या रीतीने ते पाहिलं पाहिजे. त्याच काळात सामाजिक कृतज्ञता शिबिरात सुरेखा दळवीचं छोटंसं पण प्रभावी भाषण ऐकलं. ती कोकणात आदिवासींमध्ये काम करत होती. तेव्हा वाटलं, असे लोकांमध्ये राहून काम करणारे कार्यकर्ते शोधू यात. त्यांचे अनुभव ऐकू यात. ते ज्या प्रश्नांशी झगडताहेत त्या प्रश्नांचा अभ्यास करू यात. त्यातून ‘कार्यरत' हे पुस्तक तयार झालं.
डॉ. अभय बंग, अरुण देशपांडे अशा विविध व्यक्ती आणि त्यांच्या कामावर लिहिलं. कामावर लिहिण्याची मला सवय होती; पण आता कार्यकर्त्यांच्या जीवनात डोकावू लागलो. ठरलेली चाकोरी सोडून हे वेगळ्या वाटेकडे कसे आले? सुरळीत, सुखाचं आयुष्य सोडून हे खडतर, संकटांनी भरलेल्या आयुष्याकडे कसे खेचले गेले? कामाच्या सुरुवातीला तर ज्यांच्यासाठी हे काम करतात त्यांचाही प्रतिसाद नसतो. अशा वेळी यांना एकाकीपण येत असेल का? परत फिरावं, असा विचार येत असेल का?
असे प्रश्न पडत गेले आणि त्यांचा माग घेता घेता लेख आपोआप उलगडत गेला. काम आणि कार्यकर्ते हे दोन्ही भाग त्यात तितक्याच सहजतेने आले. कुठे शैलीचा प्रश्न आला नाही की फॉर्मचा. अभयवरच्या लेखात आदिवासींच्या आरोग्याच्या समस्याही आल्या आणि त्याबरोबर अभय आणि राणीमधलं हृद्य नातंही आलं. अमेरिकेतली मोठी संधी सोडून हे दोघं गडचिरोलीला येतात काय, प्रस्थापितांच्या पैसे खाण्याच्या संधी गेल्यामुळे यांच्यावर कसले कसले आरोप केले जातात काय, सगळंच आश्चर्याचं. अरुणसारखा स्वतंत्र, सर्जक बुद्धीचा संशोधक पाश्चात्त्य जगात जन्मला असता तर केवढ्या संधी मिळाल्या असत्या! त्याने निर्मिलेली जगावेगळी यंत्रं पाहून समाजाने डोक्यावर घेतलं असतं. इथे मात्र अरुणच्या पुढ्यात ओढवून घेतलेल्या नाना अडचणी, पत्करलेलं दारिद्य्र आणि जीवनभर उपेक्षाच उपेक्षा.
या सगळ्यांनी मला केवढं वेगळं जग दाखवलं!
लिहिण्याविषयी लिहायचं ते लिहून झालं. हे माझं लिखाण काही आवर्जून लिहिलेलं, काही नकळत आलेलं. काहींमध्ये दोन्ही तऱ्हेचं लिखाण मिसळून गेलेलं. हे साहित्य आहे, असाही माझा दावा नाही.
मध्यंतरी युनिक फीचर्सने मला त्यांच्या मराठी ई-साहित्य संमेलनाचा अध्यक्ष केलं होतं. त्यावर एकाने टीका केली, “त्या लायकीचं अवचटांचं लिखाण नाहीच, तर यांना हे पद का दिलं?” कुणी मला म्हटलं, “याला उत्तर द्या.” त्यांना मी म्हटलं, “ते म्हणतात ते बरोबरच आहे. नुसतं तेच नव्हे, तर माझं लिखाण कसल्याच लायकीचं नाही. मी लिहिलेल्या लिखाणाला कोणी साहित्य म्हणालं तर तो उगाचच गौरव. मला साहित्यिक समजू नका आणि लिखाणाला साहित्य समजू नका.” हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे.
