06/07/2016
Author ..
BharatKumar Rawut sir
माणदेशचा वाटाड्या
मराठीतल्या कुठल्याही वाचकाला माणदेशातील बनगर वाडीची नकळत सफर घडवून आणणारे सिद्धहस्त लेखक व्यंकटेश माडगुळकर यांचा आज जन्मदिन.
ज्या काळात नागरी मराठी साहित्यात केवळ पुणेरी शुद्ध मराठी व शहरी संस्कृतीच सर्वमान्य होती. त्य काळात व्यंकटेश माडगुळकरांनी मराठीतल्या ग्रामीण छटा साहित्याच्या पंक्तीत मानाने बसवल्या. ज्या काळात जळगावचे सोपानदेव चौधरी खानदेशी अहिराणी संस्कृती नागरी साहित्यात आणत होते, त्याच काळात माडगुळकरांची माणदेशी मराठी साहित्यात उमटत होती.
आजच्या दिवशी १९२७मध्ये सांगली जिल्ह्यातील माडगुळ गावी जन्मलेले व्यंकटेश दिगंबर माडगूळकर
व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे मराठी लेखक आणि चित्रकार होते.
त्यांनी कथा, कादंबर्या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. व्यंकटेश माडगूळकर यांना शिकारीचा छंद हॊता.त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली
व्यंकटेश माडगूळकर यांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. तथापि त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला. इंग्रजी शिकून पाश्चात्य साहित्याचेही वाचन केले. ज्येष्ठ मराठी कवी, गीतकार ग.दि. माडगूळकर यांचे ते धाकटे बंधू. पण दोघांची प्रतिभा व शैली पूर्णत: भीन्न!
व्यंकटेश माडगूळकर पुणे आकाशवाणीवर दीर्घकाळ (१९५५-८५) नोकरीत होते.
आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर ते १९५० च्या सुमारास व्यंकटेश माडगूळकर मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले.
या काळातच 'माणदेशी माणसे' (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी सहित्याला अनोखे होते. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या ह्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला.
त्यानंतर गावाकडच्या गोष्टी (१९५१), हस्ताचा पाऊस (१९५३), सीताराम एकनाथ (१९५१), काळी आई (१९५४), जांभळीचे दिवस (१९५७) ह्यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले.
ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. बनगरवाडी (१९५५), वावटळ (१९६४), पुढचं पाऊल (१९५०), कोवळे दिवस (१९७९), करुणाष्टक (१९८२), आणि सत्तांतर (१९८२), ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत.
महात्मा गांधींच्या १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात ते सहभागी झाले. त्यातूनच 'कोवळे दिवस' या कादंबरीतून अशाच एका कोवळया स्वातंत्र्यसैनिकाचे अनुभव वाचकांसमोर आले.
'पुढचं पाऊल' ही स्वत:च्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी. एका दलित कलावंताच्या जीवनावरील ह्या कादंबरीत त्याच्यावरील अन्याय त्याबद्दची त्याची चीड आणि पुढचे पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग शोधण्याची दलित मनाची धडपड दाखाविली आहे.
व्यंकटेश माडगूळकरांनी नाटकेही लिहिली, 'तू वेडा कुंभार', 'सती', 'पति गेले गं काठेवाडी' ही त्यातील काही विशेष उल्लेखनीय होत. 'कुनाचा कुनाला मेळ न्हाई' आणि 'बिनबियांचे झाड' ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्येही गाजली.
'प्रवास एक लेखकाचा' हे व्यंकटेश माडगूळकरांचे आत्मचरित्र आहे.
अंबेजोगाईत १९८३मध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. त्यावेळी साहित्याचे जमिनीशी असलेले नाते या विषयावर त्यांनी केलेले प्रकट चिंतन मनोज्ञ होते.
२८ आॅगस्ट २००१ ला त्यांचे निधन झाले.
त्यांचे साहित्य वाचणे हा जसा विवक्षण आनंद तसाच त्यांच्या तोंडून त्यांच्या शिकारीच्या गोष्टी ऐकणे हासुद्धा अद्भूत अनुभव असे. केवळ भाषेच्या सामर्थ्यावर ते सर्वांना घनदाट जंगलात काळोख्या कीर्र रात्री नेऊन माचणावर उभे करत. समोर चित्ते, बिबळे, काळविटे आणि ससे... मग तेच हात पकडून जंगलातून वाट काढत बाहेर काढत... जाता जाता त्यांच्या बंदुकीतून सुटलेल्या सूं सूं गोळ्यांनी एखादा बिबळ्या, रानडुक्कर, चार-पाच हरणे हमखास खाली कोसळत...
असे रसरशीत व्यंकटेश माडगुळकर!