
05/09/2025
चोराच्या उलट्या बोंबा – महाराष्ट्र कुठे चाललाय?
सोळापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात मुरूम चोरीवर DySP अंजना कृष्णा यांनी कारवाई केली आणि तिथूनच संपूर्ण वाद पेटला. कारवाई सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट फोन करून कारवाई थांबवण्याचे आदेश दिले, हा मुद्दा सगळीकडे गाजतोय. एखाद्या निवडून आलेल्या नेत्याने कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याला दबाव आणणे हा सरळसरळ सत्तेचा दुरुपयोग आहे. प्रशासनावर अशा प्रकारे हस्तक्षेप झाला तर सामान्य जनतेला न्याय कोण देणार?
या वादानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी मात्र सगळाच खेळ उलटा करून टाकला. त्यांनी UPSC ला पत्र लिहून अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची चौकशी करावी, असा प्रस्ताव मांडला. पुजा खेडकर प्रकरणाचा दाखला देत त्यांची नियुक्ती बनावट कागदपत्रांवर झाली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला. पण ठोस पुरावे कुठे आहेत? चौकशी करण्याची वेळच निघून गेली आहे, मग हा आरोप फक्त राजकीय गाजावाजा नाही का? थोडक्यात सांगायचं तर मिटकरींचं पत्र म्हणजे राजकीय निष्ठा दाखवण्यासाठी केलेला रडीचा डावच वाटतो.
प्रश्न इथेच संपत नाही. अंजना कृष्णा यांनी कायद्याच्या चौकटीत काम केलं, म्हणून त्यांच्यावरच संशय व्यक्त होतोय. आणि ज्यांनी कारवाई थांबवण्यासाठी फोन केला त्यांच्यावर मात्र चौकशीच नाही? हा तर सरळ चोराच्या उलट्या बोंबाचा प्रकार आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट मिटकरींवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं – “चौकशी झालीच पाहिजे तर ती अजित पवार आणि त्यांच्या कंपन्यांची झाली पाहिजे, अंजना कृष्णा यांची नाही.” म्हणजेच जनतेचा खरा प्रश्न आहे मुरूम माफियांचा आणि त्यांना राजकीय पाठीशी असणाऱ्यांचा. पण चर्चेचं लक्ष्य वळवलं जातंय अधिकाऱ्यावर.
आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती का निर्माण होतेय की, कायद्याने काम करणारा अधिकारी आरोपी ठरतोय आणि दबाव टाकणाऱ्यांचा बचाव होतोय? ही प्रवृत्ती सुरू राहिली तर उद्या कोणताही प्रामाणिक अधिकारी सुरक्षित राहणार नाही. मग लोकशाही उरणार कशी?
महाराष्ट्राला काय हवंय? प्रामाणिक प्रशासन की राजकीय रडारड? राजकारणासाठी अधिकाऱ्यांना बदनाम करणं हा खेळ बंद व्हायला हवा. नाहीतर लोकांचा विश्वास कोसळेल, आणि मग लोकशाही फक्त कागदोपत्री उरेल.