20/10/2024
आजपासून उपलब्ध
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
संपादकीय
सप्रेम नमस्कार! सर्वप्रथम ‘पुणे पोस्ट’चे वाचक, जाहिरातदार, विक्रेते, हितचिंतक यांचे मनःपूर्वक आभार! यंदाचा पुणे पोस्टचा दिवाळी अंक हा बारावा दिवाळी अंक आहे. या काळातील संघर्ष, कष्ट, धावपळ आणि धडाडीने आम्हास खूप काही शिकवले. विशेष म्हणजे आम्ही या अंकासाठी कष्ट-संघर्षाच्या रूपात जितके दिले त्याहून अधिक आम्हास सर्वांकडून प्रोत्साहन, कौतुक, प्रेम आणि सहकार्य लाभले. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यापर्यंत माणसं जोडली गेली. त्यात सर्व स्तरातील, जातिधर्मपंथातील लहानथोरांचा समावेश आहे. त्यामुळेच हा तपपूर्तीचा अंक करताना आमच्या मनात कृतकृत्य झाल्याची भावना आहे. गेल्या अकरा वर्षांत ‘पुणे पोस्ट’ने साहित्य-सामाजिक-सांस्कृतिक विश्वात आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ‘पुणे पोस्ट’च्या अंकामधून ललित साहित्याबरोबरच अनेक सामाजिक विषय, तळागाळातील जनतेचे प्रश्न-समस्यांवर लेखन प्रसिद्ध होते. आपला भवताल जाणून घेऊन तो वाचकांपर्यंत संयतपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणूनच‘पुणे पोस्ट’ची महाराष्ट्रातील अभिजात वर्गात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. वाचकांच्या प्रतिसादामुळे ‘पुणे पोस्ट’ अवघ्या महाराष्ट्रभर भरारी घेण्यात यशस्वी झालं आहे.
यंदा प्रथमच ‘पुणे पोस्ट’च्या दिवाळी अंकात विशेष विभाग समाविष्ट केला आहे. त्याचा विषय आहे -‘शेतकरी समजून घेताना...’. शेतकरी हा हजारो वर्षांपासून समाजाच्या उदरभरणाची जबाबदारी पार पाडत आहे. मात्र जागतिकीकरणाच्या विळख्यात शेती ही दुय्यम-तिय्यम स्थानावर फेकली गेली आहे. औद्योगिकीकरण, संगणकीकरणाच्या युगात तर शेतीची आणि पर्यायाने शेतकर्याची अवस्था खूपच दयनीय झाली आहे. तरीही शेतकरी आपल्या परीने आपले कार्य पुढे नेत आहे. त्याचा संघर्ष तो करतच आहे. मात्र बिकट परिस्थितीत पुढे मार्गक्रमण करणे आता अवघड होऊ लागलेय. परिणामी, शेतकरी आत्महत्या, आंदोलने, आरक्षणाचा प्रश्न गंभीर वळणावर येऊन पोचलेत. त्यातून समाजात दुही, असंतोष आणि द्वेष पसरत आहे. विशेषतः शहरातील समाज हा शेतकर्याकडे शंकित, कुत्सित नजरेतून पाहत आहे. शेतकर्यांच्या आंदोलनाकडे, त्यांच्या मागण्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित, कुत्सित आणि हेटाळणी करणारा आहे. याचाच फायदा घेऊन सरकार आणि व्यवस्थाही शेतकर्यांच्या प्रश्नांना महत्त्व देईनाशी झालीय. शेतीमध्ये प्रगती व्हावी, शेतकरी संपन्न व्हावा, देशातील कृषिउत्पादन वाढीस लागावे असे सरकार आणि व्यवस्थेला वाटेनासे झालेय. याचे दूरगामी परिणामी होऊन एकेकाळचा दूधदुभत्यांचा भारत देश कदाचित ‘अन्नाला महाग’ होईल की काय, असे वाटावी इतकी परिस्थिती बिकट आहे. या सर्वांचा विचार करून ‘शेतकरी समजून घेताना...’ हा विशेष विभाग यंदाच्या दिवाळी अंकात असावा, असे आम्हास वाटले. हे करीत असताना शेतीच्या तांत्रिक विषयांना हात न घालता त्याचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, मानसिक परिप्रेक्षातून सर्वसामान्यांना समजेल अशी मांडणी असणार्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे. त्यातून सर्वसामान्य जनता आणि
शेतकर्यांमध्ये सहसंबंधाचे, आपुलकीचे आणि विश्वासाचे पूल बांधण्याचा आमचा मानस आहे.
