Prabuddh Bharat

Prabuddh Bharat The official Facebook handle of the voice of social justice, equity and equality .
(335)

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणीऔरंगाबाद...
11/09/2026

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात विद्यार्थिनींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वसतिगृहातील विद्यार्थिनींना धमकावणे, सुविधा उपलब्ध करून न देणे, वैयक्तिक कामे करून घेणे तसेच मानसिक दबाव निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वॉर्डन साधना सहाने यांची तत्काळ हकालपट्टी करावी, तसेच मेस कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत प्रादेशिक उपायुक्त दीपक खरात यांना निवेदन देण्यात आले. वसतिगृहातील विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारीनुसार, रेसिडेन्शियल वॉर्डन असूनही विद्यार्थिनी आजारी पडल्यास किंवा रुग्णालयाशी संबंधित परिस्थिती निर्माण झाल्यास आवश्यक ती जबाबदारी घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच भत्ता आणि इतर सुविधांबाबत मागणी केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे.

मेसच्या जेवणाबाबत विद्यार्थिनींनी तक्रारी केल्यानंतरही त्यावर योग्य ती कार्यवाही होत नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच वसतिगृहातून काढून टाकण्याची अथवा भत्ता बंद करण्याची धमकी दिली जाते, विद्यार्थिनींवर मानसिक दबाव आणला जातो आणि काही विद्यार्थिनींना जाणीवपूर्वक लक्ष्य करून दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच नॉनव्हेज भोजन करणाऱ्या विद्यार्थिनींवर विशेष लक्ष ठेवून त्यांच्याशी अपमानास्पद पद्धतीने वागले जाते, तसेच “माझ्याजवळ नको येऊ” अशा प्रकारची वक्तव्ये केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रमुख मागण्या :

- वॉर्डन साधना सहाने यांची तत्काळ हकालपट्टी करावी

- वसतिगृहातील वॉचमनची नियुक्ती व पार्श्वभूमी यांची चौकशी करून चारित्र्य प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तींचीच नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

- युनिट क्रमांक चारच्या जेवणामध्ये शिजलेली गोगलगाय आढळल्याचा आरोप करत संबंधित मेस कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करावा

- वसतिगृहात नियुक्त करण्यात येणाऱ्या वॉर्डनने विद्यार्थिनींना दिले जाणारेच भोजन करणे बंधनकारक करावे

या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता संबंधित कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी पश्चिम शहर अध्यक्ष राहुल मकासरे, उपाध्यक्ष निलेश बनकर, पवन चव्हाण, रवी मिसाळ, राजेश हिवाळे, भरत नरवडे पाटील, रोहित खरात यांच्यासह शेकडो विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशाराअहिल्यानगर : जामखेड पोलीस ठाण्य...
11/09/2026

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

अहिल्यानगर : जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) सुजितकुमार क्षीरसागर यांनी तपासी अधिकाऱ्यांना दिले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाची भेट घेतल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी लक्ष्मण नवनाथ साळवे याच्यासह रामदास साळवे आणि भरत साळवे हे आरोपी अद्याप फरार असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. हे आरोपी पीडित बालिकेच्या कुटुंबाला 'केस मिटवून घ्या, नाहीतर जिथे दिसताल तिथे हातपाय तोडून जिवे मारू' अशी थेट धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण करत आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उप पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट देऊन या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. आरोपींना पुढील २४ ते ४८ तासांत अटक करून गजाआड करावे तसेच पीडित कुटुंबाला आवश्यक पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, मागणीची दखल घेत डीवायएसपी सुजितकुमार क्षीरसागर यांनी तपासी अधिकाऱ्यांना तपासाची चक्रे वेगाने फिरवून फरार आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिल्याचे वंचित बहुजन आघाडीने सांगितले. दिलेल्या मुदतीत आरोपींना अटक न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच उप पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.

