15/04/2026
हिरण्यगर्भ’ कहाणी ब्रह्मांडनायकाची
“हम गया नहीं, जिंदा हैं ।” हे केवळ आशीर्वाद नाहीत तर ती आहे अनुभूती श्री स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची. लहानपणी मूल पालकांचा हात धरून हळूहळू एक-एक पाऊल टाकते आणि पुढे जात राहते. चालत असताना, ते काही वेळा धडपडते. त्या वेळी त्याचे पालकच त्याला उठण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठीही प्रोत्साहित करतात, अगदीच त्याला उठता येत नसेल, तर हात धरून उठवतात. श्री स्वामी समर्थ ही जगन्माउलीदेखील अशीच असल्याचा अनुभव आपल्यापैकी अनेक वाचकांनी घेतला असेल.
अडचणीच्या प्रसंगीच नाही, तर सतत ते आपले मूल धडपडत नाही ना ?, चुकीचे काही करत नाही ना ? यासाठी आपल्या बरोबर असणारे स्वामी समर्थ. ते जरी म्हणत असले, की ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे,’ तरी ते पाठीशी नाही, तर आपल्याबरोबरच असतात, पण त्यांचा सहवास अनुभवण्यासाठी तेवढी पात्रता मिळवण्यासाठी आपल्याला उत्तम कर्म केली पाहिजेत.
आपल्या भक्तांबरोबर आपण कसे असतो आणि त्यांचा उद्धार कसा करतो, हेच या ‘हिरण्यगर्भ’ पुस्तकात श्री. आठवले यांनी मांडले आहे. या पुस्तकावरील मुखपृष्ठ चितारले आहे, श्री स्वामी समर्थांची कृपादृष्टी लाभलेल्या श्री. शेखर साने यांनी.
मुखपृष्ठ उलडल्यानंतर श्री स्वामी समर्थांचाच सहवास आपल्याला लाभतो आहे, या विचारांमधून वाचक या कादंबरीतील प्रकरणांमध्ये रंगून जातो. कादंबरी वाचत असताना त्याची ब्रह्मानंदी टाळी लागली नाही तरच नवल.
लेखकाच्या कल्पनेतून, भावविश्वातून लिहिल्या गेलेल्या या कादंबरीचे संपादन केले आहे, डाॅ. जयश्री उपाध्ये यांनी.
गुरुतत्त्व एकच आहे, हा या कादंबरीचा गाभा आहे. श्री स्वामी समर्थांनी जवळजवळ ७३ ० वर्ष केलेल्या लीला, शिकवणूक आणि चमत्कारांची ही कहाणी आहे. या कादंबरीचे लेखन करताना लेखकाने जणू त्यांचे बाळ होऊन, त्यांच्या कडेवर बसून स्वामींच्या ७३० वर्षांच्या प्रवासाचा साक्षी होण्याचा प्रयत्न कथारूपात उलगडला आहे. अनेक साधकांना आलेले अनुभव आणि अनुभूती यांच्याभोवती ही कादंबरी गुंफली गेली आहे.
स्वामींनी अनेक भक्त, योगी, सत्पुरुष, साध्वी, योगिनी यांच्या जीवनप्रवासात, त्यांना हाती धरून चालवले, त्यांच्यासह अनेक लीला केल्या. त्यांची वर्णने या कादंबरीत आहेत.
या कादंबरीचे प्रमुख वैशिष्ट्य असे, की लेखकाने सुरुवातीला स्वान्तसुखाय हे स्वैर लेखन केले. स्नेह्यांच्या आग्रहावरून प्रसारमाध्यमांद्वारे वाचकांपर्यंत पोहोचविले. केवळ ५५ दिवसांमध्ये केलेल्या या लेखनातून ही अप्रतिम अशी कादंबरी निर्माण झाली.
कादंबरीच्या सुरुवातीपासून - श्री स्वामी समर्थांच्या आगमनापासून त्यांच्या निर्वाणापर्यंत वाचक भावविभोर होतो. हीच भावना कादंबरी वाचनानंतरही त्याच्यावर रेंगाळत राहते आणि त्याचा प्रत्येक कर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो, हे नक्की. त्यामुळेच या कादंबरीच्या वीस हजारांहून जास्त प्रती विकत घेऊन स्वामी भक्तांनी वाचल्या. श्री. आठवले यांचे प.पू. सद्गुरू श्री जनार्दन स्वामी खेर, बडोदा यांच्यासह श्री स्वामी समर्थ यांचे आशीर्वाद लाभल्यामुळेच हे शक्य झाले आहे, हे नक्की.
श्रीराम ओक
लेखक- सखाराम आठवले.
प्रकाशक- रसिक आन्तरभारती
पृष्ठ- ३९८, किंमत- ५५०/-