आमचा हा मानस तडीस नेण्यात प्रा. मिलिंद जोशी, संपत देसाई, श्रीपाल सबनीस, हेमंत देसाई, कल्पना दुधाळ, संजय परब, हिम्मत पाटील, ऐश्वर्य पाटेकर, ऋ ता बावडेकर, स्वप्नाली अभंग आणि रविप्रकाश कुलकर्णी यांनी विशेष लेख लिहिले आहेत. विषयांतली विविधता आणि लेखकांचे कसब यातून हा विभाग खरोखर वाचकाला नवी दृष्टी देईल. तसेच इंद्रजीत भालेराव यांनी ‘दो बूंद पानी’ या सिनेमाच्या आडून ग्रामीण भागातील पाणीप्रश्नावर प्रकाशझोत टाकला आहे. तो लेख वाचकांनी आवर्जून वाचावा.
त्याचबरोबर या अंकात ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या काश्मीरवरील आगामी कादंबरीचा अंश प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रसिद्ध चित्रकार जे. स्वामीनाथन यांच्यावर ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी लिहिलेला लेख छान जमून आलाय. शिवाय वाचकांच्या आग्रहाखातर नंदू मुलमुले यांचा परदेशी सिनेमावरील लेख याही अंकात आहे. ‘टर्टल कॅन फ्लाय’ या इराणी सिनेमावरील हा लेख आहे. सिनेमा क्षेत्रातील आणखी एक लेख या अंकात आहे तो म्हणजे मधुकर धर्मापुरीकर यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजीत राय यांच्याशी संबंधीत दोन लघुपटांवरील लेख. सत्यजीत राय यांना पसंत करणार्या वाचकवर्गाला आनंद देईल. तसेच अंकात वसंत वाहोकार यांची कथा, चंद्रकांत भोंजाळ यांनी अनुवादित केलेली प्रेमचंद यांची कथा, संजय बोरुडे यांनी अनुवादित केलेली प्रदीप जिलवाने यांची कथा; तर नीती मेहेंदळे यांचे ललीत वेगळा वाचनानंद देतील, अशी आशा वाटते. ‘काव्यस्पंदन’ या विशेष कविता विभागात ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव, केशव सखाराम देशमुख आणि दासू वैद्य यांच्या कविता समाविष्ट केल्या आहेत. तर कविता विभागात ज्येष्ठ-श्रेष्ठांच्या बरोबरीने काही प्रतिभाशील नवोदितांनाही स्थान दिले आहे. एकूणच, तपपूर्तीचा हा अंक वाचकांची यंदाची दिवाळी आनंदाने साजरी करण्यात नक्कीच भर घालेल.
हा अंक पूर्णत्वास येत असताना एक आनंदाची बातमी आली, ती म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची. एखाद्या गोष्टीचं अस्तित्व सिद्ध करायला लागणं हा मानवी विचार-व्यवहारातील अत्यंत हीन प्रकार आहे. त्याला मराठी भाषा इतकी वर्षे तोंड देत होती. मराठीसारख्या इतरही काही भाषा अजून संघर्ष करत आहेत. असो. मराठीला एकदाचं सर्टिङ्गिकेट तर मिळालं. मात्र त्याचा उपयोग पुढील काळात भ्रष्टाचाराचं कुरण बनवण्यात होऊ नये इतकंच वाटतं. बाकी मराठीसाठी खूप काम करायचं आहे. अनेकजण आपापल्यापरीने ते करत होते, करत आहेत आणि करत राहतील. मात्र ही कामं कुठल्यातरी कोपर्यात न होता वादळाप्रमाणे झंझावाती व्हायला हवीत. मराठीविषयी आम्हाला अभिमानानं बोलता-लिहिता-वागता यायला हवं. ते झालं तरच अभिजाततेचा मराठीच्या शिरपेचातील तुरा खुलून येईल. मराठीच्या अभिजाततेच्या लढाईत अनेकांनी प्रयत्न केले. त्या ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांचे व अवघ्या मराठी जनांचे मनःपूर्वक अभिनंदन. पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
- प्रदीप खेतमर | अमृता खेतमर
संपादक