यावेळी कर्जत तालुकाध्यक्ष पोपट शेटे, सुधीर ठोंबे, विजय गायकवाड, बुवासाहेब चव्हाण, अतिश पारवे, चंद्रकांत नेटके, अंकुश साळवे, दादा साळवे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पीडित कुटुंबीय उपस्थित होते.

11/09/2026

घोडबंदरच्या पातलीपाड्यात रस्ता खचला; प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

ठाणे : घोडबंदर रोडवरील पातलीपाडा परिसरातील गल्लीतील रस्ता खचल्याचे निदर्शनास आले आहे. रस्त्याची झालेली दुरवस्था आणि संभाव्य धोक्याची परिस्थिती स्थानिक नागरिकांनी व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणली आहे.

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे - संजीव चांदोरकर भारतीय शेय...
11/09/2026

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे

- संजीव चांदोरकर

भारतीय शेयर मार्केट; एक पाय लंगडू लागलेला असताना, दुसरा पाय मात्र जोरात धावू पाहत आहे !

शेयर मार्केट मध्ये पहिल्यांदाच गुंतवणुकी करू लागलेल्या छोट्या / रिटेल गुंतवणूकदारांसाठी काही मित्रत्वाच्या सूचना !

कोणत्याही देशातील शेयर मार्केट दोन पायांवर चालत/ धावत असते.

एकाला प्रायमरी मार्केट म्हणतात, ज्यात कंपन्या इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) मार्फत कंपनीचे नवीन शेअर्स विक्रीला काढतात आणि शेअर मार्केटवर त्यांचे लिस्टिंग होते. दुसऱ्याला सेकंडरी मार्केट म्हणतात, ज्यावर लिस्टिंग झालेल्या शेअर्सची गुंतवणूकदारांमध्ये खरेदी विक्री होत असते. यात कंपनीला काहीही पैसे मिळत नाहीत हे खरे. पण कंपनीच्या शेअरची किंमत वधारणे हे कंपनीच्या वित्तीय आरोग्यासाठी शुभ लक्षण मानले जाते.

प्रायमरी मार्केट मध्ये नक्की कधी नवीन शेअर्स विक्रीला काढायचे हे ठरवताना कंपन्या सेकंडरी मार्केट मधील तेजी आणि उत्साह लक्षात घेत असतात. या व अशा अर्थाने तांत्रिक दृष्टया भिन्न असणारी ही मार्केट्स परस्परांवर जैवपणे बांधलेली असतात.

असे असले तरी भारतीय सेकंडरी मार्केट मध्ये निरुत्साह आहे तर प्रायमरी मार्केट जोरात आहे.

भारतीय शेयर मार्केटवर भारतीय कंपन्या लिस्टेड असल्या तरी त्या मार्केटच्या सेंटिमेंट वर जागतिक घटनांचा विशेषतः अमेरिकेतील शेयर मार्केटचा निर्णायक प्रभाव पडत असतो.

गेल्या महिन्याभरात सेन्सेक्स ७८,५०० वरून ४.५ टक्क्यांनी घसरून काल ७५,००० वर बंद झाला. एकूणच नर्व्हसनेस आहे. त्याला अनेक सयुक्तिक कारणे आहेत.

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणवर आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे खनिज तेलाचे भाव १०० डॉलर वर पोचले आहेत. अमेरिकेत नोव्हेंबर मध्ये होऊ घातलेल्या मध्यावधी निवडणुका ट्रम्प यांच्यासाठी जीवन मरणाएवढ्या महत्वाच्या आहेत. त्यांचा डोळा इराणापेक्षा त्या निवडणुकांवर जास्त आहे. निवडणुकीत आपली प्रतिमा विजेत्याची दाखवण्यासाठी ट्रम्प आता नव्याने छेडलेले युद्ध लवकर आटोपते घेतील का याबद्दल शंका वक्त होत आहे.