माझी पुस्तकं मी क्वचितच वाचली असतील. स्वतःचा लेख छापून आल्यावरही मी सहसा तो पुन्हा वाचायला जात नाही. कधी वाचायला घेतलाच तर दोन-चार वाक्यं वाचून फेकून देतो. इतकं बोअर लिखाण मी वाचकांसमोर ठेवतोय? काय म्हणत असतील लोक मला! लहानपणापासून हा न्यूनगंड आहेच माझ्यात रुजलेला. पण हळूहळू लेख आवडल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागतात. काही लोक भेटून सांगतात, काही नुसते हात हातात घेऊन उभे राहतात. त्यांना मी लिहिलेलं आवडल्याचं त्या स्पर्शातून मला कळत असतं. मला त्यांचं खरोखर आश्चर्य वाटतं. मी कधी पैशासाठी लिहिलं नाही की बक्षिसांसाठी नाही. कीर्ती तर आपसूक येते. त्याला आपण काय करणार?
तरीही काही बक्षिसं माझ्या मनात अजून रेंगाळली आहेत. त्याच्यावर लेख लिहिल्यावर अभय बंग म्हणाला, “आम्ही काम करत होतोच; पण अनिलच्या लेखाने आमचं काम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं. आता आम्ही एकाकी नाही आहोत.” अरुण म्हणाला, “संकटकाळात कुचंबून बसतो तेव्हा तुझा माझ्यावरचा लेख वाचलेला कुणी भेटतो आणि मदतीचा हात पुढे करतो. तुझा लेख म्हणजे माझा पासपोर्ट झालाय. पूर्वीची बंद दारं खटाखट उघडली जातात.” निपाणीच्या तंबाखू कुटणाऱ्या स्त्रिया म्हणतात, “आता अत्याचार करायची मालकाची ताकद हाय काय? त्याने नुसता हात लावला तर त्याला चपलांनी बडवून काढू.” ‘कोंडमारा'मधल्या सत्यभामेला पाच-सात वर्षांनी भेटायला गेलो. मधल्या काळात लेखाने खूप फरक पडला. आता तरुणांची चांगली पार्टी सत्तेत आली. सत्यभामेवरचं दडपण दूर झालं. मला पाहून इतकी आनंदली! तिचं पोर विचारत होतं, “आयव, हे कोन?” ती हळूच म्हणाली, “गप बस. तुजं मामा हायेत.” मला एक बहीण मिळाली. आणखी एका प्रकरणात अन्याय झालेल्या एका तरुणाला लागेल ती मदत केली. पोलिस चौकशी, वकिलाची मदत, सगळं पुरवलं. तरी आम्ही केस हरलो. काही वर्षांनी त्या घरी गेलो. त्याच्या बायकोला, आईला म्हणालो, “आम्ही काहीच करू शकलो नाही. शरम वाटते.” म्हातारी म्हणाली, ‘तवा भावासारखा उगवलासा. लई आधार वाटला.”
सत्यभामा, ही म्हातारी यांना पुढची काही वर्षं भाऊबीज पाठवत राहिलो.
‘माणसं'मधल्या हमालांवरच्या लेखाचं त्यांच्यासमोरच वाचन केलं. एक म्हणाला, “मी धान्यात काम करतो. शेजारी मिरचीचं गुदाम आहे, पण मिरचीवाल्यांचे एवढे हाल असतात हे पहिल्यांदा कळलं.” वार्षिक मागण्यांमध्ये हमालांनी दरवाढीची महत्त्वाची मागणी खालच्या नंबरला टाकली आणि गुदाम सुधारणेचा, अधिक आरोग्यदायक करण्याचा आग्रह धरला. काही सर्वांत खराब गुदामांत काम करायचं नाकारलं. यातही त्या वाचनाचा वाटा.
‘संगोपन' वाचून अनेकांनी कळवलं, ‘मुलांशी कसं वागावं ते कळलं.' किंवा ‘कुठल्या माध्यमाच्या शाळेत घालावं, हा घरात चर्चेचा विषय, त्याचाही निकाल लागला.' ‘सुनंदाला आठवताना' हा लेख वाचून एका ब्रेस्ट कॅन्सर पेशंटने कळवलं, ‘हा लेख वाचून जगायची हिंमत आली. मिस्टरांना वाचायला लावला. म्हणाले, असं जगायचं. त्यातून आमचा ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप तयार झाला.'
. सांगायचं असं, की माझ्या लिखाणाला ललित गद्य म्हणा किंवा आणखी काही, त्याने काही फरक पडत नाही. ते लिखाण लोकांपर्यंत पोहोचतं का, त्यांना त्यातून काही मिळतं का, हा खरा प्रश्न आहे. ते ठरवण्याचं काम वाचकांचं. मला मात्र वाचकांच्या प्रतिक्रियांमधून बक्षीस मिळत राहतं.