08/05/2026
महाकुंभाच्या मंगलमय नांदीपूर्वीच देआसरा फाऊंडेशनने नाशिकमधील हजारो लघु उद्योजकांसाठी आणलीये, एक सुवर्णसंधी !
काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उद्योगमंत्री मा. श्री. उदयजी सामंत, जलसंपदा मंत्री मा. श्री. गिरीशजी महाजन, शालेय शिक्षण मंत्री मा. श्री. दादाजी भुसे आणि नाशिक कुंभमेळा आयुक्त श्री. शेखर सिंह (IAS) यांच्या प्रमुख उपस्थितीत देआसरा फाऊंडेशनने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा *प्राधिकरणासोबत, बुधवारी ६ मे रोजी* एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला. ‘ANEK’ (Accelerating Nano-Enterprises through Kumbh) या उपक्रमाच्या माध्यमातून नॅनो-उद्योजकांना बळकट करणे हा या करारामागचा मुख्य उद्देश आहे.
कुंभमेळा हा केवळ एक आध्यात्मिक सोहळा असून या मुहूर्तावर नाशिकमध्ये लाखो भाविक येतात. स्थानिक लघु उद्योजकांसाठी ही व्यवसायाची फार मोठी संधी आहे. या संधीचे सोने करण्यासाठी २,०००+ उद्योजकांना सक्षम करणे हे ‘ANEK’चे उद्दिष्ट आहे. देआसरा फाऊंडेशन या कार्यक्रमाचे नियोजन, क्षमता बांधणी आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करेल; जेणेकरून हे व्यवसाय केवळ कुंभमेळ्यापुरते मर्यादित न राहता, त्यानंतरही यशस्वीपणे सुरू राहतील. उद्योजकता म्हणजे केवळ व्यवसाय सुरू करणे नव्हे, तर तो दीर्घकाळ टिकवून ठेवणे होय, असे आमचे ठाम मत आहे.
या ऐतिहासिक क्षणी देआसरा फाउंडेशनचे प्रतिनिधित्व सिनियर रिसर्च फेलो डॉ. किरण लिमये यांनी केले. या विश्वासासाठी आणि संधीसाठी आम्ही कृतज्ञ आहोत!