दुसऱ्या बाजूला अमेरिकेन शासनाच्या डोक्यावरील कर्जभार ऐतिहासिक उंचीवर पोचला आहे. या व अशा अनेक कारणांमुळे आणि अमेरिकेतील सरकारी रोखे बाजारातील घडामोडीमुळे अमेरिकेतील व्याजदर वाढू शकतात. त्याचा परिणाम शेयर मार्केटवर होणार हा नक्की. तिसऱ्या बाजूला अमेरिकेतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपन्यांचा फुगा फुटेल की फुटणार नाही याच्या चर्चा कधी गरम कधी थंड अशा पद्धतीने होत असतात.

भारतापुरते बोलायचे तर परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गेल्या दहा दिवसात पुन्हा एकदा जोरदार विक्रीला सुरुवात केली आहे. परदेशी भारतीय नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर डॉलर्स मिळाल्यांनतर देखील रुपया फारसा वधारलेला नाही.

भारतातील आयपिओ मार्केटला मात्र याच दिवसांत उधाण आले आहे. जानेवारी २०२६ पासून ऑगस्ट पर्यंत एकूण १६५ कंपन्यांनी ८०,००० कोटी रुपयांची भांडवल उभारणी केली, ज्यात छोट्या आणि मध्यम कंपन्यांची संख्या लक्षणीय आहे.

गुंतवणूकदारांच्या उत्साहामुळे प्रत्येक आयपीओ ओव्हर सबस्क्राईब होत आहे. जुलै ऑगस्ट या दोन महिन्यातील आयपियो जवळपास ६० पटींनी ओव्हर सबस्क्राईब झाले आहेत.

सप्टेंबर ९ रोजी एकाच दिवशी सहा आयपिओ विक्रीसाठी खुले झाले हा एक ऐतिहासिक उच्चांक आहे. सप्टेंबर अखेरीपर्यंत अजून ३० आयपीओ बाजारात येऊ शकतात. डिसेंबर पर्यंत रिलायन्स जिओ, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, फ्लिपकार्ट असे मेगा आयपियो येणार आहेत. सेबीने आधीच मान्यता दिलेल्या किंवा सेबी कडे अर्ज केलेल्या कंपन्या नजीकच्या काळात तुफान भांडवल उभारणी करतील असे अंदाज आहेत.

देशात गेल्या काही वर्षात नव्याने शेयर मार्केटमध्ये , डायरेक्ट किंवा म्युच्युअल फंडामार्फत, गुंतवणूक करू लागलेल्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यांच्यासाठी

१. डायरेक्ट शेयर विकत घेण्यापेक्षा म्युच्युअल फंडामार्फत गुंतवणूक करणे कधीही शहाणपणाचे. एका कंपनीच्या शेयर मधील गुंतवणुकीत जोखीम असते. तर म्युच्युअल फंड त्यांचा फंडातून अनेक कंपन्या असणाऱ्या एका पोर्टफोलिओ मध्ये गुंतवणुकी करतात. त्यामुळे जोखीम विखरून जाते. फंडाकडे प्रशिक्षित फंड मॅनेजर्स असतात. ते सतत पोर्टफोलिओ मध्ये बदल करत राहतात.

२. आयपीओ मध्ये शेयरची किंमत वर्षभरात दुप्पट / त्या पेक्षा जास्त (मल्टी बॅगर ) झाल्याच्या स्टोऱ्या असतात. त्यांची संख्या अत्यल्प असते. उलटपक्षी आयपीओच्या वेळच्या किमतीच्या तुलनेत नंतरच्या काही महिन्यात त्या किमतीपेक्षा खूप कमी किंमत झालेल्या शेयर्सची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे आयपीओकडे लवकरात लवकर पैसे मिळवण्याचे साधन म्हणून बघू नका

३. सर्वात महत्वाचे. शेयरबाजारात पत्त्याचा कॅट पिसावा तसे कंपन्या / शेयर्स पिसले जात असतात. भूतकाळातील परफॉर्मन्स हा काही भविष्यतील परफॉर्मन्सचा द्योतक नसतो.

