11/08/2025
डॉ.शिरीष कुलकर्णी सर म्हणजेच Shirish Smile सर यांनी लिहिलेले हे सुंदर प्रकाशकीय म्हणजे 'अपर्णा' पुस्तकातील एक मोठे बलस्थान...
'अपर्णा' प्रकाशकीय
साहित्यातल्या काही शब्दांची मालकी आत्म्याची असते. शब्द हे केवळ तिथवर जाण्याचे माध्यम ठरतात. जेव्हा एखादी प्रतिभा त्या शब्दांतून प्राण ओतते, तेव्हा त्यातून एक अशी नवसृष्टी आकारते की, जिचा प्रवेश थेट वाचकाच्या हृदयाच्या गाभाऱ्यात होतो. टाळ, मृदंग, डमरू नुसते वाजत नाहीत, तर वाचकांच्या हृदयातून धडधडू लागतात.
मा. भैरवी देशपांडे यांनी लिहिलेली ‘अपर्णा’ ही अशीच एक सर्जनयात्रा आहे. ध्यान, स्मृती, ओढ, वेदना आणि आत्मशोध यांच्या अभंग प्रवाहात अखंडपणे वाहणारी!
‘अपर्णा’ ही पार्वतीची जीवनकहाणी सगळ्या मर्यादांच्या पलीकडे आपल्याशी एकरूप होते. साक्षात पार्वतीच्या अंतःकरणातील चिंतनयात्रेचे दस्तऐवज आपल्या हाती लागतात. लेखिकेने ‘पौराणिक’ घटनांना नव्या जाणिवेचा आणि स्त्रीच्या स्वानुभवाचा गाभा दिला आहे. तिच्या लेखणीतून पार्वती हळूहळू आपली ओळख विसरलेल्या, स्वप्नांतून स्वतःला पुन्हा शोधणाऱ्या आणि अखेर त्याग, प्रेम, तपश्चर्या, समर्पण अशा प्रत्येक आणि कित्येक अवस्थांतून शिवत्वाकडे झेपावणारी एक स्त्री म्हणून उभी राहते.
ही कादंबरी वाचताना आपल्याला काही अनोखे क्षण भेटतात. जिथे आपण काळाच्या पार गेलेलो असतो. तिच्या प्रासादातल्या पहाटेचे वर्णन असो की, हिमशिखरांकडे पाहत पार्वतीच्या मनात उठणारी स्मरणांची लाट असो, लेखिका त्या प्रत्येक दृश्याला इतक्या तन्मयतेने रंगवते की, वाचकही त्या पार्वतीसह त्या हिमालयापाशी उभे असतात. लेखिका जी भाषा वापरते ती अतिशय कोमल आहे; पण तेवढीच विलक्षण ताकदीची आहे. ती नितळ आणि खोल, सखोल आहे. म्हणूनच ‘अपर्णा’ वाचताना वाचकाला शब्द नव्हे, तर भावनांचे, लाटांचे, डमरूंचे आवाज ऐकू येतात.
पार्वती ही प्रत्येक स्त्रीमध्ये दडलेली एक ऊर्जा आहे. जिला तिचे ‘स्व’ गवसायचे आहे, जिला शिवाचा ‘ध्यास’ आहे. ‘अपर्णा’ ही त्या ध्यासाची गोष्ट आहे. हे एका स्त्रीचे आत्मबोधातून आत्मार्पणाकडे जाणारे अस्तित्वप्रवाहाचे सर्जन आहे. यज्ञकुंडामध्ये झेपावणारी सती, ध्यानस्थ होणारी पार्वती, आत्मसंशयाने भरलेली; पण तरीही तपाच्या अग्नित स्वतःला शुद्ध करणारी पार्वती, या सर्व रूपांचा एकच निष्कर्ष आहे, ‘मी कोण आहे?’ याचा शोध!
या शोधयात्रेत लेखिका कुठेही आरती, कीर्तन वा चमत्कारांची मदत घेत नाही. ती पार्वतीला एक सामान्य मुलगी म्हणून उभी करते. जिला स्वप्ने पडतात, जी गोंधळते, जी उत्तरे शोधते, आणि अखेर स्वप्नांतल्या त्या रुद्राक्षधारी, जटाधारी योग्याच्या प्रतीक्षेत स्वतःच एक तपस्विनी बनते. हे करताना लेखिका केवळ तिच्या सौंदर्याचेच नाही तर तिच्या मानसिक सामर्थ्याचेही विलक्षण सुंदर चित्र रंगवते.
‘अपर्णा’ ही म्हणूनच एक स्त्रीच्या अंतःकरणातील आत्ममुक्तीची कहाणी आहे. पार्वतीचा आत्मशोध हा शेकडो हृदयांचा अंतर्ध्वनी ठरते. म्हणूनच ही कादंबरी पौराणिक असूनही अत्यंत जवळची आपलीशी आणि समकालीन वाटते.
यात स्त्रीच्या निवडीला महत्त्व आहे, तिच्या ‘होकारा’ला तितकेच महत्त्व आहे जितके ‘नकारा’ला! आणि तिच्या अंतर्मनातील उत्तरांचा शोध घेताना वाचक स्वतःही अंतर्मुख होतो.
मा. भैरवी देशपांडे यांनी पारंपरिक स्त्रीदेवतेच्या गाभ्याला नव्या अभिव्यक्ती शैलीने स्पर्श केला आहे. त्यांच्या लेखणीला भावनांची नाजूक जाण आहे, शब्दांवर प्रभुत्व आहे आणि प्रत्येक प्रसंगात तत्त्वज्ञानाचा एक मृदुल झराही आहे.
‘अपर्णा’ वाचताना आपण केवळ कथा वाचत नाही, तर एका महान स्त्रीच्या जन्मानंतरही अनेक जन्म चालणाऱ्या प्रवासाचे साक्षीदार होतो.
या ग्रंथाच्या पानोपानी पार्वतीचा ध्यास वाचकांची समाधी होईल आणि साक्षात पार्वतीची समाधी आपल्यातही घडू लागेल आणि तिचा ‘स्व’ शोधताना आपणही कुठेतरी स्वतःच्या आत वळू लागू, हा विश्वास ही कादंबरी प्रकाशित करताना मनामध्ये आहे. संपादक माणिक घारपुरे ह्याही या कादंबरीच्या सहप्रवासी आहेत. लेखिकेचे आणि त्यांचेही मनापासून अभिनंदन!
खरोखर ‘अपर्णा’ ही केवळ कादंबरी नाही, तर ही एक अंतर्प्रेरणा आहे आणि म्हणूनच या दिव्य लेखनप्रयत्नाला माझ्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा!
-डॉ. शिरीष कुलकर्णी