14/02/2026
आर्ष पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित
राजेंद्र जगताप यांचा नवा कवितासंग्रह-
'तू फक्त हो म्हण!'
त्यातली एक कविता खास व्हॅलेंटाईन डे निमित्त.
तू फक्त हो म्हण
तू फक्त हो म्हण
आणि गळून पडतील सहज... सर्व काळकोठड्यांची जुनाट अवजड कुलपं : आपोआप
तू फक्त हो म्हण
आणि येतील रसरसून
नव्या नव्हाळीची गंधभारित अवतरणं
सर्व संबंधांच्या आपसूक गुंतावळ्यातून
होतील सुटी सर्व सकर्मक क्रियापदं
कर्त्यांची कठीण भूमिका पेलतानाही
राहील तळपत
चंद्र-सूर्याच्या साक्षीने...
एक अचल तारा
तुझ्या निरागसपणाची निळी झाक लेवून
तू फक्त हो म्हण
आणि येतील उमलून
श्वासांच्या शुभ्र कळ्या तुझ्या स्वप्नांच्या रक्तिम प्रदेशात
....विलग करून ठेव तू
तुझ्या ओठांच्या इवलाल्या पाकळ्या ....मंद मंद होत
विझत जाणाऱ्या तारसप्तकातील
एकुलत्या चांदणीला... पहाट-पापण्यांची
गर्भार चाहूल
अलगद
अलगद... टिपून घेण्याआधी
तू फक्त हो म्हण
आणि उधळेल चौखूर...
पांढऱ्या शुभ्र आयाळीखालून माझ्या प्रतिभेचा अबलख घोडा सर्व साहित्यिक अरूपांना : काबीज करण्यासाठी
ओथंबू दे भाषेतून
संपृक्त सर्वदूर...
अंतस्थ भावनांचे आषाढी घन उसळू दे
क्षितिज क्षितिज... कवितांचं व्योमाकार काहूर
होऊ दे फितूर... प्रत्येक प्रत्यंचेला
लक्ष्याभोवताली घोटाळणारे : निर्व्याज अहंकार
पाझरू दे मायेतून
स्पर्शाकुल ओलावा
सर्व सुखांच्या सावलीला
येऊ दे निवाऱ्याला...
दुःखार्द्र अश्रूंचा एकाकी किनारा
तुझी भरजरी कूस लेवून
आणि दे शाश्वताच्या अशाश्वतपणाला
भलामोठा... वर्तमानाचा उकार माझ्या प्रत्येक ओळीओळीतून.. तू फक्त हो म्हण
तू फक्त हो म्हण
आणि साकार तू
तुझ्या सलगीचा अक्षत अक्षय आकार
आणि वाहू दे
कवितांचे लक्ष लक्ष साक्षात्कारी दिवे...
तुझ्या पापण्यांच्या आत आत : दडून बसल्या
कल्पांत नदीच्या
अरुंद पात्रातून...
..उडू दे वाऱ्यावर
तुझा सुगंधी वावर
आणि बागड माझ्या अंगाखांद्यावर
हरणाच्या नवजात पाडसागत ...
.. तू फक्त हो म्हण
आणि जाईल उडून भुर्रदिशी... क्षणात एका
तुझ्याच अंग-प्रत्यंगातून
तुझंच एकाकी एकुलतंपण आणि
धो-धो बरसेल... काळाच्या कातळावर
माझ्या शब्दांचा अखंड धबधबा
अव्याहत
अविरत
आणि तरीही मी म्हणेनच तुला... तू फक्त हो म्हण
तू फक्त हो म्हण...
माझ्यासाठी
तुझं असणं हीच एक सुखान्त सावली असते
आणि तुझं नसणं
एक न संपणारी रखरखीत दुपार...
हे गोड चिमुरडी
ऐक... कराल कडेकपाऱ्या लेवून छद्मी हास्य फुलवणाऱ्या डोंगरमाथ्यावरील अरुंद पायवाटेवरून
मायावी आसमंतात
विरून जाणारी
माझी क्षीण साद... जणू ... माझंच अस्ताव्यस्त विस्कटलेपण
जडभार झाल्या
माझ्याच अस्तित्वातून
आवर्तित वासनांचा चक्रव्यूह भेदून
अनाकलनीय वेदनांचा
कल्लोळ माजवतानासुद्धा.. म्हणतोच आहे मी आभाळभर बाहू पसरून...
हे ऽऽ गोड मुली
तू फक्त हो म्हण...
की मी जाईनच उडून पल्याडच्या डोंगरावर...
तुझ्यासह आणि तुझ्या शिवायसुद्धा
तू फक्त... हो म्हण
तू फक्त... हो म्हण!
-राजेंद्र जगताप
('तू फक्त हो म्हण', दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी आर्ष पब्लिकेशन्स, पुणे तर्फे प्रकाशित कविता संग्रहातून)