४. तुम्हाला भरीला पाडू पाहणाऱ्या ब्रोकर , वित्त सल्लागार , सोशल मीडियावरील लोक यांचे सल्ले फेसव्हॅल्यूवर घेऊ नका. क्रॉसचेक करा. यात तुम्ही ओळखत असणाऱ्या व्यक्ती देखील असू शकतात.

५ सर्वात महत्वाचे. डाव्या उजव्या कोणत्याही बाजूने बघितले तरी शेयर मार्केट एक जोखीमयुक्त गुंतवणूक आहे. त्यामुळे आपल्या एकूण बचतींपैकी किती प्रमाणात शेयर मार्केटमध्ये जोखीम घ्यायची याची खूणगाठ मनाशी पक्की करा.

६. शेवटचे. फक्त जास्त परतावा, रिटर्न मिळवण्याच्या मागे लागू नका. फायनान्स नंतर येते. कॉमन सेन्स, शहाणपण त्यापेक्षा पुरातन आहे. जसे की सगळी अंडी एकाच परडीत न ठेवणे इत्यादी.

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणीनवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा...
11/09/2026

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला सामाजिक कार्यकर्त्यांनी काळे फासले.

MPSCचा अभ्यास करणाऱ्या सुमारे २५ लाख विद्यार्थ्यांच्या तसेच महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने भ्रष्ट व्यवस्थेविरोधात ही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासलेले काळे हे सरकारच्या कारभाराविरोधातील जनतेची थप्पड असल्याचे आता बोलले जात आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनीही या विरोधात प्रतिक्रिया दिली होती, तसेच वंचित बहुजन आघाडी, पुणे यांना MPSC विद्यार्थी आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचे आणि पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. वंचित बहुजन आघाडी पुणे शहर अध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी MPSC विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याआधी आमच्यावर गुन्हे दाखल करा असा इशारा दिला होता.

11/09/2026

MPSC च्या कारभाराविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळं

भाळवणीतील खडीक्रशरविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; परवाने रद्द करण्याची मागणीपंढरपूर : पंढरपूरमध्ये भाळवणी येथे सुरू अस...
11/09/2026

भाळवणीतील खडीक्रशरविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; परवाने रद्द करण्याची मागणी

पंढरपूर : पंढरपूरमध्ये भाळवणी येथे सुरू असलेला खडीक्रशर कायमस्वरूपी बंद करण्यासह नव्याने प्रस्तावित खडीक्रशर, आरएमसी प्लांट, डांबर प्लांट तसेच अवैधरित्या होणाऱ्या उत्खननासंदर्भातील परवाने व नाहरकत दाखले तात्काळ रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे परिसरातील मागासवर्गीय समाजाच्या सुमारे १७० एकर शेतीवर नापिकीचे संकट निर्माण होणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीने सांगितले.

भाळवणी येथे २५ ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेत सुरू असलेला खडीक्रशर कायमस्वरूपी बंद करण्याचा तसेच भविष्यात कोणत्याही नवीन खडीक्रशरला परवानगी देऊ नये, असा ठराव करण्यात आला होता. मात्र, या ठरावानंतरही २७ नोव्हेंबरला झालेल्या मासिक सभेत नवीन खडीक्रशर व अन्य प्रकल्पांसाठी ग्रामपंचायतीकडून परवानगी आणि नाहरकत दाखले देण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

खडीक्रशरच्या परिसरात मागासवर्गीय समाजाच्या सुमारे १७० एकर शेती असल्याने धूळ, प्रदूषण आणि उत्खननामुळे शेतीच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन खडीक्रशरला परवानगी देऊ नये, असे ठराव करूनही प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रश्नासाठी भाळवणीतील शेतकरी व ग्रामस्थ मागील अडीच वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. सामाजिक कार्यकर्ते मोहन इंद्रजित भोसले यांनी याप्रकरणी पाच ते सहा दिवस आमरण उपोषण करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.

यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे तसेच पंढरपूर तालुक्यातील विविध विभागांचे पदाधिकारी यांनी पंढरपूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत खडीक्रशर व संबंधित प्रकल्पांचे परवाने तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.

ग्रामस्थांच्या मागण्यांवर प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन संबंधित सर्व प्रकल्पांचे परवाने रद्द करावेत. आपल्या स्तरावरून कारवाई झाली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाद्वारे निवेदन देण्यात येईल आणि खडीक्रशर बंद करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी भाळवणी गावातील शेतकरी तसेच वंचित बहुजन आघाडीचे पंढरपूर तालुका पदाधिकारी, युवक आघाडीचे पदाधिकारी आणि शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमरावती अग्निकांडाचा चौकशी अहवाल; वंचित बहुजन आघाडीचे आरोप खरे ठरले!दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- राजेंद्र प...
11/09/2026

अमरावती अग्निकांडाचा चौकशी अहवाल; वंचित बहुजन आघाडीचे आरोप खरे ठरले!

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- राजेंद्र पातोडे यांची मागणी

अमरावती : अमरावती जिल्हा रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेप्रकरणी समोर आलेल्या चौकशी अहवालामुळे वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी केलेले अनेक आरोप खरे ठरल्याचे प्रतिपादन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. ही घटना केवळ अपघात नसून शासनाचे दुर्लक्ष, आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणा आणि अग्निसुरक्षेच्या नियमांकडे झालेल्या दुर्लक्षाचा परिणाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चौकशी अहवालानुसार, नवजात अतिदक्षता विभागात वापरण्यात येणारे शिलर कंपनीचे ‘ग्राफनेट अॅडव्हान्स’ व्हेंटिलेटर सदोष असल्याचे समोर आले आहे. या उपकरणात शॉर्टसर्किट होऊन पाण्याचा झोत बाहेर पडला आणि त्यानंतर स्फोट होऊन आग लागल्याचे अहवालात नमूद असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने केला आहे. विशेष म्हणजे याच उपकरणाला २०२२ मध्येही आग लागल्याची घटना घडली होती. तरीही आवश्यक दुरुस्ती आणि सुरक्षिततेची खात्री न करता ते पुन्हा वापरण्यात आले, असा आरोप पातोडे यांनी केला. या दुर्घटनेत रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटीही समोर आल्याचे पक्षाने म्हटले आहे. धूर शोधक आणि फायर अलार्म प्रणाली मॅन्युअल मोडमध्ये बंद होती. फायर पंप हाऊस कुलूपबंद होते, आपत्कालीन बाहेर पडण्यासाठी केवळ एकच दरवाजा उपलब्ध होता, तर सीसीटीव्ही कॅमेरेही कार्यरत नसल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

बायोमेडिकल उपकरणांच्या देखभालीचे कंत्राट असलेल्या मेसर्स एओव्ही इंटरनॅशनल या कंपनीकडूनही योग्य तांत्रिक सल्ला आणि देखभाल करण्यात आली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात एओव्ही इंटरनॅशनल कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू असून शिलर कंपनीलाही काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश देण्यात आल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. मात्र, एवढ्या गंभीर त्रुटी आणि निष्काळजीपणा समोर आल्यानंतरही चौकशी अहवालात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आलेली नाही, यावर पातोडे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. सुनीलकुमार वाकचौरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार, डॉ. अरुण साळुंके, प्रशासकीय अधिकारी संदिप तारगे आणि संबंधित इलेक्ट्रिशियन यांना निलंबित करण्यात आले असले तरी ही कारवाई अपुरी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

निलंबन ही सौम्य कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करा :

निलंबनाची कारवाई करून प्रकरण संपवण्याऐवजी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. या घटनेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांचीही जबाबदारी निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच राज्याचे आरोग्यमंत्री आणि आरोग्य विभागाचे आयुक्त यांनाही या प्रकरणात जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

भंडारा घटनेनंतरच्या उपाययोजना अमरावतीत का राबवल्या नाहीत?

भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनेनंतर अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सुचविण्यात आलेल्या उपाययोजना अमरावती जिल्हा रुग्णालयात का राबविण्यात आल्या नाहीत, याचा शासनाने खुलासा करावा, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीने केली आहे. राज्यातील सर्व सरकारी नवजात अतिदक्षता कक्ष (NICU), विशेष नवजात काळजी कक्ष (SNCU) आणि अतिदक्षता कक्षांची अग्निसुरक्षा, विद्युत सुरक्षा तसेच जैववैद्यकीय सुरक्षिततेची तातडीने तपासणी करण्यात यावी. या तपासण्यांचे अहवाल सार्वजनिक करावेत, अशी मागणी पातोडे यांनी केली. याशिवाय वैद्यकीय उपकरणांची खरेदी व देखभाल प्रक्रियेत कमिशनखोरी अथवा भ्रष्टाचार आढळल्यास संबंधितांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन झाले आहे की नाही, याचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी पक्षाने केली आहे.

मृत बालकांच्या कुटुंबीयांना दोन कोटींची नुकसान भरपाई -

अमरावतीच्या दुर्घटनेत आपल्या चिमुकल्या मुलांना गमावलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. आरोग्यमंत्री आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रशासकीय जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले आहे. नुसते निलंबन करून प्रकरण दडपण्याचा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाल्यास वंचित बहुजन आघाडी तीव्र जनआंदोलन उभारेल. तसेच या प्रकरणातील कायदेशीर लढाही पुढे नेण्यात येईल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.

🔴 प्रबुद्ध भारत बुलेटिन, 11 सप्टेंबर 2026📍प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर निशाणा ; "कठीण काळात इराणला साथ दिली पाहिजे"📍म...
11/09/2026

🔴 प्रबुद्ध भारत बुलेटिन, 11 सप्टेंबर 2026

📍प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर निशाणा ; "कठीण काळात इराणला साथ दिली पाहिजे"

📍महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा येथील प्रशासनाने दलित-बहुजन समाजातील सहा विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज भेट देत पाठिंबा दर्शविला.

📍वर्धा हिंदी महाविद्यालयातील 6 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले असले तरी, तुम्ही 6 जण नाहीत.आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे विद्यार्थी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आपल्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. - सुजात आंबेडकर

📍महाविद्यालयाच्या कुलगुरु आणि प्राध्यापकांना इशारा आहे की, जर आपण विद्यार्थ्यांवर खोट्या केसेस करत असाल आणि त्यांचे खच्चीकरण करत असाल आणि दुसऱ्या बाजूला ABVP चे गमछे दाखवत असाल, तर भीमटोला दिल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी थांबणार नाही - सुजात आंबेडकर

📍साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

📍राहुरी नगरपालिकेवर धडकलेल्या आदिवासी बिऱ्हाड आंदोलनाला मोठे यश; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाची दखल

📍ठाणे येथे वंचित बहुजन आघाडीच्या कोअर कमिटी बैठकीत निर्णय: ‘जय भीम GEN Z’ अभियानाच्या नियोजनासाठी ९ सदस्यीय ‘VBA ऍक्शन ग्रुप-२०२६’ची स्थापना

10/09/2026

जरी वर्धा हिंदी महाविद्यालयातील 6 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले असले तरी, यामध्ये तुम्ही 6 जण नाहीत. तर आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे विद्यार्थी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आपल्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत.

- सुजात आंबेडकर
युवा नेते, वंचित बहुजन आघाडी

Address

250 C, Samajwadi Mahila Building, Shanivar Peth, Pune 30
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prabuddh Bharat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prabuddh Bharat:

Shortcuts

Share